Photo by Tai's Captures on Unsplash

आज जवळ जवळ दोन वर्ष पुर्ण झाले. कोरोना हा शब्द कानी पडून. कधीच ऐकला नाही असा हा विषाणू. साऱ्या जगाला हादरवून सोडणारा.

डिसेंबर 2019 ला चीनमधील वुहान या शहरात प्रथम विषाणू आढळून आला. आणि पाहता पाहता सारे जग कवेत घेणे सुरू केले. तो जोपर्यंत चीन पुरता मर्यादित होता तोपर्यंत आम्ही सारे कसे निर्धास्त होतो. पण हळूहळू एकेक देश आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली तशी तशी आपली धडधड वाढायला लागली. आणि अखेर भारतात या विषाणूने शिरकाव केलाच.

केरळ मध्ये प्रथम रुग्ण आढळून आला आणि सारी प्रशासकीय यंत्रणा कशी खडबडून जागी झाली .या विषाणूने इतक्या झपाट्याने प्रसार केला की आज रुग्ण प्रत्येक घरात आहे रितेक बळीही गेले. वाढती रुग्ण संख्या बघता भारत सरकारने 23 मार्चला भारतामध्ये संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आले एक महिन्यासाठी याच कळात थाळीनाद घंटानाद दिवे लावू न या विषाणूला काही प्रमाणात हरविण्याचा प्रयत्न केला पण ती प्रकृती आहे आजवर आपण तिला कवेत घेण्याचा प्रयत्न केला त्याचा बदला ती तर घेणारच.

तिच्या समोर सारे हतबल प्रत्येक जण घरात बसून. रस्ते सुनसान आप्तेष्टांच्या भेटी नाही बच्चेकंपनीला मामाचे गाव नाही खेळायला मैदान तर दूरच.. सारे जग कसं मर्यादित होऊन गेलं.

रोजीरोटीसाठी घराबाहेर पडलेला कामगारवर्ग काम नाही म्हणून आपल्या गावाकडे निघाला. बसेस गाड्या बंद जाण्या-येण्यासाठी वाहने नाही चुकुन कुठे एखादी सरकारने रेल्वे गाडी सुरू केली तर तिथे तोबा गर्दी .शिवाय कोरोनाची धास्ती.प्रत्येक जण तोंडाला कापड बांधून आपला जीव घुटमळत आपल्या मार्गाकडे रवाना होताना. कुणी सायकल वरच कुटुंबाचे बिर्‍हाड मांडून तर कुणी पायदळ. डोक्यावर संसार बांधून किती विदारक परिस्थिती ह्या कोरोनाने दिली. गावाकडे जाताना कुणी रेल्वे च्या पटरी वर रात्र काढणारे तर कायम काळाच्या ओघात गेले. कोरोणाने नाही तर अपघाती मरणाला सामोरे जावे लागले.

जे कोणी पायदळ निघाले त्यांना कुठे झाडाखाली तर नदीकाठी जिथे विसावा मिळेल तिथे थांबणारे. असेच एक पायी जाणारे कुटुंब त्यांना सात आठ वर्षाचा एक मुलगा एप्रिल महिन्यात आग ओकणारे गर्मी .मुलाची वाटेत तब्येत बिघडली जवळच्या गावात मदत मागितली पण कोरोना काळात माणुसकी ही हरविली होती प्रत्येकालाच आपल्या जीवाची पर्वा. त्यांना कुठेच मदत मिळाली नाही आणि मुलगा हे जग सोडून निघून गेला. वाटेत मुलाचे प्रेत खांद्यावर घेऊन निघालेला बाप तर सोबत मुलाच्या दुःखाचे हुंदके देत पायाला बसणाऱ्या चटक्यापेक्षा मुलगा गमावल्याचे चटके खूप खोलवर घाव करून गेले होते. थोड्या दूर अंतरावर नदी दिसतात त्यांचे अंतिम संस्कार केले मुलाच्या आठवणी हृदयात साठवून हे दांपत्य गावाकडे निघाले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दिवसा विसावा रात्री मार्गस्थ असा दिनक्रम करून गाव गाठले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने मनाची होणारी घालमेल शब्दात न सांगता येणारी आहे.

गावाकडे जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे एका महिलेने गळ्यातील मंगळसूत्र विकून पुढील प्रवास करणारे हे उदाहरण आहेच. आपल्या नवऱ्याची निशानी असणारे हे मंगळसूत्र विकायची वेळ यावी ही संपूर्ण समाजाला चटका देणारी गोष्ट ठरली. तर काही तरुण वर्ग गावाकडे आला हाताला काम नाही मग काय करणार गावात आल्यानंतर परिस्थिती जरा वेगळी होती. कुणी स्वीकारायला तयार नव्हते आपलेच परके वाटायला. गावाच्या वेशीवर दांडुका ठेवून गावातील पुढारी गावात घेण्यास मज्जाव करू लागले. कोरोना झाला तर ह्या भीतीपोटी कुणी जवळ करीत नव्हते वेशीवरच किंवा शाळेत त्यांचे बस्तान मांडलेलं.कोणी ह्या काळात गावाचा शाळेचा स्वच्छता अभियान राबवून कायापालट केला तर मनाने खचलेल्या तरुणांनी स्वतःला संपविले. जे आपले होते त्यांनीच आपल्याला परकेपणाची वागणूक दिली या भावनेपोटी स्वतःचे आयुष्य संपवून जगाचा निरोप घेतला.

लॉकडाउन सुरू बंद असा काळ सुरू होता. पण घरात किती काळ बसून राहणार पोटापाण्याचा प्रश्न थोडास मिटणार होता बाहेर तर पडावेच लागेल. हळूहळू एकेक उघडत गेलं पण कोरोना चा वेग वाढतच होता. लाखोंच्या संख्येने रुग्ण दवाखान्यात भरती.कुणी बेडवर तर जागा नसल्यामुळे कोणी खाली जमिनीवर. डॉक्टर सुद्धा रुग्णास दुरूनच तपासत. शेवटी त्यांनाही जीव आहेच. आता कोरोनाने एवढे उग्र रूप धारण केले की एकदा आपल्याला करून आणि ग्रासले तर घरी वापस येण्याची शक्यता कमीच. अशी दवाखान्यातील अवस्था. मृतदेहाची अवस्था पाहून इतर रुग्णाची जगण्याची उमेद नव्हती. कुणाला ऑक्सिजनची कमी तर कोणी व्हेंटिलेटरवर तर कोणाला प्लाझ्मा ची गरज. जिकडून तिकडून मदतीसाठी याचना गरजवंत दाते पुढे येऊ लागले ज्यांच्याकडून जेवढी मदत मिळु लागलीत एवढी खूप मोठी. संपूर्ण दवाखान्याचा परिसर रूग्णाच्या नातेवाईकांनी व्यापून पाणावलेल्या डोळ्यांनी आपला आप्त सुखरूप बाहेर यावा याच आशेवर. रुग्ण वाचला तर जग जिंकल्याचा आनंद आणि काही बरे वाईट झाले तर स्मशानापर्यंत मरण यातना. एखाद्या प्लास्टिकच्या आवरणामध्ये लपेटून रुग्णवाहिकेत ठेवून स्मशानापर्यंत दवाखान्यातील लोक अंतिम विधी साठी. स्वकीयांना परवानगी नाहीच फक्त आपल्या हातात अस्थी देऊन मोकळे. एवढे सर्व लिहिताना माझाही हात थरथरतोय. पण भावना ह्या मनात दाटल्या की त्यांना वाट मोकळी करून द्यावी लागते नाही तर गंभीर परिणाम शरीराला भोगावे लागतात.माझ्याही अतिप्रिय जवळच्या व्यक्तींना मी गमावले आहे. कोण कुठे कशी वेळ प्रत्येकाच्या नशिबात आहे हे तर नियतीच्या हातात आहे नाही का.!!

आजही ह्या ह्या विषाणूने आपला पिच्छा सोडलेला नाही प्रत्येक घरात रुग्ण सापडतच आहेत. सरकारी यंत्रणा ही तोकडी पडत आहे. सरकारने आता कोरोना सोबतच जगावे लागेल असे सांगून हात वर केले. स्वतःची काळजी स्वतः घ्यावे लागेल असं जाहीर केलं.

सोशल डिस्टंसिंग , मास्क ,सॅनिटायझर क्वारंटाईन ललॉकडाऊनसारखे महाभयंकर शब्द कानावर नित्य पडू लागलेत. काढा, वाफारा, हळदीचे दूध हे सर्व घराघरातून अचूक उपचार होऊ लागलेत. मास्क, पिपि ई किट . कंपन्यांना सुगीचे दिवस आले. काही लोकांना कंपनीतून काढून टाकल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अन्नाच्या शोधात मिळेल ते काम आता समाजातील प्रत्येक वर्ग करताना दिसत होता.

ह्याच काळात प्रसारमाध्यमांमधून व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून समज गैरसमज वाढीस लागले. कोणी कोरोनाचीखिल्ली उडवायला लागले पण जसा आज रुग्ण वाढीचा वेग वाढला तेव्हा प्रत्येक जण गंभीर होत गेला. झालं ते खूप झालं आता गंभीर व्हावेच लागेल अशी परिस्थिती बनत गेली. कारण प्रत्येकाच्या घरचा कोणी ना कोणी आप्तेष्ट कोरो नाने हिरावून नेला होता. कोरोना या सूक्ष्म विषाणूने संपूर्ण मानव जातीच्या जेवढे वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तेवढाच मनुष्य एकमेकांच्या जवळ येऊ लागला. त्या निमित्ताने का होईना दूरदेशी गेलेले आप्तेष्ट जवळ आली. कुटुंबासोबत वेळ घालवू लागली. घरातील वृद्ध मंडळींना एवढ्या दिवसानंतर दिसल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला.

चटावलेल्या जिभेला बाहेरील फास्ट फूडची सवय लागली होती चौकाचौकांमध्ये जिथे कुठे हात गाड्या उभ्या असतील तिथे तोबा गर्दी. घरच्या अन्नकडे आपण सर्व पाठ फिरवायला लागलो होतो नव्हे सवय झाली होती. घरी बनवलेला साधा वरण भात याच करणामुळे चवदार होऊन गेला. घराघरांमध्ये चटकदार पदार्थ बनवायला लागले. संपूर्ण महिलावर्ग आपले कसब यूट्यूब च्या माध्यमातून पणाला लावू लागला. प्रत्येक घरी नवीन नवीन पदार्थ बनवायला लागले केक पिझ्झा बर्गर. एवढ्या व्यस्त झाल्या की बाजारात काही सामग्री ही मिळेनाशी झाली. महिलांचा संपूर्ण वेळ किचनमध्ये जाऊ लागला. लोक डाऊन चा काळ असल्यामुळे कामवालीला ही सुट्टीच. मग काय रांधा वाढा उष्टी काढा हेच प्रत्येक स्त्रीच्या नशिबी होतं. एक महिना कसा तरी काढला. आता मात्र अशक्य झाले. हळूहळू लॉकडाऊन कमी होत होते. याच काळात मनोरंजनासाठी सरकारने रामायण महाभारतासारख्या मालिका दाखविणे सुरू केल्या. जुन्या अशा काही बोधप्रद मालीकांचे प्रसारण सुरू झाले. प्रत्येक जण घरात बसून या मालिकांचा आनंद घेत होता. पण मनुष्य प्राणी एकाच ठिकाणी स्थिर कसा काय राहू शकेल संसाराचा गाडा ओढण्यासाठी पोटाची भाकरी शोधण्यासाठी घराबाहेर तर पडावेच लागेल. हळूहळू लॉकडाऊन कमी झाल्यावर लोक बाहेर पडू लागले पण जीव मुठीत घेऊनच सर्व मर्यादा पाळुन च..

कोरोना काळात आपल्या घरापासून कुटुंबापासून दूर अविरत सेवा देणारे डॉक्टर्स म्हणजे पृथ्वीवरील जणू देवदूतच माणसातला देव. कितीतरी दिवस तो घरी गेलाच नाही. रात्रंदिवस त्यांना सेवा करावी. कधी कधी तर रुग्णांच्या नातेवाइकांकडून हल्ला झाल्याचेही समोर आले. देवापेक्षा मानवाला वाचण्याची क्षमता या डॉक्टर बांधवा जवळ असते. माहामारी च्या या काळात डॉक्टरांचे कार्य अतुलनीय नक्कीच आहे.

याच काळात जीवाची पर्वा न करता खाकी वर्दीतील देव माणूस आपल्याला दिसला. रात्रंदिवस उन्हात ड्युटी करून घराबाहेर पडू नका असा सल्ला देत मास्क लावावा म्हणणारे आपले पोलिस बांधव. त्यांनाही आपले कुटुंब होतेच की. स्वतःच्या जीवावर उदार होऊन सदैव समाजासाठी झटणाऱ्या या पोलिस बांधवांना सुद्धा आपले कर्तव्य बजावताना जीवास मुकावे लागले त्यांचेही योगदान समाजाला खूप मोलाचे आहे.कोरोणा च्या काळात मुलांच्या शाळा महाविद्यालय अर्ध्यातच म्हणजे ऐन परीक्षेच्या काळात बंद झाल्या. कोणाचे पेपर झाले तर कोणाच्या पेपरला सुरुवात तर कोणाचे समोर होणार होते. कोरोना मुळे हे सर्व बंद झाले निकालही निट लागले नाही सर्वांना पास करून समोरच्या वर्गात सरकविण्यात आले. पुढील शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती विकसित झाली. मुलं घरून शिक्षण घ्यायला लागली. सकाळी उठून शाळेत जाणारी मुलं घरी बसून आळशी बनली. घरीच आहोत मग करू अभ्यास अशी भावना निर्माण झाली. एरवी सर्व मिळून एकोप्याने शाळेत जाणारी मुलं एकलकोंडी झाली घरातच इंटरनेटचा वापर वाढला. सोबतच पब्जी सारख्या ऑनलाइन गेम च्या मागे लागून आयुष्य बरबाद करून बसले. सारखे मुलं मोबाईल समोर बसून राहिल्याने डोळ्यांचे मानेचे पाठीचे विकार वाढले. आईलाही घरातील कामाबरोबरच मुलांबरोबर बसून त्यांचा अभ्यास घ्यावा लागला. कधी इंटरनेट नसल्यामुळे गावा खेड्यातील मुले शिक्षणापासून वंचित राहिली. एका मुलीने तर आपल्या पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर पहाडावर झोपडी बांधून आपले शिक्षण पूर्ण केल्याचेही ऐकिवात आहे.

शेवटी काय तर कोरो ना पासून आपणास शिकण्यास धडे घेण्यास मिळाले. असे म्हणणे हे वावगे ठरणार नाही. माणसाला स्वच्छ राहणे हात वारंवार धुने या गोष्टी शिकविल्या. अन्नाची किंमत काय असते स्वतः आत्मनिर्भर होणे. साधी जीवनशैली एकमेकांची मदत वेळ कोणावरही येऊ शकते ही शिकवण मिळाली.

विनाकारण घराबाहेर न पडता घरातील मंडळी सोबत आपला वेळद्यावा. जीवन हे क्षणभंगुर आहे. क्षणाक्षणाला नष्ट होणारे जीवन खुप अनमोल आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कमी पैशातही जीवन सुखद आनंदी जगता येतं ही शिकवण मिळाली. मानव निसर्गाच्या अगदी जवळ आला पर्यावरण रक्षणाचे महत्त्व कळलं मुख्य म्हणजे माणसाला माणसातील देव दिसून आला.

आपण निसर्गाच्या अगदी जवळ आलो निसर्गाने आपल्याला दाखवून दिले की जर आपण त्याला अडथळे दिलेतर तोही आपला बदला घेणारच. कोरोनाच्या रूपाने खूप मोठी भेट आपणास मिळाली आता तर आपण धडा घ्यायलाच हवा.

आज आमचे वयस्क मंडळी म्हणून जातात किती सोसतील येणाऱ्या पिढ्या आणखी. आमचा काळा तर गेला देवा सर्व नीट कर अशी देवाला विनवणी करताना दिसतात.हळूहळू परिस्थिती बदलेल ह्याच आशेवर वर जगूया. येणारा काळ आपलाच असेल चांगल्या मार्गावर मार्गक्रमण करू या. प्रत्येक काळोखा नंतर येणारी पहाट ही आपलीच असते आणखी किती कितीही लाटा येवोत किनारा मिळेलच हीच आशा सदैव ठेवूया.

.    .    .

Discus