‘जागरण’ या आत्मकथनातून भारत सातपुते यांनी आपल्या आयुष्याची यशोगाथा साकारतांना येणाऱ्या अडथळ्यांची शर्यत साकारली आहे. एका प्रामाणिक कार्यकर्त्याला काम करताना येणाऱ्या अडचणीमुळे समाज व्यवस्थेतील नैराश्य आपल्याला ध्येयापासून परावृत्त करत नाही हाच संदेश जागरण मधून भारत सातपुते यांनी दिला आहे... सुराज्यासाठी निर्भीडपणे जागरण करणाऱ्या देशभक्तांना त्यांनी हे पुस्तक अर्पण केले आहे.
साहित्याच्या विविध प्रकारात त्यांनी पाच डझन पुस्तके प्रकाशित केली आहेत. शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्याबद्दल स्वीकारलेले एकूण ५५ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. सुट्टी विना शाळा घेऊन हा उपक्रम त्यांनी राबवला, तसेच अनेक शेकडो उपक्रम त्यांनी राबवले व दहावी, बारावी, डीएड,टंकलेखन आदी बोर्डाच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियानांतर्गत किमान शंभर जणांना रेस्टीकेट केले व काॅपीकरणारे अर्धा डझन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. जिथे ते केंद्र संचालक म्हणून होते तिथला निकाल किमान ६०ते ७०% ने घसरायचा, अशा रीतीने खोट्या निकालांचा पर्दाफाश त्यांनी केला. वृक्षांची लागवड व व्यसनमुक्ती कार्यात सतत व्याख्यानात त्यांनी सहभाग दिला.
भ्रष्टाचाराविरुद्ध सतत संघर्ष करत आरोपीवर गुन्हेही दाखल केले. त्यांच्या अनेक मराठी कवितांचा हिंदी व इंग्रजी भाषेतून अनुवाद झाला आहे. साक्षरता अभियानात व सर्व शिक्षा अभियानात अनेक पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. अनेक शैक्षणिक व सामाजिक अभियानांतर्गत प्रशिक्षणात जिल्हा ते राज्यस्तरावर साधन व्यक्ती म्हणून कार्य केले. आकाशवाणी या विविध दूरदर्शन माध्यमावर कार्यक्रम केलें. एकाच वेळी एकदम पंधरा पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. शाळा, महाविद्यालय यांचे स्नेहसंमेलन, जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम यात किमान ५००० कार्यक्रमात काव्यवाचन व व्याख्याने त्यांनी दिली. युट्युब वर शैक्षणिक उपक्रमांची व्याख्यानाची व काव्यचनाचे हजारो व्हिडिओ त्यांचे उपलब्ध आहेत.जिल्हा व राज्य स्तरापर्यंत अनेक वृत्तपत्रांनी वर्षानुवर्ष वात्रटिका हे त्यांचे सदर चालविले.
अत्यंत गरिबीतून व संघर्ष करत त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व साकारले आहे. व्यसनापासून दूर राहून लोकांना बरे वाटेल असे बोलण्यापेक्षा खरे वाटेल हे ते बोलत राहिल्यामुळे अनेकांचा रोष त्यांना ओढून घ्यावा लागला.निशाणा डावा अंगठा केवळ प्रौढ शिक्षणात नाही तर शिक्षणक्षेत्रात सुद्धा आहे याची पदोपदी जाणीव हे पुस्तक वाचताना आपल्याला होते.भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना बदनामी ही झेलावी लागते.
अन्यायाविरुद्ध लढतांना जेवढे कौतुक करतात तेवढेच टिका ही करतात.
मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होतांनाच्या प्रवासात अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवत असताना, ग्रामस्थांच्या विरोध सहन करत शाळेला नावलौकिक मिळवून विद्यार्थ्यांना, पालकांना व त्या गावाला एक वेगळीच ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
थोरा मोठ्यांची, संत महात्म्यांची बलिदानाची, त्यागाची अशी ही भूमी व्यसनांच्या, अंधश्रद्धेच्या, ढोंगीपणाच्या अनागोंदीच्या विळख्यात गुदमरते आहे हे डोळ्यांना पाहवत नाही. लहानपणापासून आई-वडिलांचे, गुरुजनांचे, पुस्तकांचे सुसंस्कार मनावर राज्य करतात, त्यामुळेच हा संघर्ष घडला आहे.हे चुकलं ते चुकलं म्हणण्याचेही धाडसही या जागरण मध्ये आहे. तर जे आगाध, सुंदर ,सुगंधी आहे तेही मोठ्या मनाने आदर्शासाठी यात मांडले आहे. चांगल्यासाठी मतभेद जरी झालें तरी मनभेद होऊ न देणं हाच लेखकाचा दृष्टिकोन होता. भल्याभल्यांच्या ओळखीचा फायदा केव्हा पदासाठी व धनासाठी कधीही न मागणे ही त्यांची भूमिका होती, सत्याने चालतानाची अवस्था येते तेव्हा जवळच्या ना हाक मारल्या नंतर कोणी ओ म्हटलं तर कोणी बहिरेपणाची भूमिका घेतली,हे सर्व मनमोकळेपणाने जागरण मध्ये दिले आहे. रोज दैनंदिनी लिहण्याची सवय असल्यामुळे हे आत्मचरित्र साकारले आहे.संसार, शेती यापेक्षा लेखनात जास्त आवड असल्यामुळे कर्ज काढून काही पुस्तके काढली, हे पुस्तक साठावं पुस्तक आहे. भारत सातपुते यांची भाषा सरळ सोपी आहे. सत्य टिपतांना कुठेही कृत्रिम व अलंकारिक भाषा वापरलेली नाही. व्यक्तिमत्वाला जितके कंगोरे तितकेच धागेदोरे असतात व त्याचा जो गुंता असतो,तो सोडवणे हे कौशल्याचे काम आहे.अतिशय मनमोकळेपणामुळे व प्रामाणिकपणामुळे जे जे घडले ते येथे लिहिले आहे. लेखकाच्या लढा व्यक्ती विवृद्ध नाही तर प्रवृत्ती विरुद्ध आहे.
प्रत्येक क्षेत्रात आज भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराविरुद्ध सतत डोळ्यात तेल घालून जागरण केले पाहिजे व प्रत्येकाला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली पाहिजे तरच थोडेफार आशादायी चित्र निर्माण होईल.
निवृत्तीनंतरही आपण आपले कर्तव्य करावे हेच त्यांना वाटते.
शाळाबाह्य लेकरांना ज्ञानाची शाळा दाखवण्यासाठी मध्यस्थी होण्याचे भारत सातपुते यांनी ठरवले व त्यासाठी सेवानिवृत्त झालेल्यांना एकत्रित आणून त्या दिशेने जागरण त्यांचे सुरूच आहे. शासनाची प्रत्येक योजना राबववताना शासनातील सर्व अधिकारी सल्ला घेण्यासाठी भारत सातपुते यांना आमंत्रित करीत व त्यांच्या कामाचे उदाहरण बैठकीत देत. ही त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची व पुढील करणाऱ्या कामाचे पावतीच आहे.
व्यक्तिमत्व समृद्ध व पारदर्शक असले की त्याची थोडी चांगली, वाइट चर्चा होतेच.एखादी यशोगाथा साकारतांना प्रेरणेची पायवाट आपोआप तयार होते. जागरण ही अशीच एक पायवाटच आहे... सरदार जाधवांचे मुखपृष्ठ विषयाशी समर्पक आहे.