Photo by Soroush Karimi on Unsplash
“मेरे लिखने की प्रेरणा वहा से आती है जहाँ के लोग शोषित है मगर फिरभी हार नही मानते” - असे महाश्वेता देवी यांनी म्हटले आहे. संघर्ष सुद्धा प्रेरणेची बाब असू शकते. एखाद्याचा संघर्ष, दुःखं,वेदना पाहिल्यानंतर आपले दुःखं त्याच्यासमोर काहीच नाही हे समजून माणूस पुन्हा जोमाने उभा राहतो. योग्य वयात संघर्ष करावा लागला तर त्याचं एवढं अप्रूप नसतं पण बालपणीच एखादी मोठी जबाबदारी अंगावर पेलावी लागली तर ती विचार करायला लावते.. बालपण हे खेळण्याचे वय, आनंदी राहण्याचे वय पण त्या वयात पोटासाठी धोकादायक कसरती करून आपलं व कुटुंबाच पोट भरणं हे तो मुलगा शिकतो व त्याला पाहून आपण किती सुखी जीवन जगत आहोत, जराही कष्ट नाहीत याची जाणीव व्हायला लागते. जाणीव होणं म्हणजेच प्रेरणाची सुरुवात असते. नैराश्यात आशेचा किरण दिसणें ही सुद्धा प्रेरणाची पहाट असते. आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू शकत नाहीत व त्या कोवळ्या जीवांचा उपयोग अर्थाजनासाठी करतात तेंव्हा, आपल्या मुलांचा गृहपाठ करण्याची काही पालकांची कीव येते. आपल्या पाल्यांना कसली शिक्षा होऊ नये म्हणून काही पालक इतके हळवे होत असतील तर तो मुलगा कोणत्या संघर्षाला पुढे उभा राहील? अथक परिश्रम, जिद्द यांनी संघर्षावर मात करता येते. आमच्या मुलांना काही पालक संघर्ष करू देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
डोंबाऱ्याचा खेळ म्हणून ज्याला हिणवलं गेलं तो खेळ आजही चालू आहे. काही वर्षांच्या मुलांना दोरीवरून एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जावं लागतं, ते दिलेलं काम सहजपणे पार पाडतात परंतु ह्या कोवळ्या वयात हे कितपत योग्य आहे?तो जर पडला तर त्याच्या पुढील समस्या उद्भवतील त्या कोण निस्तरणार, याची कोण काळजी करतो ?आज सर्कशी मध्ये सुद्धा वन्यप्राण्यांना इजा होऊ नये म्हणून ते प्राणी न वापरण्याची तरतूद आहे. बालकामगार, बालमजूरी या विरुद्ध कायदा आहे पण अनेक हॉटेलमध्ये जेव्हा मुलं वेटर म्हणून काम करतात, इकडे कोणाचा लक्ष जातं.
आपल्या पुढच्या पिढीसाठी सात जन्म पुरेल एवढा पैसा निर्माण करणाऱ्या पालकांची एक जमात तयार होत आहे आणि त्यांच्या मुलाचं पुढे काय होतं तेही आपण पाहतो, त्यांना संघर्ष करण्याची सवय रहात नाही, त्यामुळे अनेक जण व्यसनाच्या आहारी जावून किंवा एखादा अपघात करून पुन्हा मोकळे सुटतात हे कुठेतरी थांबायला हवं. एखाद्या घटनेमुळे, एखाद्या दुःखामुळे, एखाद्या वेदनेमूळे, एखाद्या अपमानामुळे आपण खचून जातो आणि नैराश्य आपल्यामध्ये जेव्हा येतं, तेव्हा अनेक जण आत्महत्येला जवळ करतात. पण सभोवताली काही जणांचे दुःख, वेदना पाहिल्यानंतर वाटतं की आपलं दुःख याच्यासमोर काहीच नाही आणि मग माणसाच्या मनात कुठेतरी काहीतरी करावं वाटणे ही सुद्धा प्रेरणाची सुरुवात असते, आणि माणूस मग प्रयत्न करायला लागतो आणि त्यात त्याला यशही मिळतं. केवळ आदर्शामुळेच प्रेरणा मिळते असे नव्हे तर एखादं दुःख, दुसऱ्याच दुःख पाहून सुद्धा माणसांमध्ये परिवर्तनाची चाहूल सुरू होऊ शकते.
गौतम बुद्धांनी जेव्हा सर्व सुखाचा त्याग करून समाजा मधलं दुःखं पाहिलं तेव्हा त्यांच्यामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये आमुलाग्र बदल होऊन एक नवीन व्यक्तिमत्व अवतरलं ते म्हणजे गौतम बुद्ध आणि बुद्धाने वाट दाखवलेल्या पायवाटेवरून आज अनेक जण मार्गक्रमण करीत आहेत. व्यक्तिमत्व त्यागाच्या पायावर उभे असेल तर इमारत सुंदर होते.म.गांधीनी म्हटलं आहे “वैष्णव जन तो तेणे काहीये, जो पीड पराई जाने रे”. गांधींनी सुद्धा अनेक प्रलोभनाचा त्याग करून आपल्यात परिवर्तन करून व्यक्तिमत्व समृद्ध केलं. आजही त्या महात्म्याचे सुद्धा अनेक अनुयायी आहेत, त्यांनी घालून दिलेल्या पायावाटेवर सुद्धा अनेकांचे मार्गक्रमण चालू आहे.काही तरी मिळविण्यासाठी, काहीतरी होण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. लहानपणी काही सवयी, शिस्त, संस्कार या गोष्टीतूनच समृद्ध व्यक्तिमत्त्वाची वाटचाल सुरू होते.आपल्या बाजूला पाहिलं तर प्रेरणेचे दीपस्तंभ आपल्या सभोवतालीच असतात फक्त आपण त्याच्याकडे लक्ष देऊन आपल्यात बदल करायचा असतो.