शिक्षण क्षेत्रात पहिली शाळा उघडलीच गेली नसती तर आज शिक्षणाचा प्रसार आपल्याला दिसतो तो इतक्या गतीने झालाच नसतां. फुले दांपत्याचे योगदान प्रतिकुल परिस्थितीत वाखाणण्याजोगी आहे.
आज अनेकांच्या आयुष्यात प्राजक्ताच्या सड्याप्रमाणें अनेकांचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या सावित्रीबाई फुलें. व्यक्तिमत्व विकास पोकळीत होत नाही. फुले दाम्पत्याने शिक्षणाची दारे खुली केली कोणत्याच शिक्षण क्षेत्रात आज दलदल झाली आहे, शिक्षणाचा बाजार झाला आहे, त्यांना ही हे अभिप्रेत नव्हतें.
शिक्षणक्षेत्रात इतके भयानक चाललेले आहे की, शिक्षणाचे चित्र वरचेवर भयानकच होत आहे.
तंत्रज्ञानामुळे व त्याच्या प्रभावामुळे, वाचन संस्कृती हवी तशी रुजत नाही.मुले पाठ्यपुस्तकें,अवांतर वाचन करत नाहीत ही आजची समस्या आहे.कुटुंब,शाळा,समाज यांचे प्रयत्न तोकडे पडतात.मुले वाचतील असे काहीतरी करायला हवें, पण काही अजुन खूप अपेक्षित आहे. मुलांचं भवताल अपेक्षित साहित्याने भारलेंल नाही.
मुलांचे वृत्तपत्र वाचन,बातम्या ऐकणे वाढायला हवं.कार्टून पुढे मुले निष्क्रिय होत आहेत.
अभ्यासक्रमाच्या ओझे कमी होतच नाही.अनेक समित्याच्या शिफारशीचं ओझ फक्त वाढत आहे.
रिक्षात मुलांचं कोंबणं चालूच आहे .सरकार फक्त आश्वासन देण्यासाठीच आहे का?.प्राथमिकताच ठरत नाही,हे आजचं वास्तव दुर्दैव आहे.
जाहीरनामा हा प्रसतावनेसारखा ट्रेलरच आहे.तो फक्त जाहीर केला जातो. अंमलबजावणी कां झाली नाही, हे कोणी विचारत नाही, व विचारण्या ची सोय नाही.
मत देणं, बंद डब्यात एवढंच लोकांच्या हातात आहे.मत बदलणंं हातात नाही.अभ्यासक्रम ठरवणं,बदलणं यात लोकांचा सहभाग कमीच असतो.
कशातच सुधारणा आम्हाला नको,नां अध्यापनात नां अध्ययन पद्धतीत, नां परीक्षा पद्धतीत. मूल्य शिक्षणाला दूर ठेवल्यामुळे, बाकीच्या घटकांनी शिक्षण व्यवस्था गिळंकृत केली आहे.
जो पर्यंत कोचिंग क्लासेस, गाईडचा वापर राहणार ,जो पर्यंत मुले स्वयंअध्ययन करणारच नाहीत ,जो पर्यंत कॉपी चालणार तो पर्यंत शिक्षण क्षेत्रातील अस्वस्थ चित्र वाढंतच राहणार,त्यातील रंग ही गहिरे होत जाणार, किळसवाणें होत जाणार.
अस्वस्थ होणं हा जो पर्यंत ते तोपर्यन्त चा प्रवास आहे. जोपर्यंत मध्ये बदल झाल्यास तोपर्यंत मध्ये बदल होईल.
जोपर्यंत शिक्षण हक्क कायद्यात त्रुटी आहेत,ज्यांचा हक्क आहे ते वर्तुळाबाहेर आहेत,तो पर्यंत असेच चालणार.याचे उत्तरदाईत्व कोणांच?
२५ टक्के प्रवेश कां होत नाहीत?का जागा रिकाम्या राहतात.शाळा प्रशासनाला दाद का देत नाहीत?.घटनेटले शब्द घटनेतच राहतात.प्रत्यक्षात घटनेच्या वेळी वेगळाच घडतं.
शिक्षणावरील तरतूद कां वाढत नाही?अध्यापन व अध्ययन यांची युती कां होत नाही.अध्यापन एका दिशेने, अध्ययन एका दिशेने जात आहे.केवळ हातात सत्तेची सूत्रे असून चालत नाही.सत्तेत असणाऱ्यांची गुणसूत्रेंच अपेक्षित बदल घडवतात.निर्णय घेण्यासाठी संख्याबळ हवे.गुणवत्ताबळ चालत नाही.
शिक्षणहक्क कायद्याने काय दिले?कुणाला हक्क व कुणाला शिक्षण मिळते.अनेक गरीब वर्तुळाबहेर आहेत.गरिबाच्या साठी राखीव२५%जागा भरत नाहीत,भरू दिल्या जात नाहीत.
चांगल्या, सधन शाळा दुर्बल घटकाला जवळ करत नाहीत.श्रीमंताच्या मुलांना शिक्षणाची संधी आहे.गरिबाच्या मुलांना संधीच नाही.
शिक्षण क्षेत्र असे क्षेत्र बनले आहे,जिथे फक्त पैश्याची पेरणी उगवते.शिक्षणापासून दूर असलेल्या चे फक्त लेख येतात.
व्यस्त विद्यार्थी -शिक्षक गुणोत्तर , सुविधा भौतिक ही नाहीत व नैतिक ही नाहीत अशाही काही शाळाआहेत.
प्रशिक्षित शिक्षक,विशेष शिक्षक पुरेसे नसणे.हे आम आहे.
शिक्षण व्यवस्थेत आज अपयशाची मालिका आहे.प्रवेशा पासून अध्यापन,मूल्यमापन,निकाल,या सर्वांचा निकाल लागला आहे.
अभ्यासक्रमाला,पाठ्यपुस्तकाला न्याय देणारे शिक्षक हवेंत.शिक्षण क्षेत्रात काहीच रुचत नाही,रुजत नाही,अशी आज परिस्थती आहे. मूल्य रुजत नाहीत.शिक्षण घेणे ही आज औपचारिकता झाली आहे.
ज्ञाना साठी नाही तर उपजिविकेसाठी, शिक्षणाच्या पॅकेज साठी शिक्षण घेतले जात आहे.
कुठे गेली पुस्तकातली प्रतिज्ञा?प्रत्येक ओळीचे संदर्भ बदललेत.प्रत्येक ओळी समोर प्रश्नचिन्ह आले आहे.
ग्रेटा पर्यावरण वाचवण्यासाठी संसदेबाहेर उपोषण करते.आपल्या कडील मुले कधी पेटून उठणार.
पुस्तकामध्ये केवळ न गुंतता,वास्तव जीवनातले प्रश्न सोडविण्याचे शिक्षण मिळायला हवे.फक्त परिक्षेतले प्रश्न सोडविण्याचे शिक्षण नको.२१अपेक्षित व गाईड,शिकवणी, ही अफूची गोळी घेवून परीक्षा दिली जात आहे. परंपरा,वैज्ञानिक दृष्टीकोन,पुस्तकातच आहे.प्रज्ञे पुढे,प्रतिज्ञा गौण ठरत आहे.नई तालीम पुस्तकातच राहिली.वास्तवात येऊच दिली जात नाही.
परीक्षा विचारच करायला शिकवत नाही.
घोकंपट्टी करायला शिकवते.विचार अमर असतात.घोकंपट्टीच अस्तित्व तरंगाप्रमाणे असतं.परीक्षे पर्यंतच माहितींच अस्तित्व असतं.
व्यवसाय शिक्षण नाही, पण शिक्षणाचा व्यवसाय जोरात आहे.शिक्षण झाल्यावर कोणताच व्यवसाय मुलं करू शकत नाहीत.
यशाच्या जाहिराती फसवत आहेत. परीक्षेत पाहिले आलेल्यांचा वापर करून, त्यांना लाखो देवून फसवण्यासाठी वापरलं जात आहे.
स्मशानांत सजवलेल्या थडग्या प्रमाणे जागोजागी बालवाड्या सजल्या आहेत.
पैसा,भौतिक सुविधा असल्या की बालवाडी काढता येते, लोकांना फसवतां येतं.
मॅक्डोनाल्ड पेक्षाही शिक्षणाची फ्रॅंचाईजी वाढत आहे.
लोकांना आयुष्यात glamour हवें आहे. आयुष्याचं grammer समजून घ्यायचं नाही. ग्रामर म्हणजे शिस्त, ती कुणालाच नको आहे.शिस्तीचा बुरुज इतकां ढासळला आहे की डागडुजीच्या पलीकडे गेला आहे.
परीक्षा केंद्री व्यवस्थेमुळे कोचींगचा व्यापार फोफावला आहे . कोचींग मधून भव्य इमारत समांतर शाळा, शिक्षकाची नेमणूक, स्नेहसंमेलन ,सहल, चित्रपटनिर्मिती ,राजकारण प्रवेश ,काय-काय मनसुबे साध्य केले जातात हे विचारू नका.
कोचिंगचा ब्रँड बनत आहे .अनेक शाखा निघत आहेत.
कोचिंग वर नियंत्रण नाही, अभ्यासक्रमाचेओझे कमी करण्यावर नियंत्रण नाही, शैक्षणिक कामें कमी करण्यावर नियंत्रण नाही. ही सर्व विदारक परिस्थिती, ही सर्वांना अवगत आहे. पण प्राधान्यक्रम कशाला द्यायचा याची गणितं प्रत्येकाची वेगळीं वेगळीं आहेत.
शिक्षणावरील खर्चाच्या तरतुदीपेक्षा जाती निहाय ,मतां नुसार तरतूदिला प्राधान्य दिले जात आहे.मते जिथून जास्त मिळतील तिथे खर्च जास्त केला जात आहे.
आर्थिक तरतूद नसलेले शैक्षणिक धोरण अभ्यासक्रमात अपेक्षित उंची गाठू शकत नाही.
मुलांच्या प्रतिभाच ओळखल्या जात नाहीत, ओळखल्यातर त्यांचे पालन पोषण होत नाही.
परीक्षेचे निकाल एक्झिट पोल प्रमाणे लागत आहेत. प्रश्नपत्रिका माहीत असतात, परीक्षक माहीत असतात. ठरवून निकाल लावलें जातात.कोचिंग मुळे, पेपरफुटी मुळे, मुलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो.
इडी संचनालय आता स्कॉलरशिप च्या संदर्भात चौकशी करणार आहे.स्कॉलरशिप आली किती व वाटली किती ,वाटप करण्यात भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय आहे.
दलाली घेणारे शिक्षण क्षेत्रात असल्यावर शिक्षण अस्वस्थ करणारेचअसणार. निवड प्रक्रियेत गुणवत्ता बाह्य घटक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
गुणवत्तेला तुडवून माणसें योग्यता नसताना,महत्त्वाच्या जागी विराजमान होत आहेत.
भवतांल इतकं बिघडलंय की केवळ शिक्षणाची मलमपट्टी पुरेशी नाही. सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक भवतांल ही सुधारावं लागेल. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा लागेल.
राजकीय जाहीरनामा मध्येच शिक्षणाची अनास्थां दिसते.जाहीरनामा वैधानिक इशारा झाला आहे.औपचारिक झाला आहे.
नवीन जाहीरनामा आणि नवीन शैक्षणिक धोरण सारखेच आहे. अमलबजावणीत दोन्ही सारखेच.
अभ्यासक्रम, इतिहास सोयीस्करपणे लिहिले जात आहेत. आत्मा हरवून बसलेली पाठ्यपुस्तके व्यक्तिमत्व परिवर्तनात अपयशी ठरत आहेत.
सगळं चुकत चाललेलं, चुकत असलेलं क्षेत्र म्हणजे शिक्षण. शिक्षण आणि प्रशिक्षण यात गोंधळाची परिस्थिती आहे. शाळा आहे पण शिक्षण नाही प्रशिक्षण नाही अशी परिस्थिती आहे.पाठ्यपुस्तक ज्या वेगाने बदलत आहे त्या वेगाने व सक्षम पणें प्रशिक्षण होत नाही.प्रशिक्षण नसल्यामुळे शिक्षकांचे व पर्यायाने विद्यार्थ्यांची संबोध स्पष्ट होत नाहीत, संबोध स्पष्ट न झाल्याने मुलें साहजिकच कॉपी कडे वळतात.
अभ्यासक्रम बदलला की सूचना मागवल्या जातात, पण समाजाचा मोठा भाग या बाबतीत उदासीन असतो.मग लादलेला अभ्यासक्रम नकोसा असला तरी तो तसाच ठेवला जातो.
ज्या काही सुचना येतात त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून लोक उदासीन असतात.
दूरदृष्टीचं नियोजन आणि अंमलबजावणी करणारे प्रशासन या बाबी शिक्षणक्षेत्राला पुन्हा लौकिक मिळवून देऊ शकतात.
राजकारण्यांचा प्राधान्यक्रम जोपर्यंत शिक्षण होत नाही, तोपर्यंत शिक्षणाचे चित्र आशादायक होणार नाही.
शिक्षण क्षेत्रात प्रश्नाचं उत्तरच पुन्हा प्रश्न निर्माण करत आहे.शिक्षण हक्क कायद्याने सर्व प्रश्न सुटतील असे वाटले पण या कायद्याने पुन्हा प्रश्न निर्माण केले.
पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण पर्यंत प्रश्नांचे स्वरूप सारखेच आहे. मग प्रवेश असो शिक्षक भरती , प्रशिक्षणअसो, मूल्यमापन असो, परीक्षा असो, परीक्षेचे निकाल असो, गृहपाठअसो, अंतर्गत गुणांची उधळण असो,अभ्यासाचे ओझेंअसो, शिक्षणाचा जीवनात उपयोग, शिक्षणाचा व्यवहारात उपयोग असो. हे सर्व प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.
प्रज्ञे पेक्षा प्रतिभेला महत्व द्यायला हवं. सगळ्यांनाच उत्कृष्ट निकाल हवां आहे. ऊकृष्ट व्यक्तीमत्व नंतर. शाळेत न जाणारे ही असामान्य झाले आहेत. त्यांनी जीवनाच्या शाळेचा अभ्यास केला. आज परीक्षेत यशस्वी होणं गरजेचं आहे. त्यामुळे जीवनाच्या शाळेत यशस्वी होणं हे दुय्यम ठरले आहे .खरं तर याचीच आज गरज आहे. जीवन शिक्षण मिळाले तर शिक्षण बदलेल. मळभ दूर झाल्याशिवाय इंद्रधनुष्य अवतरत नाही.
आज पुन्हा सावित्रीबाई आठवतात. शाळा बंद असल्यावर किंवा नसल्यावर व्यक्तिमत्व विकासाचे काय होतं हे आपण करोना काळात अनुभवले आहे. म्हणून ज्यांनी शाळा उघडल्या शिक्षणाची दारे खुली केली हे स्मरून शिक्षणाला दर्जेदार करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. केवळ शिक्षण नाही तर दर्जेदार शिक्षण ,व्यक्तिमत्व घडविणारे शिक्षण आज आवश्यक आहे.