Photo by Atharva Tulsi on Unsplash

नमस्कार मंडळी...

आजच्या लिखाणाचा विषय आहे, जात का जात नाही ? आत्तापर्यंत वेगवेगळ्या लेखकांनी या विषयावर इतकं काही लिहून ठेवलंय आणि मी आता असं काय वेगळं लिहिणार ? अस आपल्याला वाटत असेल पण यावर भरपूर लिखाण उपलब्ध असलं तरी प्रत्यक्षात मात्र कृतीमध्ये सुधारणा दिसत नाही म्हणून माझ्यासारख्या लेखिकेला केला पुन्हा पुन्हा या विषयावर लिखाण करावं लागतं या विषयावर लिखाण करण्यास कारण की गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्र राज्यात जात धर्मावरून नऊ शहरांना बसलेली जातीय तणावांची झळ. आणि भारतामध्ये फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर बऱ्याच राज्यांमध्ये ही परिस्थिती पहायला मिळते. मागच्या महिन्यात मणिपूरची झालेली भयंकर अवस्था यासाठीही जातीयवादच कारणीभूत ठरला. आणि हे प्रकरण महिलांच्या अस्तित्वापर्यंत जाऊन पोहोचले. आणि आमचे सरकार मात्र नवीन संसद भवनाचे उद्घाटन करते. आणि महिला आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी देते. पण त्याची सुरुवात मात्र 2029 पासून होईल की 2034 पासून होईल याची काही शाश्वती मिळत नाही.

मुळात मला प्रश्न पडतो की हे जात धर्म निर्माण केले कोणी ? तर माणसाने. हा श्रेष्ठ तो कनिष्ठ हे ठरवले कोणी ? याचेही उत्तर माणसाने. सर्व मनुष्य जातीचे रक्त लालच आहे, अवयवांची ठेवण देखील समान आहे तरीही आपण यामध्ये जाती धर्मानुसार वाटणी केली. वाटणी जरी केली असली तरी यातून भारतात असणारी विविधतेतील एकता दिसून येते. परंतु जातीयवादावरून होणाऱ्या दंगलींमुळे यातून नक्कीच समाज दुभंगला जातोय. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही काही महात्मे हुतात्मे झाले. पण त्यांनी त्यांचे प्राण भारत देशासाठी दिले.पण आताचे तरुण मात्र जातींसाठी एकमेकांबरोबर भांडत असतील, दंगली घडून आणत असतील तर आपण थोर नेत्यांनी दिलेल्या बलिदानाचा अपमान तर करत नाही ना अशी शंका आम्हाला जाणू लागते.

आपण सर्वजण आधुनिक काळात जगत आहोत. नवीन विचारांचे पाईक आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाली. आणि अमृत महोत्सवाचा दिमाखदार सोहळा आपण आनंदात पार पाडला. पण एकीकडे मात्र मणिपूरमध्ये महिलांबाबत अतिशय वाईट घटना घडतात. आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान यावर काही सेकंदांची प्रतिक्रिया देतात. देशाला स्वातंत्र्य मिळवून एवढी वर्ष झाली पण आम्ही देशातून जात-पाच निर्मूलन करू शकलो नाही.

महापुरुषांची जयंती आम्ही जातीपुरती मर्यादित ठेवली. म्हणजे शिवजयंती फक्त मराठा जातीचे लोक साजरी करतात, आंबेडकर जयंती बौद्ध लोक साजरी करतात. म्हणजे महापुरुषांना सुद्धा आम्ही जातींचे लेबल लावले. पण शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मराठा, कुंभार, माळी, धोबी, वाणी, कोष्टी एवढेच नव्हे तर मुस्लिम धर्मातील सुद्धा लोक होते. आंबेडकरांनी सुद्धा सर्व जातीतील लोकांसाठी कार्य केले. संपूर्ण भारतासाठी संविधान नावाची संस्कारांची, न्याय आणि समतेची शिदोरी दिली. पण महापुरुषांना आम्ही जातींमध्ये कैद केले. पण मला वाटतं या महापुरुषांची लढाई ही जातींसाठी नव्हती तर मानवी मूल्यांची होती, समतेची होती, अन्यायाविरुद्ध प्रतिकाराची होती. आणि या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत.

आपल्या देशातील अल्पसंख्यांक समाजाला बहुसंख्यांक समाजासोबत असुरक्षित वाटते. आणि बहुसंख्यांक समाजाला अल्पसंख्यांकांची भीती वाटते. परंतु हे वातावरण देशासाठी रोगट आणि मारक ठरते. देशातील वातावरण हे समाजाच्या विकासासाठी तारक आणि योग्य असेल तरच देशाची प्रगती होते. तुम्हाला जर जातपात मानायचेच असेल तर मला वाटतं आपल्यासाठी एकच जात असायला हवी ती म्हणजे मानवता. कारण आपल्या प्रतिज्ञामध्येच आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि साने गुरुजींच्या कवितेनुसार 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' आपण सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागूया. स्वतःला प्रश्न विचारूया 'जात' नावाची गोष्ट का जात नाही ? आणि ती घालवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया.

.    .    .

Discus