Image by Sophia Nel from Pixabay

कुंडीतील सदाफुली बहरली होती. टवटवीतपणे डोलत डोलत नेत्राला सुख देत होती. प्राप्त परिस्थितीमध्ये मिळेल तेवढ्या पाण्यावर मिळेल तेवढ्या जमिनीवर फुलायचं हे वनस्पती पासून शिकायला हवं. कड्या कपारीत बीज रुजतं आणि वाढतं. कसल्याही तक्रारी न करता या वनस्पती वाढतात, बीज अंकुरतं. कुठली प्रेरणा ?कोणाकडून घेतात काहीच कळत नाही. आपणास त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी की प्राप्त परिस्थितीत सुद्धा समाधान असतं व त्याही परिस्थितीत फुलायचं व दुसऱ्यांना आनंद द्यायचा असतो. दोन दिवस पाणी येणार नाही म्हणल्यावर आपण जास्तीचं पाणी भरून ठेवू शकतो पण वनस्पतींनी काय करावं? कसलीही तक्रार नाही, कसलीही खदखद नाही मिळेल तेवढ्यात खुश राहायचं,दुःखं‌ उगाळायचं नाही.

कुंडीतील झाडाला पाणी टाकण्याचं काम आजी करते. आजी गावाला गेल्यावर कुंडीतील पानंफुलं थोडी सुकून जातात पण आज आजी येणार आहे म्हटल्यावर ती पुन्हा तरतरीत होतात. कुठले ऋणानुबंध ?कोण कोणाची काळजी घेतो, कशी घेतो, केव्हा घेतो, किती प्रमाणात घेतो यावर एकमेकांचं अस्तीत्व अवलंबून आहे.

रानफुलाकडे तर कोणीच लक्ष देत नाही पण तरीही ती फुलतात आणि दुर्लक्षीली जातात याबद्दल त्यांचीही काहीही तक्रार नसते. फुलांना फक्त फुलायचं माहीत असतं. निर्माल्य होईपर्यंत फुलायचं असतं व आपल्या सुगंधाने आसमंत बहरून टाकायचं हे यांच्याकडून शिकायला हवं. सौंदर्यवतीच्या गजऱ्यात स्थान मिळणार आहे का देवाच्या चरणी स्थान मिळणार आहे, कां प्रेतावर उधळले जाण्यासाठी, याची काही कल्पना नसताना फुलं निर्माल्य होईपर्यंत आनंद देतात.

वनस्पती कधीच म्हणत नाहीत की मी आहे तिथेच मला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे मी येथूनच वाढणार.वनस्पती सूर्यप्रकाशाकडे जाण्यासाठी वेळप्रसंगी स्वतःला नमवून घेतात, तडजोड करतात. प्राजक्त दुसऱ्याचं अंगण सजवतो दुसऱ्याच्या अंगणात फुलांच्या सडा पाडतो हे आपलं अंगण नव्हे म्हणून कधीच तक्रार करत नाही.

फुलांचा आयुष्य किती पण जेवढं आयुष्य त्यांना लाभतं, तेवढ्या आयुष्यात ते अनेकांचे संसार बहरून टाकतात. अनेकांचे प्रेम जुळवतात, देवांना सुशोभित करतात. फुलाच्या सुगंधाने तर आपलं जीवन किती सुखद झालं आहे.

फुलावर कितीतरी गाणी झाली आहेत.
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना.

आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फुल दिलं की मनातल्या भावना कळतात. गुलाबांनी अनेकांना जवळ आणलं आहे. पंडित नेहरूंच्या कोटावर गुलाब नेहमी विराजमान असायचा. एखादं फुल सुद्धा एखाद्या व्यक्तिमत्त्वाची ओळख बनतं.

मोगरा फुलला
मोगरा फुलला
फुले वेचिता बहरू
वेलियासी आला

या गाण्यांनी मानवी जीवनालाच बहर आणली आहे.

चाफा बोलेना चाफा चालेना
चाफा खंत करी काही केल्या फुलेंना

या गाण्यांनी मानवी भावनांनी फुलांच्या भावना ओळखल्या आहेत.

अनेक फुलांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून पुस्तकात किंवा वहीत स्वतःला बंदिस्त करून समाधी घेतली आहे.

रातराणीच्या फुलांनी, केवडयांनी, निशिगंधाने मोगऱ्याने केवळ सुगंध दिला नाही तर मानवी मनाला एका वेगळ्या पातळीवर नेऊन प्रेम करायला प्रवृत्त केलं आहे. फुलं केवळ गजरा माळत नाहीत किंवा देवाला सुशोभित करत नाहीत तर सर्व आसमंत भारावून टाकतात, प्रसन्न करतात. कुठून आलं हे कौशल्य? कुठून आलं हे नक्षत्रांचं देणं.

आजून त्या झुडपां मागे सदाफुली
दोघांना हसते
अजून त्या आठवणींनी शेवंती लजवंती होते
बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात ..

फुल तुम्हे भेजा है खत मे फूल नही मेरा दिल है
फूलों का तारों का सबका कहना है एक हजारो मे मेरी बहना है.

फुलले रे क्षण माझे, फुललेरे
गोरी गोरी पान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण.

ही आणि अशी अनेक कविता,गाणी आजच्या पिढीला माहित असायला हवी व आस्वादायला सुध्दा हवी.

प्रत्येक फुलाचही एक व्यक्तिमत्व असतं. फुलं औषधी असतात.प्रत्येक फुलांचा रंग वेगळा, सुवास वेगळा, आपापली व्यक्तिमत्वं फुल़ राखून असतात.

फुलांनी मानवी मनावर राज्य केले आहे.

आमच्या अनेक कवींनी फुलांची दखल घेतली आहे हे आजच्या पिढीला कळायला हवं. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी फुलांनी केवढं प्रचंड काम केलं आहे.

अनेक कवींतांच्या माध्यमातून कवींनी मानवी मनातल्या भावनांचं कोडं उलगडलं आहे.

वनस्पती फुलांनाही भावना असतात. वनस्पती फुलांशी सुद्धा संवाद साधायला हवा. पर्यावरण वाचलं तर वनस्पती,फुलं वाचतील. फुलं आपल्यासाठी इतकं करतात पण आपण फुलांसाठी काय करतो?

ग्रेटा उपोषण करते, स्वतः अटक करून घेते,लहान वयातही पर्यावरणाची इतकी समज हे प्रेरणादायी नव्हे काय?

कविता केवळ पाठ करण्यासाठी किंवा कवितेवरील गाणी गुणगुणायची नसतात तर त्यातून निसर्गा विषयी प्रेम निर्माण व्हायला हवं. कविता सुद्धा जशी आस्वादायची असतें. फुलांच्या माध्यमातून निसर्ग आस्वादाचा असतो.

निसर्ग हा गुरू असतो.निसर्ग सुद्धा आपल्याला प्रेरणाच देतो. एवढंच की निसर्गची प्रेरणीची पायवाट अदृश्य असते.

.    .    .

Discus