Image by sarahbernier3140 from Pixabay

बाप चंदनापरीस
सोनं झालं जीवनाचं
किती ऊगाळलं तरी
बाप लेणं सुगंधाचं

जन्म परीसस्पर्शाचा
झाला तुझ्या असण्याने
दुःखे भिऊन पळाली
धीरोदात्त वागण्याने

बाप झाला सदोदित
माझ्या सुखाचा सोबती
त्याच्यामुळे स्वर्ग होता
माझ्या अवतीभवती

नशीबात फुलवल्या
सोनसळी फुल बागा
लेकरांच्या सुखासाठी
झाला मखमली धागा

बाप सात्विक देऊळ
मंद समईची ज्योत
बाप मुर्ती विठाईची
वसे मनी मंदीरात

बाप निरभ्र आभाळ
शांत निरव सागर
प्रेम गंगा भासे जणू
बाप निखळ निर्झर

बाप सौंदर्य लेवून
वसे माझ्या पापणीत
खानदानी रूप त्याचे
साठवते नजरेत

खोडकर बाळ जणू
कधी संचारे अंगात
देवभोळापणा दिसे
निरागस स्वभावात

बाप काळीज आईचं
बाप दैवत भाग्याचं
पोटी त्याच्या जन्मी आले
झालं सार्थ जगण्याचं

.    .    .

Discus