Photo by Tim Marshall on Unsplash
तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इन्सान बनेगा.
कुठे गेलं हे भाबडे पण, आज काही जणांना हिंदूच व्हायचं आहे काही जणांना मुसलमानच व्हायचं आहे, पण इन्सान व्हायचं नाही.व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे प्रत्येकाची कहाणी वेगळी. माणसे म्हणजे केवळ साच्यातल्या प्रतिकृती नव्हेत.
प्रत्येकाचा श्वास वेगळा, हुंकार वेगळा, आकार वेगळा, संस्कार वेगळा विकार वेगळा. गुणसूत्रांच्या समुच्यय ठरवतो कोण कसां. चेहरा नाही मुखवटे ठरवतात माणसांचे वागणे. चेहऱ्यावरून भोळी वाटणारी माणसें मुखवटे त्याला कपटी करतात. माणसाचं वागणं हे सर्व मनावर अवलंबून आहे. मनाचे खेळ कुणाला समजलेत.
मन रे तू काहे न धीर धरे
मन क्यू बहका रे बहका आधी रात में
याची उत्तरे प्रत्येकाची वेगवेगळी आहेत.
वैभव जोशी यांची कविता या बाबतीत खूपच समर्पक आहे.
डोह
एखादा डोह असू द्यावा , अथांग
कुठल्याही क्षणी हक्कानं जावं
आपलं प्रतिबिंबही पडणार नाही
अश्या अंतरावर बसून बघत रहावं
आपण डोहाकडे
डोहाने आपल्याकडे
ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा
ना त्याच्या पाण्यावर तरंग
मुळात अपेक्षाच नसतील
तर कसला आलाय अपेक्षाभंग ?
डोळ्यांनीच विचारावं त्याला
हा स्थायीभाव कुठून मिळाला?
अन हलकेच एखादं पान सरकवत
त्याने दाखवून द्यावं
बरीच आंतरिक उर्मी आहे …..पण तळाला
अशावेळी
ते पान परत पाण्यात सोडून द्यावं
हाती असलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा
असे नाही
प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा
असे नाही !!
माणसांचाही असंच आहे परिस्थितीनुसार माणसे वागतात.परिसथीती त्यांच्या हातात नसतें.
डोहाच्यातरी कुठे हातात असतं तरंग केव्हां, कसें किती निर्माण होतील. काही वाऱ्याने निर्माण होतात,वाऱ्याच्या गतीनुसार तरंग ठरतात,कधी कोणीतरी दगड मारल्यानंतर निर्माण होणारे तरंग हे जाणीवपूर्वक असतात.
पाण्याला स्पर्श केला तरीही तरंग निर्माण होतात. डोहाला तरंगाची कधीकधी कल्पनाही नसते. तसेच शरीर हे बाह्य आकर्षणाने वागतं. कधी कधी ते मनाला विचारतही नाही किंवा मनाला त्याचा थांगपत्ताही नसतो. एखादं कृत्य शरीर करतं आणि मग त्याला त्याचा पश्चाताप होतो कारण त्याला मन असतं.
मनाचा थांगपत्ता लागू न देण्यामध्ये मनाला कोणीच हरवू शकणार नाही.
चेहरे जसं मुखवट्यांचे वागणे व बदलणे थांबू शकत नाही तसेच मनाचा तळ
तरंग थांबू शकत नाही. चेहऱ्यावरचे हावभावही परिस्थितीनुसार बदलतात. अगदी लहान मुलाला हसून आपण खेळवलं तर ते ही हसतं पण रागावलो किंवा दरडावलं तर त्याला ते लगेच कळतं आणि ते ही रडायला लागतं. मानवी स्पंदनांनी मानवी भावभावनांनी माणसांचं वागणं नियंत्रित केलं आहे. आदर दिला तर आदर मिळतो, प्रेम दिले तर प्रेम मिळतं. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो. आपण इतरांशी जसे वागतो तशीच वागणूक आपल्याला मिळतें आणि हे सर्व याची देही याची डोळा आपल्याला पहावं लागतं. इतरांशी जेव्हा माणसे वाईट वागतात व त्यांच्या बरोबर जेंव्हा वाईट घडायला लागतं, तेव्हा त्यांची त्यांना जाणीव होते की आपण असें कसें वागलो आणि कसे वागायला हवे होते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
दुःखाने पोखरलेल्या शरीरावर सुखाचा सदरा घातल्याप्रमाणे माणसें वागतात. बऱ्याचशा वेळेला माणसे असतात एक आणि वागतात दुसरंच. माणसं चांगली नसली तरीही इतरांच्या नजरेत चांगलं राहण्याचा प्रयत्न करतात आणि या नादात ते अनेक नको त्या गोष्टी करून बसतात. सत्य जेव्हा उघडं पडतं तेव्हा त्यांचं रूप कळतं.
एखादं कोडं सुटत नाही तोपर्यंत ते कोड असतं पण सुटल्यानंतर तें कोडं राहत नाही. माणसांच्या वागण्याचंही असंच आहे.काही माणसांचं जगणं साच्यातून निघालेल्या प्रमाणे असतं साचेबद्ध, ते बदलतच नाहीत. काही माणसे मूल्यांवरच जगतात आणि मूल्यांला कवटाळून जगतात, प्राण गेला तरी ते मूल्यं सोडत नाहीत. पण काही माणसांचं वागणं तर्काच्या पलीकडे असतं आपण कितीही तर्क लावले तरी ते अनाकलनीय असतं. असं कां? याचे उत्तर आपल्याला बऱ्याचदा मिळत नाही. एखाद्याच्या वर्तनाबद्दल जेव्हा आपण म्हणतो तो असं करेल असं वाटतच नव्हतं, तो असा वागेल असं वाटलंच नव्हतं, शक्यच नाही तो असं वागणं या सर्व कपोकल्पित गोष्टी एका क्षणात त्याच्याविषयीचं मत बदलून टाकतात. वाल्याचा वाल्मिकी झाल्याप्रमाणे चांगली माणसे वाईट वागतात व वाईट माणसेही कधी कधी चांगले वागतात.
युद्धाला न्याय द्यायचा की बुद्धाला हे शेवटी माणसांचं वर्तनच ठरवतं.