माणसें घडतात ती प्रेरणेमुळेच. आपल्या अवतीभवती असलेल्या प्रेरणेचा शोध घ्यायचा असतो. काही व्यक्तिमत्वें काळाच्या ओघात विस्मृतीत जातात,काही व्यक्तिमत्त्वें दुर्लक्षित राहतात. जेव्हा एखादी व्यक्ती कल्पने च्या पलीकडे जाऊन काहीतरी करते, असाध्य गोष्ट साध्य करते, अपंगत्वाचा बाऊ न करता त्यावर मात करते,व इतिहास घडविते त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागते. शरीराने अपंग असलेले मनाने अपंग नसतात.खेळाडू परिपूर्ण असावा त्याच्यामध्ये कोणतच व्यंग नसावं अशी सर्वांची इच्छा असते पण अनेक खेळाडूंनी व्यंग असतानाही यशश्री खेचून आणली आहे. व्यंग असून खेळणं वेगळं आणि अनेक पदकांची माळ गळ्यात घालून प्राविण्य मिळवणं वेगळं .
असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे बाबा 'पँथर' सिधाये उर्फ यशवंत प्रभाकर, जे पहिलेच मूकबधिर क्रिकेटपटू होते.
सिधिये हे रणजी ट्रॉफीमधील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेटपटूंपैकी एक होते. कव्हर्स मध्ये ते चपळ क्षेत्ररक्षक होते त्यांच्या वेगवान हालचालीमुळे त्यांना पॅंथर असे संबोधले जात असें, त्यांच्या नावावर तीन जागतिक विक्रम आहेत ज्यापैकी एक लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने प्रमाणित केला आहे.असे म्हणता येईल की बाबा सिधाये यांचा जन्म चुकीच्या दशकात अशा वेळी झाला होता जेव्हा भारतात टीव्ही संच सहज उपलब्ध नव्हते.त्यांनी1952 ते 1968 पर्यंत महाराष्ट्र, मुंबई आणि रेल्वेसाठी 42 रणजी सामने खेळले आणि अनेक सामन्यांमध्ये 10-15 षटकार मारले. मैदानावरील या माणसाचा पराक्रम इतका होता की त्याने आपल्या धारदार क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्रचंड विकेट्स मिळवल्या,हेच मुख्य कारण आहे की ते त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये 'पँथर' म्हणून ओळखले गेले. ते अधूनमधून लेग स्पिनर होते आणि त्यांनी त्याच्या कारकिर्दीत 10 विकेट्स घेतल्या.त्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नसली तरी, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या संघांविरुद्ध त्यांनी राज्य आणि विभागाचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, सिधाये तळागाळातील प्रशिक्षणात तीव्रपणे गुंतले होते.
बाबा पँथर सिधाये हे भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कारास पात्र आहेत कारण त्यांनी आपल्या आयुष्यातील 57 वर्षे युवा क्रिकेटच्या मनाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कठोरतेसाठी तयार करण्यासाठी समर्पित केले.
नागेश कुकुनूर यांचा 'इकबाल' हा चित्रपट यशवंत प्रभाकर यांच्या सत्यकथेवर आधारित होता, परंतु त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांना या चित्रपटाची प्रेरणा म्हणून कोणतीही मान्यता देण्यात आली नाही.
त्यांच्या खऱ्या जीवनकथेवर आधारित 'इकबाल' या चित्रपटाचे श्रेयही त्यांना दिले पाहिजे.पेप्सी आयपीएल सारख्या कार्यक्रमाला जगभर गाजावाजा करण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करणारी बीसीसीआय देशातील पहिल्या मूकबधिर क्रिकेटपटूसाठी किमान एवढे तरी करू शकते कारण यशवंत प्रभाकर हे केवळ त्याच्या आश्चर्यकारक विक्रमांचे सर्व श्रेय घेण्यास पात्र नाहीत तर त्यांना त्यांच्या मर्यादा असूनही एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून देशाने ओळखले पाहिजे.
माणसातील वैगुण्यें प्रेरणेमुळेच फुलतात. अपंगाशी समाज अंतर ठेवून वागतो, काहीजण नुसती सहानुभूती दाखवतात. अनेक अपंग नैराश्याचा गर्तेत स्वतःला झोकून देतात.कॅलिडोस्कोप मध्ये बांगड्यांचे तुकडे एकत्र व एकसंध झाले की सुंदर डिझाईन तयार होते.मानवी मन हे एक कॅलिडोस्कोपच आहे.
मनाने ठरविले तर शारीरिक अपंगत्वाचा सुंदर
आविष्कार होऊ शकतो.प्रेरणा ही एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेली देणगी असते.प्रेरणेचे जतन,मनन चिंतन म्हणून आवश्यक असते.
काही दगडांनी गाडून घेतल्याशिवाय सुंदर इमारत उभी राहत नाही, तसेच काही व्यंगांना गाडल्याशिवाय व्यक्तिमत्व फुलत नाही. ब्रेल ने विकसित केलेल्या लिपीमुळे व त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक अंध आज वाचू व लिहू शकत आहेत.
अनेक दिव्यांगांनी प्रेरणेच्या पायवाटेनेच आपले आयुष्य समृद्ध करून इतरांना संदेश दिला आहे.
व्यंगावर मात करण्याची प्रेरणा सर्वांसाठी एक यशोगाथाच आहे. समाजातील मरगळ दूर करण्यासाठी काही यशोगाथाच उपयोगी पडतात. दगडाच्या छोट्या कपारी मध्ये सुद्धा छोटासं पिंपळाचं रोपटं प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतंच. स्वतः स्वतःतून उमलता यायला हवं. मनुष्य अनुकरणशील प्राणी आहे. चांगल्या प्रेरणांचं अनुकरण व्हायलाच हवं. व्यंगा समोर हार न मानणं ही सुद्धा प्रेरणाच असते.