Photo by note thanun on Unsplash
बारामती येथे दिनांक १३ व १४ जानेवारी रोजी मुख्याध्यापक,शिक्षक व यांच्यासाठी व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या साठी,नवीन शैक्षणिक धोरण व फिनलंड शिक्षण पद्धती यावर आधारित सायन्स सेंटर बारामती येथे निवासी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
गेल्या अकरा वर्षापासून शिक्षक, संशोधक यांच्यासाठी जागतिक पातळीवर सी. सी.ई. फिनलंड काम करीत आहे. गेल्या ५२ वर्षापासून सायन्स सेंटर हे संशोधन व शिक्षक प्रशिक्षण यावर काम करीत आहे.
आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना शिक्षकांना वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, स्वतः कौशल्यावर आधारित व नावीन्यपूर्ण प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.
फिनिश एज्युकेशन सिस्टीम मधील मुलांना हॅपी चिल्ड्रन समजले गेले आहे. पारंपारिक प्रशिक्षणांबरोबरच फिनलंड येथील पद्धती नवीन शैक्षणिक धोरणानुसार कशाप्रकारे काही पाठ्यपुस्तकातील घटकांसाठी भारतात राबवता येईल याचा विचार या कार्यशाळेत केला जाईल.
सातत्याने सलग पाच वर्ष फिनलंड हा देश आनंदी देश म्हणून सर्वोच्च स्थानावर आहे. येथील शिक्षण पद्धती सद्य परिस्थितीत सर्वोत्तम शिक्षण पद्धती आहे.अनेक वर्ष फिनलंड येथे राहून तेथील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करून फिनलंड ने नेमके कसे शिक्षण पद्धतीत यश मिळवले, यासंदर्भात प्रशिक्षण शिक्षकांना देतांना व त्यांचे शंका समाधान करताना हेरंब व शिरीन कुलकर्णी यांनी फिनलंडचा इतिहास, शिक्षण पद्धतीचे सरकारशी नातं ,रंजक परीक्षा पद्धती, व्यावसायिक शिक्षण, रंजक अध्ययन अध्यापनाच्या पद्धतीचे निरीक्षण करून फिनलंड मध्ये असं काय आहे ज्याच्यामुळे तेथील शिक्षण पद्धती यशस्वी मानली जाते याचा अभ्यास केला.
फिनलंड शिक्षण पद्धतीची माहिती भारतीय शिक्षकांना देत असतांनाच,फक्त व्याख्यानें न देता शिक्षकांनाही सहभागी करून घेतले.फिनलंड मध्ये जसा रंजक गृहपाठ देतात तसा शिक्षकांना दिला. शिक्षकांच्या 20 बॅच घेण्यात आल्या व हजारो शिक्षक यातून प्रशिक्षित झालें. यामध्ये जे अनुभव व माहिती मिळाली त्याचा उपयोग करून भारतात आपण कशाप्रकारे यशस्वी पद्धत राबवू शकतो, यासाठी सातत्याने प्रयत्न केलें.शिक्षकाना फिनलंड मधील शाळेचा अनुभव देण्याचाही प्रयत्न केला आणि त्या अनुभवाच्या आधारित भारतातही नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या उपाययोजना करून प्रामुख्याने महाराष्ट्रातील शिक्षणात या पद्धतीचा सकारात्मक वापर कसा करता येईल याचें उदाहरणांसह, केवळ आदर्शवादी उदाहरण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही तर भारतात दोन प्रकारच्या शाळा प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी सुरू केल्या आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे .पुणे येथील द अकॅडमी स्कूल व बेंगलोर येथील सिलिकॉन व्हॅली शाळा याच धर्तीवर वेगवेगळे प्रयोग करत पालकांसठी कुतूहलाचा विषय बनल्या आहेत.
हेरंब व शिरीन कुलकर्णी हे फिनलंड मध्ये गेल्या १७ वर्षा पासून राहून फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करतात व तिथे होणारे प्रयोग भारतासाठी असे अनुकूल ठरतील याचा विचार करतात आणि ते भारतातील शिक्षकांसाठी कसे मार्गदर्शक ठरतील याचे प्रशिक्षण हे शिक्षकांना देतात.
फिनलंड मधील शिक्षकाला असलेली स्वायत्तता, प्रत्येक विद्यार्थ्यांची बलस्थाने ओळखून त्याच्यासाठी योग्य नोकरी व्यवसायाच्या संधी ओळखून त्या दिशेने त्याला दिले जाणारे शिक्षण, शिकण्यातील अडचणीवर केली जाणारी उपाययोजना आणि मात, स्पर्धेचे रूप घेतलेल्या परीक्षांना बगल देऊन विषयाच्या आकलनावर दिलेला भर ही सगळी वैशिष्ट्ये आपल्यासमोर येतात.
नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना अनेक गोष्टी मुळे सकारात्मक फरक पडेल तसेच फिनलंडने वापरलेले तंत्र ही आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेत वापरून शिक्षण व प्रशिक्षण यात बदल घडवून आणू शकतो.
Council for creative education Finland ही संस्था फिनलंड येथे स्थापन करून तसेच देश-विदेशात फिरून विविध प्रकारच्या परिसंवादात भाग घेऊन शिक्षण प्रशिक्षणात सहभागी होऊन तेथील अनुभव व फिनलंड अनुभवाच्या आधारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांचा प्रयत्न असतो.अनेक शिक्षकांनी फिनलंड येथील शिक्षण पद्धती पाहण्यासाठी तेथील शाळांना भेटी दिल्या आहेत.
सी. सी. इ च्या अनेक ध्येयांपैकी एक ध्येय भारतातील शाळांचा विकसन हे होतं त्यामुळे भारतातील शाळांमध्ये फिनिश पद्धतीने शिकवता येईल व त्या मधून विद्यार्थ्यांचे हित होईल हे लक्षात घेऊन या संस्थेच्या अंतर्गत काही राज्यांच्या सरकारांच्या मदतीने त्यांनी आपलं शैक्षणिक कार्य छत्तीसगड, गोवा, दिल्ली, महाराष्ट्र या राज्यामध्यें शैक्षणिक काम सुरू केलं हे कौतुकास्पद आहे.
त्यातील शिक्षकांसाठी त्यांनी अनेक अभ्यासक्रम विकसित करून ते राबविले आहेत, केवळ व्याख्यानें न देता शिक्षकांचा सहभाग या प्रशिक्षणात घेतला. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भारताने कोणती काळजी घ्यावी, कोणत्या उपायांनी भारताचे शिक्षण धोरण अधिक उपयोगी बनेल. फिनलंड शिक्षण पद्धतीतील कोणते भाग भारतात स्वीकारू शकतो, महाराष्ट्रात कोणते उपाय करून शिक्षण अधिक उत्तम बनवता येईल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीत विशेषत: अध्ययन अध्यापन प्रक्रिया, मूल्यमापन, मूल्यांकन आणि शिक्षक प्रशिक्षण या क्षेत्रात फिनलंड कडून खूप काही शिकण्यासारखं आहे. महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही नावीन्यपूर्ण करावसं वाटत असेल तर त्यांच्यासाठी फिनलंड मध्ये असलेली sisu वृत्ती म्हणजे परिस्थिती कितीही प्रतिकूल असो माझ्या पुढे असलेले उद्दिष्ट मी साध्य करायलाच हवं हे येथील शिक्षकांमध्ये ठासून भरलेली असतं.
फिनलंडच्या शिक्षण पद्धतीची तोंड ओळख व इतिहास तसेच यशस्वी फिनलँड मधील बाल शिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण लहान मुलं व शिक्षणाची भाषा आणि शिक्षक पात्रता, फिनलंड मधील शालेय शिक्षण पहिली ते नववी, फिनलंड च्या शाळा मधील काही रंजक गोष्टी, प्राथमिक शिक्षणात उच्च शिक्षणाची तयारी, फिनलंड परीक्षा पद्धती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यासाठी ज्ञानाची किंवा पद्धतीची उपयुक्तता महत्त्व पूर्ण आहे.छोटा देश ही शिक्षणात उत्तुंग भरारी घेऊ शकतो.
अगदीच लहान मुलांना पुस्तकांच्या पलीकडचं जग प्रत्यक्ष दाखवायला हवं. पुस्तकांच्या पानां पेक्षा झाडावरच्या पानां चे निरीक्षण,फुलांचे निरीक्षण फुलांचा सुगंध याच्या जाणिवेत त्यांना रमू द्या. भवतालओळखीचे झालं की शिकणं सुलभ होतं. पुस्तकांतल्या रूक्ष शब्दांचा अर्थ निसर्गात शोधता यायला हवा.
अशाच प्रकारे फिनलंड मध्येही पूर्व प्राथमिक शिक्षणाचा विचार करतांना पुस्तकांच्या पलीकडें जेआहें त्याचा परिचय अधिक करून दिला जातो.फिनलँड मध्ये प्री स्कूलच्या रचनेचा मूळ उद्देशच विद्यार्थ्यांना शाळेसाठी तयार करणे हा असतो.शाळेत जाण्याआधी मुले शाळेत आवश्यक कौशल्याने युक्त असावीत असं अपेक्षित असल्यामुळे काही सवयी मुलांना येथे लावल्या जातात. वयाची सहा वर्षे पूर्ण झालेली मुलं इथे येतात. मुलं शाळेसाठी याच काळात तयार झाली तर नंतरची प्रक्रिया सोपी जाते इथे कोणत्याही प्रकारचं पुस्तकीं शिक्षण न देता खेळामधून त्यांना सामान्य ज्ञान दिले जातं कारण या वयात मेंदूचा सर्वार्थाने विकास होत असतो.
वर्गामध्ये गटात काम करता येणं ही मुलासाठी महत्त्वाची गोष्ट असते. मुलांनाही सवय लागावी म्हणून या एक वर्षाच्या काळात त्यांना गटात काम करण्यास सांगितले जातं आणि आवश्यक त्या ठिकाणी मदत केली जाते. मुलांना वाचता यावे आणि लिहिण्यासाठी त्यांना उत्सुकता निर्माण व्हावी या गोष्टीवर येथे काम केले जातं.
शाळेमध्ये व्यवस्थित वागता यावं यासाठी स्वतःची काम स्वतः करणं, गटात चांगल्या प्रकारे काम करता येणं यासाठी मुलांना तयार केले जातं.
बालकाचा विकास हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भाषिक अशा विविध टप्प्यावर होताना दिसून येतो. येथील शाळेच्या शिक्षिका जिम हॉलमध्ये शारीरिक शिक्षणाचे धडे देत असताना विविध आकाराच्या चकत्यावर जसे की त्रिकोण गोल चौकोन विद्यार्थ्यांना उभे करतात त्यातून बालकांना विविध गणितीय आकाराची ओळख होते, त्याचप्रमाणे खेळातून शिक्षण या संकल्पनेद्वारे विविध रंग व त्यांचे ज्ञान हे विद्यार्थ्यांना होताना दिसते. स्वतःच्या नावाचे अद्याक्षर जिथे असेल तिथे उभे राहून पाय ठेवायचा, नातेवाईकांची मित्र-मैत्रिणीची नावे कुठल्या अज्ञाक्षरा पासून सुरू होतात याची माहिती विद्यार्थ्याला होते त्यामुळे भाषेचा अभ्यासही होतो.
इथे पाठ्यक्रम पेक्षा अभ्यासक्रमाला जास्त महत्व दिलं जातं. भाषिक विकास पर्यावरण, निरीक्षण, माझा समाज, कुटुंब, माझी शाळा आणि मी तसेच शारीरिक क्षमतांचा विकास आणि अभिव्यक्ती विकास अशा बाबींचा विचार येथे केला जातो.
मुलांना कोरे कागद आणि खडू इत्यादी रंग साहित्य देऊन कोणतही चित्र काढायला रेघोट्या मारायला सांगितले जातं, मुलं मनसोक्त त्याचा आनंद घेतात. रेषेला वळणच हवं, रंग चित्राच्या बाहेर जाऊ नये इत्यादी बंधन त्याला यावेळी घातली जात नाहीत चित्रकलेची आवड निर्माण होणे, स्वतः काहीतरी केल्याचं आनंद मुलाला मिळणं हा त्यामागचा हैतू असतो.
फिनलंड आनंदी देश व सर्वोत्तम शिक्षण पद्धती असलेला देश म्हणून ओळखला जातो येथील शिक्षणाव्यवस्थेचा अभ्यास करून या देशाने शिक्षण पद्धतीत नक्की कोणते बदल केले ज्यामुळे ही पद्धत इतकी यशस्वी झाली अशा प्रकारच्या सकारात्मक गोष्टींचा अंतर्भाव भारतातील शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर सीसीई (Centre for Creative Education) अंतर्गत भारतातल्या त्यांच्या शाळेत त्यांनी अशाच पुस्तकांच्या पलीकडील उपक्रमांची सुरुवात केली आहे.
ऐखादी यशोगाथा जेव्हा सार्वत्रिक होते तेव्हाच विकास होतो.