Photo by Kimberly Farmer on Unsplash

नुकतेच मा.राज्यपाल यांनी मुलांना गृहपाठ देतांना काही सूचना केल्या आहेत. गृहपाठ यांत्रिक पद्धतीनेच केला जाणार असेल किंवा काही ठिकाणी पालक करत असतील तर त्या गृहपाठातून मुलांना किती आकलन होते हा ही प्रश्न आहे.पुस्तकांच्या पलीकडील गृहपाठ हाच मुलांसाठी जीवनपाठ असतों.

गृहपाठाची संकल्पना व व्याप्तीला नव्याने सामोरेंजाण्याची आवश्यकताआहे.

कल्पकतेला वाव देणारे गृहपाठ हवेत. गृहपाठ यांत्रिक क्रिया नको. पारंपारिक गृहपाठाला छेद देऊन गृहपाठाची व्याप्ती शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मताने व्हाट्सअप च्या माध्यमातून आदान प्रदान करावी व गृहपाठाची क्वेश्चन बँक अमुक एका कालावधीत सर्वांच्या सूचना मागून वर्गनिहाय गृहपाठ कसे असावेत हे ठरवावें.

'एकदा काय झालें' चित्रपटात लहान मुलांना रोल प्ले मेथडच्या माध्यमातून शिक्षण कसे परिणामकारक होते हे दाखवले आहे. गोष्टीच्या माध्यमातून केलेले अध्यापन मुलांच्या कसे लक्षात राहते हे दाखविले आहे. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी गृहपाठाचा सहसंबंध जोडता आला पाहिजे. गृहपाठ वेगळा नाही तो अभ्यासाचाच भाग आहे. शिकविलेलाअभ्यास समजावा व त्याचे चिंतन, मनन व्हावे म्हणून तो दिलेला असतो तसेच व्यवहारात गृहपाठाचे उपयोजन करण्यासाठी सुद्धाव्यवहारातील उदाहरणे पुस्तकाशिवायची देणे आवश्यक ठरते.पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम हे मार्गदर्शक म्हणून आवश्यक आहेतच पण त्याच्याही बाहेर खूप काही मुलें शिकतात, तो गृहपाठच गृहीत धरायला हवा. गृहपाठात कोणकोणत्या बाबी अंतर्भूत करता येतील पुस्तकाव्यतिरिक्त याचा विचार शिक्षक, पालक यांनी करायला हवा. एकंदर शिक्षण तज्ञांचा सूर असा आहे की गृहपाठ बंद न करता, गृहपाठाची पुनर्रचना करण्यात यावी जेणेकरून तो आनंददायी होईल. मुळात गृहपाठाची संकल्पना बदलायला हवी. पारंपारिक गृहपाठात वर्ग पाठातलच कार्य पुन्हा घरी सांगण्यात येतं व ते पक्क व्हावं विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावं हा त्याच्या मागचा उद्देश असतो.

प्रत्येक क्षणाला मूल शिकतं आणि मूल स्वतःहून बऱ्याच गोष्टी निरीक्षणातून, अनुकरणातून शिकतं.

सध्याच्या गृहपाठाची स्थिती म्हणजे पाट्या टाकण्यासारखं झालं आहे, शिक्षक तो देतात कारण आदेश व परिपत्रक या चौकटीतच त्यांना काम करावं लागतं आणि विद्यार्थी ते नीमुटपणाने स्वतः किंवा पालकाकडून सादर करतात हे चित्र बदलायला हवे.

करोनाच्या दोन वर्षाच्या काळात मुलांनी खरंतर गृहपाठच केला त्याच्या माध्यमातूनच त्यांनी जे काही शिक्षण मिळवलं त्याचं आकलन केलं व त्याचा दैनंदिन जीवनात वापर केला हे आपल्याला नाकारून चालणार नाही. मुलांनी हळूहळू एखादी गोष्ट सातत्याने केली तर त्या कौशल्यावर ते मात करू शकतात, पण त्या गोष्टीचा सराव त्यांना होण्यासाठी वेळ हवा. आपण मुलाला निरीक्षणाच्या संधीच देत नाही, विचार करायची संधीच देत नाही. सध्याचा गृहपाठ दळण गिरणीत टाकल्याप्रमाणे आहे. सुप गुणांची नोंद आम्ही कधी करणार?

आम्ही नोंदीच करत नाही. आमची मुलं अभ्यासक्रमाच्या बाहेरच खूप गोष्टी शिकतात पण त्याची नोंदच होत नाही.मुलानें गृहपाठ एखाद्या वेळेस केलाही नसेल पण आपल्याला जे आवडतं त्याच्यामध्ये आवड घेऊन एखादं कौशल्य विद्यार्थी जर जोपासत असतील तर तो त्यांचा गृहपाठच होय .पण आजच्या विद्यार्थ्यांना वर्गपाठ, गृहपाठ, शिकवणी चा लादलेला गृहपाठ नको, तर आनंदाने ओथंबलेला गृहपाठ हवा. गृहपाठपाठ्यपुस्तकातून न देता अवती भोवती असलेल्या सुंदर गोष्टी च्या आकलनासाठी देण्यात यावा.

शिक्षणाचे संदर्भ बदललेलें तसें शिक्षणातील काही संकल्पनांना नव्यानें सामोरे जावे लागेल.

चाकोरी बाहेरचे विचारच नाविन्याला जन्म देतात.

मुलांचं शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकात बंदिस्त नको. पुस्तकांच्या शिक्षणाबरोबरच मुलांना जीवनाची ही तोंड ओळख व्हायला हवी. मुलांच्या फक्त गुणांचं मोजमाप नको तर त्यांच्या आयुष्याला काही सार्थकताही प्राप्त व्हायला हवी. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे "शिक्षण म्हणजे काही तुमच्या मेंदूत कोंबलेल्या माहितीचा साठा नाही, जो पचवता न आल्यामुळे संपूर्ण आयुष्यभर तिथे धुडगूस घालत राहतो. आपल्याला हवं आहे आयुष्याची उभारणी करणारं ,माणसाला घडवणारं, त्याच्या चारित्र्याचे संवर्धन करणारं ,कल्पनांचं सात्मीकरण.

तुम्ही जर पाच कल्पना आत्मसात करून त्यांच्या आधारे तुमचं आयुष्य आणि चारित्र्य घडवलं असेल तर एखाद्या, संपूर्ण ग्रंथालय तोंडपाठ असणाऱ्या माणसापेक्षा तुमचं शिक्षण अधिक ठरेल. आम्हाला असं शिक्षण हवं आहे ज्याच्यामुळे चारित्र्य घडतं, मन:शक्ती वाढते ,प्रज्ञेचा परिघ वाढतो आणि माणूस स्वतःच्या पायावर उभा राहयला शिकतो."

आपण पुस्तकी शिक्षणालाच शिक्षण समजण्यात फार मोठी चूक करत आहोत. पालकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचं लक्ष केवळ अकॅडमिक्स वरच खेळलेलं असतं. मुलांना जर जीवनाचे विज्ञान समजलं नाही तर विज्ञानाचा अभ्यास करून काय उपयोग. आपण मुलांना इतिहास वाचायला आणि तोंडपाठ करायला लावतो पण आपण त्यांना इतिहास घडवायला शिकवत नाही. मुल पहिली दुसरी आणि तिसरी भाषा शिकला पण त्यांनी त्याची संवाद कौशल्यच विकसित झाली नाही तर काय करणार पुस्तकें. शिक्षण हा मुलांच्या विकासाचा एक पैलू आहे एकमेव नाही पुस्तकी शिक्षणाची जीवनात मदत होऊ शकते पण केवळ पुस्तकी शिक्षण म्हणजे जीवन नव्हे. आयुष्यात अजून बरच काही असतं. अभ्यासात पहिला येणारा जीवनात पाहिला येईलच असं नाही. मागच्या बाकावर बसणारे आयुष्यातही बॅकबेंचर राहतील असंही नाही. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की बहुधा जीवनाची सर्वसामान्य समाज असलेले 98% लोक आयुष्याची सर्वंकष समज असलेल्या 72 %लोकांबरोबर काम करत असतात.

मुलांना वाचनाची गोडी लावायला हवी पण मुले जर पुस्तकात रमत नसतील तर पुस्तका बाहेरच्या जगात त्यांना अवकाश द्या, संधी द्या, खेळू द्या ,निसर्गाला समजू द्या, माणसांना समजू द्या. निरीक्षणाची संधी द्या त्यातून खूप काही मुलं शिकतील. मुलांना केवळ धाक नको तर त्यांच्या आवडीचं जे जे असेल ते करण्याचं स्वातंत्र्य द्या मात्र स्वातंत्र्यावर अंकुश हवाच. स्वातंत्र्य स्वैराचारा मध्ये बदलणार नाही यासाठी मोठ्यांचा त्यांच्यावर लक्ष हवं.

मुलांनी पुस्तकातच रमावं ,तास न तास अभ्यासच करावा हा आटापिटा नको.

योग अभ्यास, व्यायाम ,शिस्तं ,संस्कार याचं बीजारोपण बालवयात केलं की मोठेपणी व्यक्तिमत्त्वाचं झाड बहरतं.

आजच्या शिक्षण व्यवस्थेत श्रम प्रतिष्ठेला स्थानच नाही.

घरी अभ्यास, शाळेत अभ्यास ,मैदानाची कमतरता त्याच्यामुळे मुलांना श्रम प्रतिष्ठें पासून दूर राहावं लागत आहे.

चायना मेड खेळण्याच्या सहवासात मुलं वाढत आहेत.

चांदोबा मासिक चांदोबा प्रमाणेच दूर गेलं आहे. हल्क, झोर स्पायडरमॅन, कार्टून ,पोकेमन, बेबलेड,या आभासी दुनियेत मुलं स्वतःला झोकून देत आहेत. पूर्वीच्या काळी निदान घरात कानावर पडणारे श्लोक, अभंग, भक्ती गीत ही सुद्धा दुर्मिळ झाल्यामुळे वैचारिक खाद्यापासून सुद्धा मुले दूर आहेत. आपलं संस्कार केंद्र बंद झाल्यामुळे अनेक ठिकाणी शिबिर घेऊन त्यामध्ये त्याची फक्त झलक विद्यार्थ्यांना पाहायला मिळते पण ती मूल्यं रुजतात का याचा विचार व्हायला हवा. लहानपणी पुस्तक वाचणं हा ठेवा असतो. पुस्तकें नंतर व्यक्तिमत्व विकासाला अशा अनेक गोष्टी भरभरून देतात की माणसाचं जीवन समृद्ध होतं.

पुस्तकात वाचलेलं जेव्हा जीवनात भरून जगायला मिळतं तेव्हा आपल्याला जगण्यात, आस्वाद घेण्यत पुस्तकं साहाय्यभूत ठरली हे नंतरच्या जीवनात कळतं.

जाणीवपूर्वक काही गोष्टींची रूजवात मुलांच्या मध्ये करावीच लागेल. पुस्तक वाचलेल्या गोष्टींचे संदर्भ जेव्हा आयुष्यात दिसतात त्यामुळे त्याचे अर्थ कळायला लागतात.

पुस्तकात शिकायचं असतं आणि पुस्तकाबाहेर जगायचं असतं.

मुल खेळता खेळता शिकतं, जीवन जगता जगताप अनेक गोष्टी स्वतः शिकत जातं.

मुलांना शिकवणं यापेक्षा मुलांचं शिकणं यावर लक्ष केंद्रित करायला हवं.

.    .    .

Discus