Photo by Brad Barmore on Unsplash

स्वप्नांच्या पलीकडे विजय आहे,पराजयही आहे.पानगळ झाली तरी झाड कुठे निराश होतं? पून्हा नव्याने अंगाखांद्यावर पानें फुलें घेऊन बहरत असतं. नैराशाच्ये विचार ,आत्महत्येचे विचार ही पानगळचअसते. काळे ढग निघून जातात तसे तेही जातात. जे धीर धरतात तेच जगतात.

आत्महत्या म्हणजे आपल्याच पुस्तकाची पानं न वाचता, न उलगडता, पुस्तक बंद करणे होय. पूर्ण वाचल्याशिवाय पुस्तक कळत नाही. आयुष्यातचंही असंच आहे.

प्रत्येक पानाला अस्तित्व आहे व ते आगळं वेगळं आहे. एखाद्या पानावर दुःखं असेल तर पुढच्या पानावर सुख असेल. वाचनात एकाग्रता हवी तरच आकलन होतें. जीवन जगतांना नैराश्य, दुःखं येणारच आहे. वास्तव जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत व्यक्तित्व जमिनीवर येत नाही.

आपल्यालाच आपल्या जीवनाचे परीक्षण करता यायला हवं.

मनाचा निश्चयच तुम्हाला आयुष्यावर मात करायला शिकवतो. शमी क्रिकेटर ला एक वेळा आत्महत्या करावीशी वाटली. नैराशाच्यागर्दीत गेल्यानंतर पण त्याने स्वतःला सावरलं,आणि एका सामन्यात सात विकेट घेऊन विश्वविक्रम केला. मॅक्सवेल जखमी झाला त्याला धड चालता येत नव्हतं त्याच्या बदली खेळाडू ही आला होता पण आपण अशाही परिस्थितीमध्ये देशासाठी खेळलं पाहिजे म्हणून त्याने लंगडत लंगडत धावा काढल्या आणि द्विशतक साजरा करून संघाला न्याय मिळवून दिला ही विजूगीषी वृत्ती जर असेल तर पराभव तुमच्यासमोर नांगीच टाकेल.

आयुष्य जगतांना यशोगाथेचे संदर्भ शोधायला हवेत.

असामान्यांच्या यशोगाथा सामान्य लोकांच्यापुढे येतच नाहीत म्हणून अनेक माणसे सामान्यच राहतात. यशोगाथा प्रेरणा देतात. प्रेरणा व्यक्तिमत्व घडवतात. प्रेरणा असल्याशिवाय माणसें स्वतः तून उमलत नाहीत. व्यक्तिमत्व घडवायला कोणी ना कोणी निमित्त झालेलं असतं.माणसें पोकळीत नाही घडत. असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडल्याशिवाय माणसें घडतच नाहीत.कुणाला महात्मा गांधी घडवतात ,कोणाला नथुराम गोडसे घडवतात.परिस्थितीचा सरडा माणसाला रंग बदलावायला कारणीभूत ठरतो.

निराश झालेल्यांनी आशेचं बोट कधीच सोडू नयें. नापास झालेल्यांनीही इतिहास घडवला आहे.स्वतः ची मूर्ती स्वतःलाच घडविता यायला हवी." जीवनात विजय नव्हे संघर्ष महत्त्वाचा. जिंकण्यापेक्षा तुम्ही किती दिलेर पणांनी लढलात याला महत्त्व अधिक असतें". असे पिअर द कुब्रेता ऑलम्पिक चे जनक यांनी म्हटले आहे ते खरेच आहे.

विजय मिळवणाऱ्याचीच दखल घेतली जाते. संघर्ष करणाऱ्यांचीअशी दखल घेतली जात नाही.

विश्वचषक स्पर्धेमध्ये सलग 10 सामने खेळणाऱ्यांचा उदोउदो केला गेला आणि शेवटच्या सामन्यात जेव्हा हार मिळाली तेव्हा अनेकांनी त्यांना हिणवले. भावनांचा उद्रेक काय असतो ते ड्रेसिंग रूम मध्ये सगळ्यांनी पाहिले आहे.

जगण्याची आणि जिंकण्याची विजूगीषीवृत्तीच माणसांचं आयुष्य सार्थक करते.

उत्तर काशी मधील बोगद्यात अकरा दिवसापासून अडकलेले मजदूर म्हणतात' जिंदगी की जंग जीत लेंगे हम'.

ट्वेल्थ फेल सत्य घटनेवर आधारलेला चित्रपट यामध्ये सुद्धा बारावी नापास आयपीएस पदापर्यंत कसा पोहोचतो याचा संघर्ष प्रेरणादायी आहे. दोन लाख यूपीएससी ला बसलेल्या उमेदवारांमधून केवळ 20 -25 पास होतात. 'मै हार नही मानूंगा' हे चित्रपटातील व वास्तवातील नायक म्हणतो व सिद्ध करून दाखवतो.म्हणतो, पराभवाला सांत्वन कामी येत नाही. पराभावालाही संघर्षच पुन्हा तारतो.

विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जखमी झाला असताना, पायात गोळे येत असताना रन करतो. 200 रन काढून सांघाला विजयप्राप्तीकडे नेतो, ही वृत्ती संघर्षात हवी. संघर्ष, प्रयत्न फक्त आपल्या हातात असतात. प्रत्येक स्वप्न खरं ठरत नाही. प्रत्येक संघर्ष विजयकडे जात नाही.

संघर्ष विजया कडे जाण्याचा राजमार्ग असतो. रस्ते इच्छित स्थळी नेतातच, फक्त पावलात बळ व इच्छाशक्ती हवी.

पराभव सुद्धा एक प्रकारची पानगळच असते पुन्हा येणाऱ्या नवीन विजयाच्या पालवी साठी वाट पाहायची असतें. स्वप्न पडणंआपल्या हातात नसतं पण वास्तव घडवणं आपल्या हातात असतं.

स्वप्नं पाहिल्याशिवाय खरी होत नाहीत. पानगळ पालवीला मोकळी वाट करून देते. स्वप्नातील पानगळ सुद्धा नव्या पालवीची रुजवात असते. संघर्षाचा उंबरठा ओलांडल्याशिवाय विजय नाही हेच खरे.

.    .    .

Discus