Photo by Caleb Oquendo: pexels

भवताल सुधारलं तर मुलं सुधारतील. हवी आहे मुलांना एक ऑफलाइन आई... श्यामची आई सारखी आई हवी, वेळ देणारी आई जी मुलाला कुशीत घेईल, गोष्टी सांगेल. स्वतःच्या हातचं मोडकंतोडकं खाउ घालेल.

मुलांना समर कॅम्प ला पाठवणारी आई नको. मुलांना आईच्या तालमीतच जिजाऊ सारखं शिकायला मिळावं.

मुलाला नको पिझ्झा, बर्गर,मुलांना हवेत चांगले संस्कार.

आमच्या मुलांच्या गरजाच अमर्याद वाढल्या आहेत आणि वाढवू दिल्या जात आहेत. मुलांच्या सभोवतांचे जग हे मायानगरी आहे.

प्रलोभनामध्ये मुले न्हावून निघत आहेत. सभोवताली लैंगिक भवताल आहे, ह्याला आळा घालणारे पालक हवेत.

आजचे सगळे प्रश्न नैतिक, लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळेच निर्माण झालें आहेत. मूल्यं व नैतिक शिक्षणाची केव्हांच वाट लागली आहे. आम्हाला लैंगिक शिक्षण द्यायचं आहे ते काही भौतिक सुखानें बरबटलेल्या घरात. प्रसार माध्यमांचा विळखा आमच्या मुलाभोवती इतका आहे की, उत्तान दृश्यं व वासनेने बरबटलेले प्रसंग सातत्याने त्यांच्या डोळ्यासमोर येत असतांना लैंगिक, नैतिक शिक्षण द्यायचं आहे. शिक्षणात मूल्यं रुजण्यासाठी वातावरण निर्मिती आवश्यक असतें. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धती व गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये या प्रश्नांची तीव्रता जाणवत नव्हती कारण नैतिकतेचे संस्कार घट्ट खिळ्यां सारखे रुतून बसलेले असतांना क्वचित मन भरकटत असें. आता घरात व शाळेत अश्लील गाण्यावर व नृत्यावर मुले अंग हलवत व हावभाव करत असतांना.हे लैंगिक शिक्षण देणं आव्हानात्मकच आहे. सध्याच्या कुटुंब पद्धतीमध्ये चार युक्तीच्या गोष्टी सांगणारच कोणी नाही. गोष्टीच्या माध्यमातून नैतिकता, चांगल्या गोष्टी, उपदेश सांगितले जायचे. अनौपचारिकरित्या कसं वागावं याचा वस्तू पाठ असायचा, वेगळं असं लैंगिक, नैतिक शिक्षण नव्हतं.

काय योग्य काय अयोग्य याचा न्यायनिवाडा व्हायचा.

कुणाचा तरी दरारा आसायचा ,जरब असायची व्यक्तिमत्वाची ,त्याच्यामुळे वाकडं पाऊल सहसा पडत नसे.

आता शाळा, कुटुंबात पालकांचा वचक राहिला नाही.

आता काही ठिकाणी पालकच मुलाला घाबरून असतात. पालकांच्या वागण्यानेही सर्व बंधने त्यांनीही झुगारल्यामुळे त्यांनाही नैतिक आधार आपल्या पाल्यांना रागवण्याचा राहिला नाही.

पूर्वीच्या भवतालात संस्काराची आगारं होती. चित्रपटातील गाणी संस्कार करत होती. केवळ नातेसंबंधावर प्रकाश टाकला नाही तर मनाचे भावनिक पोषण केलं. कोवळ्या मुलांसाठी सेक्स आजूबाजूला औषधासाठी ही नसायचं. चांगलेच विचार रुजविणारी ती पिढी होती. सामाजिक चित्रपटांनी संस्कार केले. श्यामची आई सारख्या पुस्तकांनी संस्कार केले. कुटुंब आणि समाजाने सुद्धा संस्कार केले. "वैष्णव जन तो तेणे कहीऐ जो पीड पराई जाने रे" हे गांधीनी शिकवीलें.

नंतर आलेल्या गाण्यांनी, चित्रपटांनी सगळंच बदललं.

आंतरजाल च्या जाळ्यात तरुण पिढी कोळया प्रमाणे अडकली आहे. शाळेतील मुलं फेक अकाउंट उघडतात आणि अश्लीलतेच्या चर्चा करून बलात्कार पर्यंत जातात, तेव्हा पालकांनी नक्कीच गांभीर्याने ही बाब घ्यायला हवी. या आधीची पिढी अभिजात वांग्मय, अध्यात्मावर, नैतिकतेवर पोसली गेली.पालख सुधारले तरच बालक सुधारतील.

अनेक नियंत्रित, अनियंत्रित गोष्टींचा वावर आमच्या सभोवताली आज आहे. आम्हीच तो निर्माण केला आहे.

एका उच्चभ्रू समाजाच्या कार्यक्रमात अश्लीलता बोलली जात होती. निर्भया प्रकरण झाले तरी निर्भयपणे स्त्री विटंबना चालूच आहे. नको त्या वयात नको ते पाहिलं की मुलं अस्वस्थ होतात, उद्ध्वस्त होतात. अभ्यासाची चर्चा न करता अश्लीलतेची चर्चा करून सामूहिक बलात्काराचा गृहपाठ करण्यापर्यंत त्यांची मजल जाते.

कालांतराने प्रेम, अनुनय, शृंगार, प्रणय, यौवन शब्दांना अर्थ राहणार नाही. वासना हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे असे वाटणारा एक वर्ग तयार होत आहे.भावविश्व काम विश्व झालं आहे. शाळा, घर यांना घरघर लागली आहे. घराला घरपण देणारी माणसे राहिली नाहीत.

मुलांच्या नशिबात श्यामच्या आईची कुशी नाही तर मोबाईल च्या कुबड्या आहेत. प्रेमस्वरूप आई हे त्यांच्या कानावर पडतच नाही तर हॅपी मदर्स डे एवढेच त्यांच्या कानावर पडतं. पूर्वीची पिढी पालकांच्या धाकात होती जी आज बालकांच्या धाकात आहे.अश्लीलता घरात आली आहे, मालिकेतही आली आहे चित्रपटात, साहित्यात आली आहे. संस्कारांचा टिपकागद किती पुरणार? वन व शरीर जेव्हा लय हरवुन बसतं तेव्हा जीवनाचा ताल बिघडतो.

घरच्याबरोबर नको ते मुले पाहतात. मुलेही शॉक एब्सोरबर झाली आहेत. रक्तात काय भिनतं याला खूप महत्त्व आहे,संस्कार की विकार. श्यामच्या आईच्या संस्काराला गाडून वासनेने बरबटलेल्या इमारतीत मुले हसत खेळत बागडत आहेत. त्यांच्या समोर निसर्ग येतंच नाही. फक्त अश्लीलतेचा संसर्ग येतो.

मुलांना चांगले ऐकू द्या चांगलं पाहू द्या आस्वाद घ्यायला शिकवा, रसग्रहण करायला शिकवा, सामाजिक उत्तरदायित्व शिकवा,निसर्गाच देणं, नक्षत्राचा देणं, शरदाचं चांदणं, शब्दांच्या पलीकडे जायला व विचार करायला शिकवा,हेच शिक्षण त्यांना तारेल.

हतबल पालकांनी कठोर व्हायची वेळआलीआहे.

अनैतिकतेला लॉकर मध्ये टाकायची वेळ आली आहे. भवताल सुधारणं हेच खरं नैतिक, लैंगिक शिक्षण होय.

.    .    .

Discus