नमस्कार मंडळी!
आजच्या लिखाणाचा विषय आहे, बाई अत्याचाराचा तुरुंग तुलाच फोडावा लागेल !
सहा हजार वर्षांपूर्वी पतिव्रता सीतेला राजकन्या असूनही पतीसोबत वनवासात जावे लागले. आणि तिचे रावणाने अपहरण केले म्हणून तिला शुद्धतेची परीक्षा द्यावी लागली. आणि तरीही केवळ एका व्यक्तीने शंका उपस्थित केली म्हणून भूमी समर्पण करावे लागले. आधुनिक काळात राजाराम मोहन रॉय राजाच्या वहिनीला सती जाण्यासाठी जिवंत जाळून द्यावे लागले. माधवराव पेशव्यांच्या पत्नीला ही सती जावे लागले. म्हणजे सीते सारखे पतिव्रता, द्रौपदी सारखी पंडिता, राजा ची वहिनी व पेशव्यांची बायको राजघराण्यापासून सामान्य घराण्यातील स्त्रियांपर्यंत आणि दहा हजार वर्षापासून तर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या 21व्या शतकापर्यंत किती काळ गेला तरी स्त्रियांच्या जगण्यात फार फरक पडला नाही. बाई तू कोठेही अस तू पुरुषांची दासी आणि गुलामच आहेस. पुरुषी संस्कृतीच्या तुरुंगातच तुला कोंडले गेले आहे. त्यातून तुला ना कृष्ण ना धर्म ना राजा ना श्रीमंत बाहेर काढेल म्हणून बाई हा अत्याचाराचा तुरुंग तुलाच फोडावा लागेल.
पण स्त्रियांना अशा संस्कृतीच्या गुलामगिरीत आणि धर्माच्या तुरुंगात टाकण्याची कारणे काय असावी तर प्राचीन काळामध्ये जेव्हा माणूस गुहेत राहायचा तेव्हा तो शिकार करून आणत होता आणि बाई स्वयंपाक करत होती. पुढील काळात शेतीचा शोध स्त्रीने लावला पण कष्टाची कामे पुरुषांकडे आल्यामुळे चूल आणि मूल यापुरतीच स्त्री मर्यादित राहिली. पुढे कसेल त्याची जमीन या तत्त्वाने ज्याच्याजवळ जमीन जास्त तो मालक आणि कारभारी आणि त्याला अनेक पत्नी करण्याचा अधिकार. या पत्नीने जमीन, संपत्ती यांच्यावर नवऱ्याच्या निधनानंतर हक्क सांगू नये म्हणून तिच्यावर सती प्रथा लादण्यात आली.
पुढे मनुस्मृतीने शिक्षणाचा अधिकार तिला नाकारला. तिला शूद्र मानल्यामुळे पुरुषांची ती दासी झाली. ढोल, गवार, पशू, नारी ये सब है ताडन के अधिकारी । तेराव्या शतकात यादव राजांचा सेनापती हेमाद्री पंडित यांनी चतुरवर्ग चिंतामणी या ग्रंथात स्त्रियांना ३६५ दिवसांचे वृत्तवैकल्य सांगितले. म्हणजे शतकानूशतके स्त्री कायम पुरुषांच्या गुलामीत व संस्कृतीच्या तुरुंगात राहिली. स्त्रियांना या पुरुषी गुलामगिरीतून मुक्त करण्याचा आधुनिक भारतात पहिला प्रयत्न महात्मा फुलेंनी केला ज्याप्रमाणे पती निधनानंतर पत्नी सती जाते तसे पत्नी निधनानंतर पतीने सता का जाऊ नये? असे फुले म्हणत. महात्मा फुलेंची शिष्या ताराबाई शिंदे यांनी तर स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला आणि पुरुष स्त्रियांच्या बाबतीत दुटप्पी आणि अत्याचारी आहेत हे सांगितले. आगरकरांनी स्त्री पुरुष सहशिक्षणाचा आग्रह धरला. तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून दिले.
नंतरच्या काळातही स्त्रियांच्या संदर्भात भारतीय संसदेने देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम महाराष्ट्र 2005, हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013, निर्भया कायदा 2012, कलम 376 हे विविध कायदे करून बाईचा हा तुरुंग फोडण्याचा प्रयत्न केला. पण याने कितीसा फरक पडला ? स्त्रिया खरच गुलामगिरीतून मुक्त झाल्या आहेत काय ? स्त्रियांच्या बाबतीत काही विचित्र प्रकार घडल्यावर आपल्याला कोणी वाचवायला येईल असा विचार न करता मी या गोष्टीचा कसा प्रतिकार करेन असा विचार केला पाहिजे. कारण जेव्हा महिला आवाज उठवतील तेव्हाच खऱ्या अर्थाने बलात्कार, अत्याचार यासारखे प्रकार थांबतील यासाठी मुलींना बऱ्याच सामाजिक संस्थांकडून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी उपस्थित राहून मुलींनी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. जेव्हा महिलांना समजेल की सुंदर दिसण्यापेक्षा सशक्त असणे गरजेचे आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने क्रांतीला सुरुवात होईल.
मागच्या महिन्यातली घटना दिल्लीमध्ये एका मुलीच्या प्रियकराने तिच्यावर चाकूने हल्ले केले. आणि त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर समाज माध्यमांवर सगळ्यांनी पोस्ट टाकल्या की आज मुली सुरक्षित नाहीत. त्या ठिकाणी आसपास असणारे कोणीच त्या मुलीला वाचवायला गेले नाही. पण मी म्हणते त्या मुलीमध्येच जर धाडस असतं, जर ती मुलगी सशक्त असती तर तिला वाचवायला यायला कशाला कोणाची गरज पडली असती ? त्या मुलीने जर प्रतिकार केला असता तर कदाचित ती वाचली असती आणि जरी वाचली नसती तरी तिने प्रतिकार केल्यामुळे इतर मुलींचा आत्मविश्वास वाढला असता. त्यामुळे आता प्रत्येक परिस्थितीला अनुकूल म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी आपल्यावर अन्याय होईल, अत्याचार होईल त्या ठिकाणी महिलांनी प्रतिकार केला पाहिजे आजच्या काळात टीव्हीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये स्त्रिया कशा दुष्ट आहेत, कमकुवत आहेत हेच दाखवले जाते. खऱ्या आयुष्यामध्ये माझ्यामते कोणतीच महिला इतक्या दुष्ट पणे वागत नसावी. त्याऐवजी मालिकांमध्ये कर्तुत्ववान स्त्रिया अगदी बोटांवर मोजण्या इतपत असतात. पण याचा परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेवर होत आहे. महिलाच महिलांना कमी लेखतात, मदत करत नाहीत, एकमेकींचा अपमान करतात.त्यामुळे सर्व महिलांनी ठरवलं पाहिजे मी दुसऱ्या स्त्रीचा आदर करेन. तिला तिचं ध्येय साध्य करण्यासाठी मदत करेन. तरच महिला हा अत्याचाराचा तुरुंग फोडू शकतील. देशाची सेवा करण्यासाठी ज्यांनी आपल्या स्वतःला झोकून दिलं त्या म्हणजे किरण बेदी त्या देखील एक महिलाच होत्या परंतु त्यांनी आपल्या अत्याचाराचा तुरुंग फोडला. आणि तसेच इतर महिलांना देखील त्यांच्या अत्याचाराचा तुरुंग फोडण्यास मदत केली. पण आजही बलात्कार होताना आपण काही करू शकत नसू तर त्याचा आनंद घ्यावा असं विकृत विधान संसदीय लोकशाहीच्या सभागृहात खासदार करत आहेत. देशात रोज बलात्कार होत आहेत आणि हे झाल्यावर स्त्रिया कमकुवत आहेत त्यांचे रक्षण करायला हवं असं म्हणणारे लोक पुन्हा एकदा स्त्रीचा रक्षक पुरुषच आहेत हा पवित्रा घेताना दिसतात एकूण स्त्रीला सक्षम करणे म्हणजे या पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीतून मुक्त करून स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान करणे असे नसून तिला सांभाळणारे आम्हीच आहोत हे चित्र अधोरेखित करण्याचं काम आजही चालू आहे. आम्ही आईचा सन्मान करतो म्हणणारे पुरुष बाईचा सन्मान किती करतात ? हा प्रश्नच आहे. म्हणून अत्याचाराचा हा तुरुंग बाई तूलाच फोडावा लागेल.