“अनंत मरणें झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी...”
“ईथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे”.मंगेश पाडगावकर यांनी म्हणलेलं किती खरं आहे.अतिशय गरिबी व हालाकीच्या परिस्थितीत राहून आपल्या दोन जुळ्या मुलांना वाढवत असतानाच दोन्ही मुलांनी शाळा शिकत शिकत व भंगार वेचत वेचत नृत्याची आवड जोपासत स्टार प्रवाह वरील जोडी नंबर एक या नृत्याच्या कार्यक्रमात पहिल्या दहा मध्ये स्थान पटकावले.
नंदा मोरे यांनी काही काळ भिकही मागितली व आज त्या रोजंदारीवर महानगरपालिकेच्या कर्मचारी म्हणून काम करतात.
मुलें सेलिब्रिटीं होण्याच्या मार्गावर असली तरी आजही नंदा मोरे आपले रस्ता झाडण्याचे काम करतात. त्या म्हणतात की त्यांना या कामाची अजिबात लाज वाटत नाही, उलट स्वाभिमान वाटतो. एकदा एका बागेमध्ये नृत्याचा कार्यक्रम चालू असताना दगडा वर दगड ठेवून मुलांनी तो कार्यक्रम डोकावून पाहिला व त्यानंतर त्यांना त्याचे वेडच लागले, त्यांनी आईला खूप म्हणून पाहिले पण आईने सांगितले की आपली परिस्थिती नाही. मग मुलांनी भंगार विकून जे पैसे मिळत होते त्यातले काही भाग ते आईला देत व काही भाग शेजारणीला बचत म्हणून त्यांच्याकडे ठेवत असत. मुलांचे नृत्याचे वेड पाहून आईने नृत्य शिक्षकाला
विचारलं असतां एका मुलाची फी ८००रू.असे त्यांनी सांगितले.शेवटी ८००रू. मध्ये दोघांना शिकवायचें ठरलें.
नंतर मुलांनीही मागे वळून पाहिलेच नाही.
कलर्स, मनोरमा, स्टार प्रवाह व इतर वाहिनीवरील कार्यक्रमात त्यांनी भाग घेत अभ्यास करत करत आपले छंदही जोपासलें.
एका प्रायोजकानें त्यांना ६ महिन्या साठी कार्यक्रमासाठी स्टेज शो करण्यासाठी दुबईला नेलें.
दोघांनीही आज वारजे व कोथरूड येथे क्लासेस उघडले आहेत.अजून जम बसला नाही, पण संघर्ष चालू आहे.
आईलाही मुलाखती साठी वाहिनीवरील कार्यक्रमात नेहमी बोलावतात.
नंदा मोरे यांना गरीबीमुळे शिक्षण घेता आले नाही.
आजही त्यांचं एकत्र कुटुंब आनंदाने राहतं.
मोठा मुलगा त्याचं कुटुंब व एक मुलगी विवाहित असूनही पती वारल्यामुळे तिच्या मुला सह तीही आईकडेच राहते व ही दोन जुळी मुले सुद्धा आईकडेच राहतात.
मुलांना कसल्याही प्रकारचे व्यसन नाही. आपल्या आई विषयी प्रेम व अभिमान त्यांना आहे. आपल्या आईने केलेल्या कष्टाची जाणीवही त्यांना आहे.
आईला मिळणाऱ्या पंधरा-सोळा हजार पगारावर सर्व कुटुंब चालवण्याची जबाबदारी असल्यामुळे आजही नंदा मोरे रोज सकाळी सहजानंद सोसायटी व वृंदावन कॉलनी कोथरूड मध्ये सकाळी चार तास रस्ता साफ करण्याचे काम करतात.
लोक जेव्हा विचारतात आम्ही तुम्हाला टीव्हीवर पाहिलं पण तेवढ्याने संसार कुठे चालतो? संसार चालवण्यासाठी कष्ट, श्रम करावेच लागतात. गरीबीला लाजू नये व श्रीमंतीने माजू नये हे त्या प्रत्यक्ष जगतात. अजून अच्छे दिन त्या कुटुंबाला आले नाहीत पण तरीही आहे त्यात समाधान मानून जीवनाचे रडगाणे त्या गात नाहीत.
सभोवताली नैराश्य, दुःखं ,दारिद्र्य असतानाही आपल्या कौशल्याला ओळखून त्याला वाव देण्यासाठी एकदा मनाने निश्चय केला की काय करता येतं याचं हे उदाहरण आहे.
खडतर प्रसंगातूनच व्यक्तिमत्व आकार घेत असतं.
आमच्या असंख्य मुलांना आजही आपल्यातील सुप्त गुणांची ,कौशल्याची जाणच होत नाही. अनेक कुटुंबातही आजही
जरा छंदा ऐवजी अभ्यासात लक्ष दे असेच सांगितलं जातं.
आधी शिक्षण मग सृजन हाच पायंडा अनेक कुटुंबात आहे.
शाळेत सुद्धा गुणवत्ता यादीलाच महत्व दिलं जातं. इतर कौशल्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा होतं.
आयुष्याच्या उत्तरार्धात अनेकांच्या प्रतिभा फुलल्या आहेत.
एकीकडे संध्याछाया भिवविती हृदया तर दुसरीकडे स्वतःमधील सुप्त गुणांची जाणीव व कौशल्य साद घालत असतांना या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असेच वाटते.
“डर के आगे जीत है” म्हणत नव्या पिढीला नको ते धाडस करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. असे करणे जोखमीचे आहे असे म्हणत पुन्हा ते नाम निराळेच असतात.
काम के आगे जीत है हा संदेश नव्या पिढीने अंगीकरायला हवां. सतत कार्यरत राहणं शेवटपर्यंत हेच दीर्घायुष्याचं व समाधानी जगण्याचं लक्षण आहे. नंदा मोरे यांच्याकडून हीच प्रेरणा घ्यायला हवी.
“वो सुबह कभी तो आयेगी” हे लक्षात ठेवूनच माणसें मार्गक्रमण करत एक पायवाटच नकळत निर्माण करीत असतात.