Image by Dariusz Labuda from Pixabay

ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया 
कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया 
कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते  
सासर माहेर उजळविणारी स्त्री एक ज्योत असते . 

ज्यांना स्त्री आई म्हणून भासली ती श्यामची आई झाली. ज्यांना स्त्री पत्नी म्हणून भासली ती रामाची सीता झाली. अशा एक ना अनेक भूमिका स्त्री तिच्या जीवनामध्ये निभावत असते. आई, मुलगी, पत्नी, सासू, बहीण, मावशी, काकी, आत्या, आजी, नात अशी अनेक नाती स्त्रीला निभावावी लागतात. आणि ती ही सर्व कामे अगदी लिलया पार पडते. स्त्रीची ही भूमिका फक्त नात्यांमधली. पण इतर क्षेत्रातही स्त्रिया आता अग्रेसर आहेत. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. घरातील सर्व कामे करून त्या बाहेर नोकरी करतात, व्यवसाय करतात. बऱ्याचदा लोक विचारतात, घरात काम करणारी स्त्री श्रेष्ठ की घराबाहेर पडून नोकरी, व्यवसाय करणारी स्त्री श्रेष्ठ ?       

या पृथ्वीवरील वारसदार स्त्रिया निर्माण करतात. मग तरीही आपण प्रश्न कसा विचारतो की, कोणती स्त्री श्रेष्ठ ? घरात काम करणारी स्त्री सुद्धा श्रेष्ठच असते. ती सकाळी लवकर उठते, घरातील सगळी काम अगदी आनंदाने आणि मनापासून करते, घरातल्या लोकांना काय हवं नको ते पाहते, आजी-आजोबांची काळजी घेते. पण तिला असं कधी कोणी बोलताना पाहिले का की मी आज इतकं काम केलं तितकं काम केलं नाही ना ? मग घरात काम करणारी स्त्री ही कनिष्ठ कशी असू शकेल ? घराबाहेर पडून काम करणार्‍या स्त्रिया तर श्रेष्ठ असतातच. पण मंग आपण असं म्हणू शकत नाही ना की घरात बसून काम करणारी स्त्री कनिष्ठ असते. भारतात असणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रिया आतापर्यंत फार मागे होत्या. पण आता आधुनिक काळात मात्र स्त्री आकाशात उंच भरारी घेते. पण तिचे लक्ष घारीप्रमाणे आपल्या पिलांकडे असते. तिने कितीही कामे केली, कितीही पैसे कमावले तरी आपल्या बाळाकडे लक्ष देणे, त्याला योग्य शिस्त लावणे, चांगले संस्कार करणे याकडे ती कधीच दुर्लक्ष करत नाही. म्हणून म्हणलं जातं स्त्री ही क्षणाची पत्नी पण अनंत काळची माता असते. 

खरंतर अजूनही काही कुटुंबांमध्ये स्त्रियांवर बंधने असतात. पण खरे पाहता कुटुंबे स्त्रियांवर निर्बंध किंवा दबाव टाकण्यासाठी नसतात तर तिच्या पंखांमध्ये बळ देण्यासाठी असतात, तिचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी असतात. जसे एखाद्या रोपट्याला खतपाणी घातलं जातं तसं तिच्या कुटुंबाने तिला आधार देण गरजेचे असतं. तेव्हाच एखाद्या रोपट्याचा वटवृक्ष होतो. आणि त्या वटवृक्षाच्या छायेखाली आनंदाने सर्वजण वावरू लागतात. पण जर एखाद्या स्त्रीवर कुटुंबच बंधने घालत असेल, मदत करत नसेल तर त्या स्त्रीने समाजाकडून काय अपेक्षा करावी ? पण तरीही काही स्त्रिया या गोष्टीला अपवाद आहेत. जसे की सावित्रीबाई फुले. महात्मा फुले त्यांना प्रोत्साहन देत होते पण कुटुंबाने मात्र त्यांना नाकारले होते. तरीही सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाचा वसा अर्धवट सोडला नाही. त्यांच्यामुळेच मी आज माझे मत या लेखाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसमोर मांडू शकले. 

"कोणत्याही राष्ट्राची प्रगती मोजण्याची मोजपट्टी म्हणजे स्त्रीची उन्नती" हे अ‍ॅनी बेझंट यांचे विधान अतिशय समर्पक आहे. कारण एक स्त्री शिकली तर ती तीन पिढ्या घडवते. त्यामुळे प्रत्येक स्त्री ही सुशिक्षित असलीच पाहिजे. 

खरंतर आजच्या काळातील स्त्रीचा विचार करता चंद्रावर पाऊल ठेवणारी स्त्री की या जगात येण्याआधीच अंधारात जाणारी स्त्री यापैकी नेमका काय विचार करावा तेच कळत नाही. एकीकडे आजची स्त्री मोठी स्वप्ने पाहून त्यांना पूर्ण करण्याकडे धावते. तर दुसरीकडे तिला या जगात येण्या अगोदरच अंधारात पाठवले जाते. फुल उमलण्याआधीच जर तुम्ही कळी तोडत असाल तर काय अर्थ आहे ? मुलगी जन्माला यायला भाग्य लागतं असं म्हणतात म्हणजे भाग्यवान लोकांच्याच घरी मुली जन्माला येतात. आजच्या आधुनिक जगात जर स्त्री आणि पुरुषांमध्ये लोक भेदभाव करत असतील तर त्यांना खूप काही शिकणे गरजेच आहे. कल्पना चावला, प्रतिभाताई पाटील, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, सिंधुताई सपकाळ, सुधा मूर्ती, इंदिरा गांधी या सुद्धा महिलाच होत्या ना ? पण त्यांनी आपल्या ज्ञानाच्या आणि कर्तबदारीच्या जोरावर आपलं नाव कमावलच ना ! मग आपण मुलींना या स्त्रियांची उदाहरणे का नाही देत ? का आपण फुल फुलण्याआधीच कळी तोडतो ? 

ज्यांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली ते छत्रपती शिवाजी महाराज पण त्यांच्यावर संस्कार जिजाऊंनी म्हणजेच एका महिलेने केले होते. तरीही महिलांना कमी का लेखतात ? आजच्या काळातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. विमान चालवण्यापासून ते शेतामध्ये पाण्याची दारी मोडण्यापर्यंतची सर्व कामे महिला करतात. तरीही तिला अडाणी म्हटलं जातं. महिलांना एकीकडे लक्ष्मी स्वरूप मानल जात आणि दुसरीकडे तिचा छळ केला जातो. एकीकडे गाडीवर लिहिल जात आम्ही शिवभक्त, शिवबांचे मावळे आणि दुसरीकडे त्याच गाडीवरून मुलीची छेड काढली जाते. हे कितपत योग्य आहे ? स्त्रिया जस पुरुषांना मानसन्मान देतात तसं पुरुष स्त्रियांना देतात का ? एखादा पुरुष आईची जितकी काळजी घेतो तितकी काळजी पत्नीची घेतो का ? खरंच या सर्व गोष्टींचा विचार करणं खूप गरजेच आहे. प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यामध्ये खूप काही करू शकते. जर तुम्हाला तिला प्रोत्साहन देता येत नसेल तर निदान तिच्या वाटेत काटे तरी होऊ नका. पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या वाट्याला फक्त चूल आणि मूल हेच होतं. पण आजच्या काळातील स्त्री चूल आणि मूल तर सांभाळतेच पण आपल्या क्षमते पलीकडे जाऊन ती घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभी राहते. तिला गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, मार्गदर्शनाची आणि बंधन मुक्त आयुष्य जगण्याची. 

म्हणून म्हणावसे वाटते -

कित्येक रूपे तुझी असती
त्यात प्रेमाचा कळस तू 
प्राणवायू कुटुंबा देई 
तीच मंगल तुळस तू

.    .    .

Discus