Photo by Tom Hermans on Unsplash

फेसबुकवरील आभासी जगातील मैत्री ते वैयक्तिक आयुष्यातील स्नेही..! असा प्रवास आहे तो माझा आणि डॉ. अनिल कुलकर्णी सर यांचा....! शिक्षक ते महाराष्ट्रातील विविध शासकीय शैक्षणिक संस्थांवर मानाची पदं भूषवणारे अधिकारी , विद्यावाचस्पती डॉ. कुलकर्णी सर यांचा व्यावसायिक प्रवास हा थक्क करणारा आहे. त्यांचे 'पुस्तकांच्या पलीकडे ' हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक मी गेल्या काही दिवसांपासून वाचतोय आणि आज ते अखेर पूर्णत्वास गेले.. गेल्या काही दिवसांपासून इतर कामाच्या व्यापामुळे माझ्या वाचनाचा वेग प्रचंड मंदावला आहे.. अशा अवस्थेत कुलकर्णी सरांचे पुस्तक वाचून मी पुन्हा एकदा वाचन सातत्याच्या धाग्याशी नकळत जोडला गेलो याचे समाधान ! .. पुस्तक प्रकाशित होऊन त्यावर प्रतिक्रिया द्यायला अंमळ उशीर झाला त्याबद्दल खंत आहेच..! आणि त्याहीपेक्षा ' पुस्तक वाचायला मी उशीर केला ' याची काकणभर जास्त...! कारण , कुलकर्णी सरांनी लिहिलेले पुस्तकच मुळात वाचून प्रतिक्रिया लिहिण्याइतक्या दर्जाचे आहे...

उपरोक्त परिच्छेदात उल्लेख केल्याप्रमाणे पुस्तकाचे शीर्षक ' पुस्तकांच्या पलीकडे ' असे आहे.. मुळातच शिक्षण हे केवळ चार भिंतीत मिळत नाही हे आपण जाणतोच ! परंतु, मानत नाही.  मानवी जीवन हे अनौपचारिक शिक्षणाने अधिक समृद्ध होते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे... 'बालवयात मी माझी शाळा सोडली कारण , ती माझ्या शालेय शिक्षणाच्या फारच आड येत होती ' असं विनोदी लेखक श्री. मार्क ट्विन यांचं एक वाक्य मला प्रचंड आवडतं.. कारण, ते सर्वार्थाने खरं आहे... जीवन सर्वार्थाने समृद्ध करणारे शिक्षण केवळ शाळेच्या चार भिंतीत मिळतं यावर माझा कधीही विश्वास नव्हता आणि नसणार..! मानवी व्यक्तिमत्व हे , तो ज्या वर्तुळात राहतो त्यामध्ये असणाऱ्या अनेक दृश्य आणि अदृश्य घटकांमुळे आकाराला आलेले असते.. वर्तमान स्थितीतील जीवन जगण्यासाठी आणि त्याचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक अनुभवांची रचना म्हणजे शिक्षण अशी मी शिक्षण या संकल्पनेची नेहमी व्याख्या करतो.. अर्थात , यामध्ये भविष्यावेळी शिक्षण यालाही जोडले तरी चालेल. परंतु , विद्यमान स्थितीतील आपल्या अस्तित्वाला एक माणूस म्हणून आयाम देण्यासाठी शिक्षण आवश्यक असतेच ज्यायोगे व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक संतुलन राखले गेले पाहिजे.. आणि ते केवळ शाळेच्या चार भिंतीत मिळते यावर माझा बिलकुल विश्वास नाही..

डॉ. कुलकर्णी सर यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनौपचारिक शिक्षणाशी संबंधित गोष्टींचा उहापोह केलेला आहे . काही वर्षांपूर्वी दैनिक सामनामध्ये त्यांनी लिहिलेल्या विविध लेखांचं संपादन करून हे पुस्तक आकाराला आलेलं आहे .. शिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे सर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे आणि ती वाचूनच पुस्तकाचा ट्रेलर आपल्यासमोर येतो.. don't judge a book by its cover या आशयाची इंग्रजीत एक म्हण आहे . परंतु , judge a book by its preface असं या पुस्तकाच्या बाबतीत नक्की म्हणता येईल..

सुटसुटीत आणि काळजाला भिडणारी वाक्यरचना हे कुलकर्णी सरांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य मला जाणवलं.. कुठेही शब्द पांडित्य नाही.. वाचकाला भारावून टाकण्याचा कुठेही उपद्व्याप केलेला दिसत नाही.. आपली भूमिका केवळ संदेशवाहकाची आहे हे तत्व त्यांनी या पुस्तकात कसोशीने पाळलेलं दिसतंय . संदेशाचा आशय सोपा, सरळ आणि सुटसुटीत असला पाहिजे ही भावना त्यामागून लक्षात येते.. अनौपचारिक शिक्षणाशी संबंधित तब्बल 54 लेखांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे.. महाराष्ट्रात, ग्रामीण भागात, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जमिनी पातळीवर काम करणाऱ्या शिक्षक व विविध शाळांच्या यशोगाथा ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत शिक्षणाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न..! त्यांनी यातून केलेला आहे.. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रासरूटर ते पॅराशुटर व्यक्तिमत्त्वांची मालिकाच त्यामुळे आपल्या लक्षात येते.. विषम परिस्थितीमध्येही अत्यंत तावून-सुलाखून निघालेल्या अनेक व्यक्तिमत्त्वांची ओळख त्यांनी या पुस्तकातून करून दिलेली आहे.. त्यामध्ये मोक्षा रॉय, ऍसिड हल्ल्यातून बचावलेली आणि दहावीच्या परीक्षेत अव्वल आलेली अंध कफी अशा प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तिनांही त्यांनी आपल्या पुस्तकाचं नायकत्व बहाल केलेलं आहे.. त्यांच्या यशोगाथा या केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आदर्शवत आहेत..

व्यक्ती केवळ शाळा नामक इमारतीच्या चार भिंतींच्या आत घडतो असं नाही. तर, अनेक अदृश्य बिंदू त्याच्या उत्थानासाठी कारणीभूत असतात.. त्यामध्ये पत्राची महत्ता ' जीएंची पत्रवेळा ' या लेखातून एकेकाळी पत्रांचं मानवी भावविश्वात किती मोठं स्थान होतं...! हे लक्षात येतं.. नव्या पिढीला जीए अर्थात मराठी साहित्यिक जी.ए. कुलकर्णी कळले पाहिजेत हे सांगताना, दुर्बोधतेतही जसा ग्रेस असतो तसा अस्वस्थतेत जीए असतात हे वाक्य मला खूप आवडलं.. शरीराने व्यक्त होणं यांत्रिक असतं. तर , मनाने व्यक्त होणे हे सांस्कृतिक...! हेदेखील त्याच लेखातील एक दर्जेदार वाक्य..!

तरुणपण कशासाठी? आंतरजालाचे मायाजाल, कशी होऊ उतराई ? हे लेखही मला विशेषत्वाने आवडले.. कुलकर्णी सरांचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक लेख विद्यार्थी आणि समाजाला सतत संदेश देत आहे असं जाणवलं.. भारतीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान या दोन बिंदूंना जोडणारा एक अदृश्य धागा मला या पुस्तकाच्या वाचनातून सापडला . शिक्षकाची एक 'नॉलेज वर्करची' भूमिका त्यांनी या पुस्तकातून यथायोग्यपणे निभावली आहे असं मला वाटतं.. पुस्तक वाचत असताना मला, निरीक्षण हा शिक्षणाचा पाया आहे या तत्त्वाची पुन्हा एकदा उजळणी झाली याचा विशेष आनंद वाटतो.. माणूस शिक्षणातल्या शहाणपणाची एक पायरी वर चढतो तो केवळ आणि केवळ निरीक्षण या तत्त्वामुळे हे आपण कधीही विसरता कामा नये.. कुलकर्णी सरांनी आपल्या या पुस्तकातून सातत्याने निरीक्षण या तत्त्वावर जोर दिलेला आहे असे मला जाणवले..

हल्ली , केवळ बौद्धिक प्रगती म्हणजेच शिक्षण ही एक भारतीय शिक्षण क्षेत्रात विकृती वाढीस लागली आहे.. शारीरिक आणि भावनिक विकास याला भारतीय शिक्षण व्यवस्थेत कुठेही स्थान नाही की काय! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.. आणि समाजही त्याच पद्धतीचा आकाराला येत आहे.. मार्क ( परीक्षेतील ) आणि गुण ( व्यक्तित्वातील ) या दोन शब्दांमधला फरक नाहीसा होत चालला आहे.. त्यामुळेच हल्ली समाजात शारीरिक आणि मानसिक दुर्बलता वाढीस लागली आहे.. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक क्षमता उंचावल्याखेरीज ती सुदृढ आणि संवेदनशील मनुष्य म्हणून आपलं आयुष्य जगू शकणार नाहीत.. हल्ली शुष्क होत चाललेला भावनिक ओलावा हा माणसाला त्याच्या मूळ होमोसेपियन या जीवशास्त्रीय नावाकडे अधिक वेगाने घेऊन चालला आहे असे मला एक शिक्षक म्हणून प्रकर्षाने जाणवते.. अशा परिस्थितीत पुस्तकांच्या पलीकडे यांसारखी पुस्तके दीपस्तंभाचे काम करतात म्हणूनच त्यांचे महत्त्व जास्त..!

लिहिण्यासारखं भरपूर आहे... लिहित राहिलो तर माझीच एक लेख मला सुरू व्हायची.. ते टाळून या ठिकाणी थांबतो.. आणि पुन्हा एकदा सर्वाना विनंती.. तुम्ही कुणीही असाल..! हे पुस्तक एकदा निवांत वाचा आणि आपल्या घरातील लहान मुलांसह तुम्हीही एकदा पुस्तकांच्या पलीकडे असणाऱ्या अनौपचारिक शिक्षणाचा अनुभव घ्या.. थोरांच्या यशोगाथा समजून घ्या.. पूर्वीचे जग, बदललेला जग आणि भविष्यात आकाराला येऊ लागलेलं जग याचीही या निमित्ताने ओळख करून घ्या..

.    .    .

Discus