केवळ पुस्तकी ज्ञानात, स्पर्धेत न गुंतता पुस्तकांच्या पलीकडे ही जग आहे हे लक्षात ठेवा. पुस्तकातल्या ज्ञानाने आयुष्याच्या समस्या सोडवायच्या असतात, समस्या उभ्या करायच्या नसतात. तुमच्या वर आत्महत्येला परतवून लावण्याची जबाबदारी आहे. कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी "मैं हूं नां" म्हणत तुम्हाला धीर दिला आहे. ससा व कासव या गोष्टीप्रमाणे सशा सारखे स्पर्धेच्या मागे जाऊ नका, थकून जाल ,कासवाप्रमाणे अविरत श्रम करा व शर्यत जिंका.
माणसाला जेव्हा कुणीच विचारत नाही तेव्हा आत्महत्या विचारते. माणसं घाबरतात. त्यांना वाटतं उष:काल होणारच नाही. ग्रहण क्षणिक असतं तसंच आत्महत्या व तिचा विचार हा क्षणिक असतों.
मोहा पासून प्रवृत्त करणारे क्षण टाळता आले पाहिजेत. प्रसंग आणि माणसं आत्महत्या टाळु शकतात. प्रत्येक क्षण कोणत्या रंगात बुडवायचा ते आपल्या हातात आहे व नाहीही. क्षण जवळ करता आले पाहिजेत व क्षण टाळताही आले पाहिजेत. जीवन म्हणजे दोन क्षणातील अंतर.आपला प्रत्येक पुढचा क्षण ठरवतो आपलं अस्तित्व. क्षणाचे हावी होण अस्तित्वाला सुरुंग लावतं. क्षण जगणं आणि क्षण टाळणं जमलं पाहिजे. प्रत्येक क्षण वेगळा असतो. जीवन हे क्षणभंगुर आहे. क्षणांना भंगार करू नका.क्षण काहीही करू शकतो,जीवन संपवु शकतो, जीवन फुलवु शकतो. स्वतःला जपायचं असेल तर क्षणांना जपा. नैसर्गिक मृत्यूमुळे अस्तित्व संपण आपल्या हातात नाही पण अकाली संपवणं टाळणं आपल्या हातात आहे. श्रद्धेला तडा जातो तेव्हां माणसें अंधश्रद्धेला जवळ करतात. अंधश्रद्धा ही आत्महत्येची पहिली पायरी आहे. श्रद्धेत माणसे जगतात तर अंधश्रद्धेत माणसे मरतात. चेहरा खरा असतो मुखवटा खोटा असतो. चेहरा कितीदातरी आत्महत्या करतो तेव्हा मुखवटा सावरून घेतो.
यशा बरोबर स्पर्धा, इर्षा, तुलना येतात.इतरांशी तुलना करता करता स्वतःचा तोल कधी जातो कळत नाही.
निराशा,अपयश यांना जिंकलं की आत्महत्या जवळपास सुद्धा फिरकू शकत नाही. यश जेव्हां समाधानाच बोट सोडतं तेव्हाआत्महत्याचं बोट पकडतं.
स्वतःहून व स्व: तांतून उमलता यायला हवं. स्वतः वर विजय मिळवता यायला हवा. रोज मरूनही जिवंत राहता यायला पाहिजे.रोज आपला दिवस आयुष्यात उगवतो कारण अपयश ,निराशा त्याला टाळून आपण पुढे आलेले असतो. स्पर्धेच्या युगात चित्ती असू द्यावे समाधान हे राहीलंच नाही. इच्छित कार्य पूर्ण झाल्यावर पूर्वी समाधी घेतली जायची आता इच्छित कार्य अपूर्ण राहिलं म्हणून आत्महत्याची समाधी घेतले जाते.
जगण्याचे पाश सोडवत नाहीत,जर सोडले तर ते मृत्यूच्या बाहुपाशाला जवळ करतात. कार्टून पाहू न दिल्यामुळे ही मुले आत्महत्या करतआहेत.जीवघेण्या स्पर्धेत स्वःताला संपवत आहेत.
क्लीन बोल्ड होण्याऐवजी विद्यार्थी स्वतः बॅट झुगारून देत आहेत, एलबीडब्ल्यू होत आहेत.स्वर्गात आत्महत्या शाखेत अनेक जण प्रवेश घेत आहेत.सगळे असतानाही माणसे आत्महत्येला जवळ करतात आणि काहीच नसताना ही माणसे आत्महत्येला जवळ करतात.अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यातला दुष्काळ त्यांना संपवत आहे. सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी असंच म्हणावे लागेल.
काहींना चंद्र हवाय, काहींना भाकरीचा चंद्र हवा.
जीवनातले काही क्षण मंतरलेले असतात, भारावलेले असतात त्यावेळेस ते काहीही करतात याचे त्यांना भान नसतं. कुणीतरी त्यांना सावरायला हवं, मदत करायला हवी. आधार द्यायला हवां, पण असे हात आज दुर्मिळ झाले आहेत, पाय धरावे असे पाय ही दुर्मिळ झाले आहेत. मृत्यूची गळाभेट स्वतःहून घ्यायचे नसते. अपयशाच्या पायऱ्या मृत्यू कडेच नेतात असं नाही.आमचे शिक्षण आम्हाला यश कसं मिळवायचं हे शिकवतं पण समाधान कसं मिळवायचं, आनंदी कसं राहायचं हे नाही शिकवत.मुले परीक्षेला नैवेद्य दाखवून परदेशात खोऱ्याने पैसे ओढण्यासाठी जातात आणि आई वडिलांचे मृत्यू मोबाईलवर पाहतात.
नैतिकतेच्या भूमीतच चांगले विचार असतात,सकारात्मक विचार असतात. नैतिकता ही तपश्चर्या करून साध्य होते.
यशामागे धावताना थोडी विश्रांती घ्यायला हवी. थोडे स्वतःसाठी जगायला हवं. यशामागे जाऊन दमछाक करून घ्यायची नसते. इर्षा माणसाला अनावश्यक स्पर्धेत ढकलत आहे.
शिक्षणातील स्पर्धेने माणसांचे यंत्रमानव होत आहेत.
मन नसलं की शरीर यंत्र होतं.ऑनलाइन शिक्षणाने ऑनलाइन माणसे तयार होत आहेत. भावनाही आता ऑनलाइन झाल्या आहेत.
यशवंत व्हां पण अकाली नाशवंत होऊ नकां. पूर्वार्धात अपयशी असलेल्यांनीच उत्तरार्धात यशश्री खेचून आणली आहे,हे लक्षात ठेवा.
आत्महत्या स्वतःच्या कर्तुत्वाच्या अपयशाची पावती असतें.काही मिळाल्यावर पावती द्यायची असते काही गमावल्यावर नव्हें.
तुमचाच,
आत्महत्येला जवळ फिरकू न देणारा...