Photo by Álvaro Serrano on Unsplash
जीऐ तुम न जाने किस जहां मे खो गयें..
चिठ्ठी न कोई संदेश तूम कहां गयें.
जिऐ तो जिऐ कैसें बिन आपके.
या भावना आजच्या पिढीच्या आहेत. येणाऱ्या पिढीलाही जीऐ काळायला हवेत. काही साहित्य तुमचं भावनिक पोषण करतं. जीएं च साहित्य त्यापैकीच एक.
जीवनाच्या अनेक संचिता पैकी जीएचं असणं हे एक संचित आहे. आपल्या अवती भोवती अनेक समृद्ध व्यक्तिमत्वें असतात, सकस लेखन असतं,आपलं जीवन ज्यांच्या मुळे समृद्ध होत असतं.काहीमाणसांच असणं डोक्यावर छत्र असतं. जीएंच साहित्य अनेकांच्या दृष्टीने मुदत ठेव आहे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुखद आहे.भावणारे साहित्य लिहणेंआपल्या आवाक्यात जरी नसले तरी वाचण्यात व ऐकण्यात ते आपलंच असतं.
माणसें येतात आणि जातात पण त्यांचं साहित्य मनात घर करतं. मनात घर करणाऱ्या गोष्टीच मनात तग धरतात. शब्दांच्या पलीकडे गेल्यानंतरच जीएंच साहित्य व त्यातील सौंदर्य कळतं
काही गोष्टींची अनुभूती घ्यायची असतें, काही गोष्टी फक्त जगायच्या असतात.जीएंचं साहित्य या प्रकारात मोडतं.
माणसें जाताना केवळ आठवण मागे ठेवून जात नाहीत, तर विचार मागे ठेवून जातात, अस्तित्व मागे ठेवून जातात. माणसाला मरण असतं, विचारांना मरण नसतं. साहित्याने दुःखं सहन करण्याची प्रतिकारशक्ती वाढविली आहे,अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे,वास्तवाची जाण करून दिली आहे.
जीऐ म्हणजे एक साहित्यातलं अस्वस्थ करणारं नांव. अस्वस्थ साहित्य मनाला चटका लावतं, चिरकाल स्मरणात राहतं.पीएल. विवा.जीऐ हे साहित्यातील दीपस्तंभ आहेत. जीए. चे साहित्य म्हणजे एक जीवन प्रवास आहे. काही साहित्य काही गाणी अस्वस्थ करण्यासाठीच वाचायची, ऐकायची असतात . दुर्बोधतेततही जसा ग्रेस असतो तसं अस्वस्थतेत जीए असतात. जीएला लिहीलेल्या एका पत्रात ते म्हणतात"मी तुमच्या काही कविता वाचल्या( सगळ्या नाही) मला वाटते ,काही वेळा तुमची कविता झाडावरून खुणावणाऱ्या या आकृती कोण आहेत याचा शोध घेत जास्तच गर्द गडद हिरव्या अंधारात पुढे जात आहे.हे देखील प्रत्येक निष्ठावान कलावंताच्या बाबतीत अटळअसते. आपल्या पावलांचा प्रवास आपणच ठरवण्याचे सामर्थ आपल्याला असत नाही;तो बदलण्याची अगर थांबवण्याची शक्ती देखील आपल्याला लाभात नाही. इतका तो अटळ, अनावर असतो .मग समोर दिसत असलेले तुडवावे लागणारे वाळवंट असो ,अगर एकही हिरवा स्पर्श नसलेली उघडी टेकडी असो. पलीकडे काय आहे याची काहीच कल्पना नसते, पण तिकडे गेलेच पाहिजे ही ओढ मात्र सतत असते. कुणास ठाऊक काही वेळा हा प्रवास ते मृगजळ आहे हे माहीत असूनही मृगजळाकडे देखील असू शकेल. आपण तिकडेच का चाललो आहोत हे इतरांना कधी उमगणार नाही, त्यांना कधी समजावून देता येणार नाही ,कारण हा एक अत्यंत एकाकी प्रवास असतो. हा तर प्रत्येक कलावंताच्या आयुष्याच्या दाह असतो आणि तोच सुगंध देखील . माणूस म्हणून जन्माला येणे म्हणजे एकाकी जगण्यासाठीच येणे आहे. आईला चिकटलेली नाळ तुटली, हा अखेरचा संबंध तुटला की प्रत्येक माणूस एकटाच उरतो. सगळ्यांनाच डोळे असतात खरे,पण हे 'झाड बघ म्हणताना'मला दिसलेले झाड दुसऱ्याला दिसत नाही, मला दाखवता येत नाही. आपला आनंद सर्व अर्थांनी दुसऱ्या पुढे ठेवता येत नाही, दुःख सर्व उत्कटतेने दुसऱ्याला स्पष्ट करता येत नाही ,त्यामुळे कलावंताचा प्रवासा सदैव एकाकीच असतो . आणि एवढे झाल्यावर मृत्यूचा तर अत्यंत एकाकी क्षण !एवढ्या प्रवासात आपण काय मिळवले हे देखील स्वतः आपल्यालाच न देणारा तो क्षण !कारण आपण एवढे पाहिले हे उमगायला जाणीव हवी.आणि जाणीव आहे तोपर्यंत प्रवास संपलेला नसतो. जाणीव संपली की मग सारेच संपले. सगळा हिशोब संपतो ,पण तो हिशोब काय झाला हे समजण्याचे देखील समाधान लाभत नाही.पण हेगेलने मृत्यूच्या वेळी काढलेले उद्गार मात्र मनातून जात नाहीत तो म्हणाला "Nobody understood me except myself and I didn't understand myself at all"अखेर शेवटी आपण स्वतःला समजत नाहीसे होतो. हा खरा शोकाचा क्षण. Tolstoyच्या बाबतीत' do I understand myself '?हा प्रश्न तो स्वतः एका रेल्वे स्टेशनवर मरेपर्यंत कायम राहिला. काहीना हे प्रश्न दिसतातच, मुक्तता करून घ्यावीशी वाटते.
Zweigने विष प्राशन केले. pavese नेआत्महत्या केली . Hemigway ने बंदुकीची नळी तोंडात घेतली. नाही Sylvia plathझोपेच्या गोळ्या घेतल्या आणि Berrymar ने पुलावरून नदीत उडी घेतली. मी कवी नव्हे,ते आपल्या आवाक्याबाहेरचे आहे हे एक फार मोठे असमाधान मला वाटत आले आहे. एक साधा कवी -आंब्याचा झाडाची सावली काळी नसून गडद जांभळी आहे हे सांगण्यापुरता, शेवग्याच्या झाडावरील फुले हिरव्या सौम्य लाटेवरील फेसाप्रमाणे दिसतात एवढेच दाखवण्यापुरता, पण काही क्षुद्र ,नतदृष्ट क्षणी असेही वाटते बरे झाले एकादृष्टीने मी कवी झालो नाही ते! कोणी सांगितले ते आभाळात जन्मायचे, एका क्षणापुरते निर्वीकार पोकळीत दाहकपणाने जगायचे, आणि शेवटी मातीत मातीमोल व्हायचे. माझे किरकोळ मनतर केव्हाच तडकून गेले असते. पण कोणत्याही तारेची भावना नसतानाही काही माणसे चिरडून गेलेली मी पाहिली आहेत. मी हे सारे का लिहिले कुणास ठाऊक! तुमच्या एक दोन कविता वाचताना थबल्यासारखे झाले, म्हणून असेल .मी थांबणार आहे.नंतर कदाचित शब्द ओळी माझ्याकरता चमकतील. कविता निर्माण होण्याचा ज्याप्रमाणे एक क्षण असतो त्याप्रमाणे वाचकांसाठी तो चमकण्याचाही एक क्षण असतो"
केवढी ही गहन विषयावर चर्चा हेच जीएं पासून घेण्यासारखे आहे. समोरासमोर जेवढी माणसे मोकळी होत नाहीत तेवढी पत्राने होतात.
अस्वस्थतेतही जगणं असतं.दु:खीं गाण्यांनीच आम्ही अस्वस्थ होतो,रडतो,मन मोकळे करतों.मनाचा निचरा होणं व्यक्तीमत्वां आवश्यक असतं.
मानवी भावभावनांची स्पंदनं टिपणारा टिपकागद म्हणजेच पत्र होय. पत्र लिहिणे म्हणजे एकमेकांच्या सुख दुःखांना वाट करून देणे होय. पत्र म्हणजे मन हलकं करणारा प्रवास. सभोवतालच्या नावडत्या जगात राहत असताना एकांतात प्रिय व्यक्तींच्या आठवणीसह राहणं पत्र घडवून आणतं. सुखाचे अनेक प्रसंग आणायचे असतील तर पत्र लिहावं व दु:खांना मोकळी वाट करून द्यायची असेल तरीही पत्रही लिहावं हे जीए पाहूनच कळतं.समोरासमोर न बोलणारी माणसें पत्रातून दुथडी वाहिल्याप्रमाणे व्यक्त होतात. पत्राच्या माध्यमातून माणसाचं अंतरंग कळतं,आता पत्र बंदच झाली.माणसांच अंतरंगच नव्हे तर स्वार्थ कळायला आता विधानसभा सत्र हे परिमाण आहे. पत्रातून निरपेक्ष प्रेम करणारी माणसें आता राहिली नाहीत. विश्वासासाठीआता पत्र नाही सत्र आवश्यक ठरत आहे.
पत्र हे एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला ठेवा आहे तो जपायलाच हवा. मानवी मनाला, मानवी भावनेला किती तरंग किती पदर असतात हे पत्रातून व्यक्त होतं.पत्रातून मानसशास्त्र, तत्वज्ञान हे विषय आपोआप कळत जातात. मनाच्या गाभ्यापर्यंत जाण्याचं पत्र एक साधन आहे.जीए
यांनी असंख्य पत्र हजाराच्या घरात, महात्मा गांधी नंतर कदाचित त्यांनीच पत्र जास्त लिहिली असावीत ,त्याची चार खंड आता प्रकाशित होत आहेत.
माणसे तुसडी वाटतात, अलिप्त वाटतात पण पत्रातून ती खरी उलगडत जातात. भावनेचं पालन पोषण पत्रामुळेच होतं. पं. नेहरूंनी जेलमधून आपल्या कन्येला पत्र लिहून तिला घडविले. प्रत्यक्ष सहवास जेव्हा नसतो तेव्हा पत्रातूनच व्यक्तिमत्त्वाचा आभास अनुभवता येतो.माणसांचा आभासही माणसांना घडवितो.
आयुष्यातील वैफल्याची पोकळी भरून काढणारं पत्र हा एक परीस स्पर्ष आहे. आहे मनोहर तरी
पत्रातून व्यक्त झालेली भावना ही जगण्याला बळ देते . जे बळ देतें तेच अर्थ देते. माणसांना सुबतत्ता पेक्षा समाधान हवं असतं. मानवी मनाच्या गाभाऱ्यात भावनांची समई तेवत ठेवावी लागते. व्यक्त होण्यानें किंवा पत्रानेच माणसांच्या मनात आशेचा किरण डोकावतो.
संवाद नाही पत्र नाही अशा परिस्थितीत माणसे ओक्के कशी राहणार?डोंगर, झाडी, हॉटेल पेक्षाही माणसांना भावनेची भूक असते. निंदकाचे घर असावे शेजारी अशी म्हण आहे पण पत्र लिहिणाऱ्याचेही घर जगाच्या पाठीवर कुठे तरी असावं ,या गोष्टी व्यक्तिमत्व विकासासाठी खूप आवश्यक आहेत. जी.ए.च्या पत्रांना वेगळाच गंध आहे. सुनीताबाई देशपांडे, कवी ग्रेस ,डॉ. मिथिला ग्रेस या जिव्हाळ्याच्या माणसांना पत्र लिहिणें हा त्यांचा छंद होता. स्वभाव जुळायला आणि पत्र लिहायलाही एक प्रकारची वेव्हलेंथ आवश्यक असते. सहजासहजी कोणाचेही कोणाशी स्वभाव जुळत नाहीत. आपलीच माणसे जेव्हा अंतर राखतात तेव्हा कुठेतरी माणसे विरंगुळा शोधतात . घरात संवाद नसेल किंवा विसंवाद असेल तर माणसे पत्राने मोकळी होतात. प्रतिभाच प्रतिभेला साद घालतें. केवळ भौतिकतेत माणसे रमत नाहीत. माणसाच्या मनाचे हळवे कोपरे जपलें तरच माणसे फुलतात व पारिजातकाच्या सड्या प्रमाणेप्रमाणे दुसऱ्याचं अंगण सजवतात.आपण कोणाच्यातरी मर्जीत आहोत म्हणजे त्यांच्या देवघरात आपली छोटीसी मूर्ती असणं होय.विश्वासाने मान टेकणारे खांदे व वंदनीय पाय आज दुर्मिळ झालेआहेत.मैत्री शोधतात माणसें पण कोणाशीही ती रत होत नाहीत.आतडं पिळवटून टाकणाऱ्या आतड्याच्या माणसाशीच स्वभाव मिळतात. माणसाचं अस्तित्व ठराविक माणसाच्या सहवासातच , संवादातच,साहित्यातच फुलतं. आतड्याची माणसं हा जीऐ.चा शब्द. जीऐ मध्ये एक ग्रेस आहे.काही काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत,त्या समजल्या वरच त्यातला ग्रेस कळतों,मग ते लिखाण असो, संगीत असो, नृत्य असो,त्यातले बारकावे आणि अर्थ कळला की ते आपलेसें होऊन जातात. माणसं समजायला माणसं वाचावी लागतात.
वरवर शांत वाटणारी माणसे शांत समुद्रासारखी वाटतात पण भावनेला वाट करून देतांना त्यांचा धबधबा होतो. पाण्याला जसं पात्रातून वाट करून द्यावी लागतें तसंच भावनांना पत्रातून वाट करून द्यावी लागते.
आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींना पत्र लिहिणे हा जी.ए. यांचा छंद होता. मैत्रीचा संवाद कवितेपासून सुरू झालेले हे नाते त्या पलीकडे जाऊन त्यामध्ये मनांचे गुंतवणे होते. पत्रात म्हटल्याप्रमाणे हे नाते आयुष्याला सुखावणारे होते. आयुष्यभर टिकणारे कृतज्ञतेचे संबंध निर्माण करणारी जीऐयांची पत्रवेळा मनाचा ठाव घेते. पत्र छंद म्हणूनही नाही व कर्तव्य म्हणूनही नाही लिहिलं जात. जीऐ कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पत्राबद्दल वाचकांना नेहमीच उत्सुकता वाटली आहे ,त्यांच्या निवडक पत्रांचे चार संग्रह प्रसिद्ध झाले असले तरीही अजूनही अनेक महत्त्वाचे पत्रे अप्रकाशित आहेत.पत्र लिहिताना ते एकदा म्हणतात पत्राला काहीच कारण नाही पण लिहीत आहे, शिवाय पत्रात मी काय लिहिणार आहे याचीही कल्पना नाही. येथे मन थोडे मोकाट करून उधळून देणार आहे. एका पत्रात ते ग्रेस यांना म्हणतात" विशाल वगैरे श्वापदाप्रमाणे वाटणाऱ्या आयुष्याने मध्येच एक डोळा उघडून आपल्याकडे रोखून पहावे तसा अनुभव देणारी तुमची कविता! मला कवी होता आले असते तर माझ्या शब्दांना अर्थांचा थोडा तरी स्पर्श झाला असता".
ग्रेस असो किंवा मिथीला असो किंवा सुनीताबाई असो सर्वांशी पत्रातून तात्विक पातळीवरची चर्चा
कुठेही वैयक्तिक सुखदुःखाची, खुशालीची चर्चा नाही. मैत्री संबंध केवळ रक्तात नसतात तर मनात असतात, पत्रात असतात. यांची पत्रे व त्यांना आलेली पत्रे मानवी संबंधावर, भावभावनावर प्रकाश टाकतात. शरीरानें व्यक्त होणं यांत्रिक असतं, मनाने व्यक्त होणं सांस्कृतिक असतं.
पत्र लिहिण्याची संस्कृती अस्ताला गेल्यामुळे माणसांना हक्कांच्या जागाच राहिल्या नाहीत. व्यक्त होण्यासाठी साहित्य मोलाचं ठरतं.
पत्र एक आठवणीतं मोरपीस असतं.अनेकजण ते मनाच्या पुस्तकात जपून ठेवतात.पत्र म्हणजे व्यक्तिमत्त्वाचाआरसा. भावनेचा पारा उडाल्यामुळें व्यक्तिमत्त्वें धुसर झाली आहेत. एकमेकांना माणसे ओळखीनाशी झाली आहेत.भावना व्यक्त करणारी मर्मस्थळें राहिलीच नाहीत. व्यक्तिमत्वाची कोडी पत्रांनीच उलगडली आहेत. सुनीताबाई देशपांडे आणि जीऐ कुलकर्णी यांच्या पत्रांनी व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग काय असतात आणि तें कसे व्यक्त करायचे ते शिकविले.पत्र नावाचं एक सत्र आमच्या आयुष्यातून अस्तंगत होत चाललं आहे. त्याची मोठी किंमत आम्हाला मोजावी लागत आहे.सोबतीसाठी आता पत्र नाही सोबतीचा करार करावा लागतो. तुरुंगात माणसं कैद करता येतात पण तुरुंगातून लिहिलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूच्या पत्रांनीच एक मुलगी घडवली.पत्राचा वंश हळूहळू नष्ट होत आहे. पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, सुगंधीपत्र लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. पत्र लिहिण्यासाठी भावनांची शाई आटली आहे.भावनांचं आदान-प्रदान करणारं पत्र,आज अचानक गायब झालं आहे. पत्रांनी अनेक व्यक्तिमत्त्वाला आकार दिलाय, अनेकांना फुलवलंय तें पत्रांनीच.किती जणांचे आयुष्य पत्रानी घडवलं, किती जणांना व्यक्त व्हायला व्यासपीठ पत्रांमूळेच मिळालं.माणसाच्या मनातले तरंग एरवी विरून गेले असते पण पत्रामुळे त्या भावना मना मनात पोहोचतात.पत्रा मूळे व्यक्तिमत्व समृद्ध झाली, त्यांना वळण लागले, शिस्त लागली. पत्रातून माणसं घडलीं, पत्रातून इतिहास घडलां,ध चा मा पत्रातच झाला आणि इतिहास बदलला. पत्राला समृद्ध वारसा आहे. पत्र म्हणजे आयुष्याची सुंदर ठेव जपून ठेवावी वाटणारी.जणु अत्तराच्या कुपीतले अत्तर.
पत्र म्हणजे पारिजातकाचा सडा. दुसऱ्याच्या अंगणात पडून, त्यांना सुखावणारा तो ऐक मित्र आहे.
पत्रलेखनाचीही आज स्पर्धा ठेवावी लागते, किती दुर्दैवी. ज्या पत्रांनी प्रेम व्हायचं, ज्या पत्रांनी मानवी मनं ताळ्यावर यायची, ज्या पत्रानें भांडणं सोडविली जायची, ज्या पत्रांनी आयुष्यात दिपस्तंभ दाखवला, ती पत्रं कुठे गेली?
संवादाचे उत्कृष्ट माध्यम म्हणून पत्राकडे पाहिलं जातं. काही ठिकाणी मित्रंच हवे असतात, काही ठिकाणी पत्रंच हवे असतात. मित्राची जागा कोणी घेऊ शकत नाही, तसं पत्राची ही जागा कोणीच घेऊ शकणार नाही.
लिहायचा कंटाळा म्हणून आज पत्रलेखन त्या प्रमाणात होत नाही. पत्र म्हणजे भावनांना टिपणारा टिपकागद.टिपकागदच नसल्यामुळे भावनांचं साचलेपण मनाला त्रासदायक ठरत आहे. व्यक्त व्हायला माध्यमांची कमतरता नाही,तरीही पत्र हवेंच. पत्रलेखनाचे कष्ट आज राहिलेच नाहीत.मोबाईलवर बोटं चालवली की मिनिटांत पत्र तयार होतात, आणि मिनिटात जातातं सुद्धा.
पत्र पोहोचवणारी कबूतरं आज राहिली नाहीत. पोस्टमन दुर्मिळ झाले आहेत. मुलांना पोस्टमन ही संकल्पनाच नाही. कधीतरी पत्रं घेऊन पोस्टमन येतो. सगळा व्यवहार मेल ने होतो. पत्र नसताना जी घालमेल होते ही मानवी मनाला त्रासदायक ठरते.पत्र आहे म्हणून जीवनात एक सूत्र आहे,सुसूत्रताआहे.समोरासमोर माणसें एकमेकांशी बोलू शकत नाहीत, पण पत्रांनी ती जास्त चांगल्या प्रकारे व्यक्तं होतात.
माणसांचे मन व्यक्त व्हायला जागा नसेल तर मन सुन्न होतं.
माणसे जोडली जातात, तशी तोडली ही जातात पत्रांनी. पत्रानें इतिहास घडवला आहे. मानवी मनाला पत्रांमुळे जगण्याची उमेदआहे. प्रेमाच्या शिखराकडे जाण्यासाठी पत्रं ही पहिली पायरी आहे. पत्रातुन जीवनाचे अर्थ शोधायचे असतात,सौंदर्य शोधायचे असते. शब्दांच्या पलीकडे असलेल्या भावना कळायला हव्यात म्हणून पत्र हवच.फक्त रुक्ष व्यवहारासाठी पत्र आज शिल्लक आहे.
परीक्षेतही आता पत्रलेखन विचारलं जात नाही. पत्रलेखन करायला मुळात नातीच शिल्लक नाहीत. कुणाला पत्र लिहायचे. काका, मामा, मावशी, आत्या, मावसबहीण, चुलत बहीण, हे सगळें इतिहासजमा झालेत.
मुलांना नाती समजावुन सांगावी लागतात, की ही तुझी आत्या, हे मामा, कधीतरी येणारे नातेवाईक मुलांच्या स्मरणात राहतच नाहीत. कारण स्मरणात राहायला सहवास आवश्यक असतो. तो सहवास कुटुंबातून हरवला आहे. सहवास नाही म्हणजे प्रेम नाही, आणि प्रेम नाही म्हणून पत्र नाही.
यंत्राने माणसाची बोलतीच बंद केली आहे. पत्र नाही मित्र नाही अशा वातावरणात आजची पिढी वाढत आहे.
पत्र ही दिवाळी अंकात वाचायची गोष्ट ठरली आहे. माणसांना पत्र लिहायला उद्युक्त होईल अशी परिस्थिती हवी.पत्र हसवण्यासाठी, रडवण्यासाठी,मनाला फुंकर घालण्यासाठी आवश्यकच आहे.अब्राहम लिंकनच पत्र आजही आरसा आहे.
पत्राची वाट पाहणं नाही. पोस्टमन येणं नाही. वाट पाहणं ही संकल्पनाच आता गेली. मनाच्या डोहात आजकाल तरंग उठत नाहीत हीच आजची शोकांतिका आहे..
पत्राने परत यावे.सोशल मीडियावर. अनेकजण पत्राची वाट पाहत आहेत ,अनेक कॉमेंट्स पत्राची वाट पाहत आहेत.पत्र आल्यास लोक वेडावून जातील. कधी नव्हे ते प्रेम व्यक्त करतील पत्रावर. अक्षरशः स्तुतीचा वर्षाव करतील. लोकांची सवय मोडणे पत्राच्या हातात आहे.तेव्हा पत्राने परत यावे.
लाईक साठी सुद्धा ईमोजी ची रांगच्या रांग तयार आहे. कॉमेंटचा फॉरमॅट ठरलेले आहे. विचार न करता सगळं आजकाल हे करता येते.लोकांना विचार करायला भाग पाडत ते पत्रच.
असं काही तरी व्हावं की पुन्हा पत्र युग यावं.
जीए सारखे आशयाने ओथंबलेले पत्र लिहिण्याचे दिवस पुन्हा यावेत ...
यासाठी मनाचे पदर मोकळे होण्यासाठी नवीन पिढीला जीऐ कळायला हवेत.