Photo by Srimathi Jayaprakash on Unsplash
नमस्कार मंडळी!
2007 हे वर्ष सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाचे आणि आनंदाचे वर्ष होते. कारण त्या वर्षाने दाखवून दिलं की स्त्री तर घर सांभाळू शकते पण आपल्या क्षमतेपलीकडे जाऊन ती या राष्ट्राची प्रथम नागरिकही बनू शकते. अर्थात मा. प्रतिभाताई पाटील या 2007 साली महान राष्ट्र भारताच्या राष्ट्रपती झाल्या. आणि त्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या.
माझ्या मते 21 व्या शतकात महिला आता कुठल्या क्षेत्रात मागे नाहीत. अगदी शेतातल्या बांधापासून ते विमान चालवण्यापर्यंत महिला आघाडीवर आहेत. पण या सर्व बाबी झाल्या ज्या महिला साक्षर आहेत त्यांच्या बाबतीतल्या. पण ज्या महिला निरक्षर आहेत त्यांच्या बाबतीत कोणीच बोलत नाही ! आणि अशा निरक्षर महिलांना शिकण्याची फारशी गरजही वाटत नाही. कारण त्यांच्या मते आता अर्ध आयुष्य संपलेलं असताना शिक्षण घेऊन कुठे तीर मारायला जायचय? पण निरक्षर स्त्रियांच्या या मतांना एक वेगळं वळण दिलं ते म्हणजे बिजुताई भोसले आणि शकुंतला जाधव या स्त्रियांनी. बीजू ताई या मूळच्या संगमनेर मधील कौनची गावच्या. सातवीपर्यंत शिक्षण झालं आणि चौदाव्या वर्षी लग्न झालं. काही वर्षांन त्यांचे कुटुंब उपजीविकेच्या शोधात मुंबईत स्थायिक झालं. बिजूताई बुद्ध विहारात बुद्ध वंदना सांगायच्या. आसपासच्या प्रदेशातील जवळजवळ सर्वच महिला निरक्षर होत्या. त्यामुळे त्यांनी साक्षरता वर्ग चालू केले. पण महिलांना साक्षर होण्यात फारसा रस नव्हता. त्यांना फक्त सही शिकणं महत्त्वाचं वाटत होतं. या स्त्रियांचे जीवन अगदी साधं सरळ होतं. रोजची ठरलेली काम करायची आणि महिन्याला मिळालेल्या राशन वर घर चालवायच. पण राशन मिळवण्यासाठी या स्त्रियांची अगदी तारेवरची कसरत चालू असायची. कारण राशन दुकानदार राशन देताना खूप त्रास द्यायचे. बऱ्याचदा कित्येक रात्र राशन घेण्यासाठी रांगा लागलेल्या असायच्या. त्यामुळे स्त्रियांना आपल्या तान्ह्या लेकरांना घेऊन रांगेत झोपाव लागायचं. कित्येकदा दुकानदार सरकारने पाठवलेलं राशन बाजारामध्ये विकायचा. त्यामुळे या स्त्रियांचे जेवणाचे हाल व्हायचे. काही वेळा रॉकेल मिळायचे नाही कारण दुकानदाराने ते आधीच विकलेले असायचे. अशा बिकट परिस्थितीत ह्या स्त्रिया संसाराचा गाडा ओढत होत्या. त्याच वेळी बीजू सह अनेक जणींनी चर्चा केली तेव्हा त्यांना माहिती मिळाली की राशन दुकानांमध्ये एक तक्रार नोंदवही असते आणि या वहीत तक्रार नोंद केली की येणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत या तक्रारी पोहोचतात. आणि त्या वहीत प्रत्येक पानाला अनुक्रमांक असायचे. त्यामुळे लिहिलेलं पान दुकानदार फाडू शकत नव्हता. इतके दिवस ही वही अगदी कोरी असायची त्यामुळे अधिकाऱ्यांना वाटे सर्वकाही अगदी सुरळीत चालू आहे. तेव्हा बिजू ताई आणि शकुंतला जाधव यांनी ही माहिती इतर स्त्रियांना दिली पण फक्त माहिती मिळवून काही साध्य होणार नव्हतं. तर कृती गरजेची होती. तक्रार नोंदवही मध्ये तक्रार करणं आवश्यक होतं त्यासाठी बिजुताईंनी सर्व महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलं. आणि साक्षरता वर्ग अगदी जोमाने चालू केले. स्त्रिया अगदी मनापासून शिक्षण घेऊ लागल्या. नोंदवही मध्ये लिहायला गरजेचे असणारे शब्द शिकू लागल्या. जसे की गहू, तांदूळ.
काही दिवसात सर्व महिला प्रत्येक शब्द आणि वाक्य लिहायला शिकल्या. महिला साक्षर झाल्या खऱ्या ! पण आता नोंदवही मध्ये तक्रार नोंद कोण करणार ? हा मोठा प्रश्न सर्वांसमोर होता. दुकानदाराची अरेरावी सहन कोण करणार ? सर्व महिलांमध्ये चांगल्या प्रकारे एकी झाली होती. बिजूताई आणि शकुंतला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या एक झाल्या. आणि त्यांनी एकत्रित जाऊन तक्रारीची नोंद केली. ही गोष्ट वाचायला सोपी वाटत असली तरी खूप काही शिकवून जाते. स्त्रीने मनात आणलं तर ती संपूर्ण जग चालवू शकते. साक्षर होण तर खूप सोप्प आहे. यामधला हक्क समजून घेऊन स्त्रियांनी स्वतः कृती करण्याचा भाग महत्त्वाचा ठरला. असं घडण्यासाठी 'स्त्रियांसाठी' नव्हे तर 'स्त्रियांबरोबर' काम करावं लागतं. पुढे शकुंतलाताई स्त्रियांच्या पाठिंब्यामुळे न पैसे खर्च करता नगरसेविका म्हणून निवडून आल्या. बिजू ताईंनी मंगल कात्रे यांच्या पुढाकाराने स्त्रियांनी सुरू केलेलं पहिलं रेशनच दुकान काढलं. आणि यातल्या अनेक जणी आता स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत. विविध सभा संमेलनांमध्ये स्त्रियांच्या उन्नतीसाठी चर्चा करून उपाययोजना योजत आहेत. थोडक्यात सामूहिक स्तरावर घेतलेल्या अशा निर्णयामुळे कित्येक कुटुंबे सुखी झाली. त्यामुळे निरक्षर स्त्रियांना जेव्हा शिक्षणाचे खरे महत्त्व लक्षात येते तेव्हा नक्कीच त्या शिकण्यासाठी धडपड करतात. त्यांना गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. महिलांच्या न्याय हक्कांसाठी बऱ्याच कार्यशाळा योजल्या जातात. कार्यक्रम राबवले जातात. यशस्वी महिलांचे कौतुक सोहळे केले जातात. पण ज्या महिला निरक्षर आहेत त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. पण ही परिस्थिती बदलली पाहिजे. भारतामध्ये अशी बरीच खेडी आहेत जिथे आजही महिलांना पुरुषांपेक्षा कमी लेखल जातं. कोणत्याच निर्णयांमध्ये समाविष्ट करून घेतलं जात नाही. इतकंच काय तर शिक्षणाचा देखील त्यांना हक्क दिला जात नाही. पण जेव्हा एक स्त्री शिकते तेव्हा तीन पिढ्या चांगल्या घडतात. शिक्षणाच्या जोरावर सावित्रीबाईंनी कित्येक मुलींना घडवलं. आनंदीबाई पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. तर कमला सोहोनी या पहिल्या महिला पीएचडी धारक ठरल्या. पण या सर्व महिलांना लिंगभेदाशी निकराचा लढा द्यावा लागला. तर ताराबाई शिंदेंना योग्य शिक्षण मिळालं पण त्यांच्या वडिलांनी त्यांना आवडत नसणाऱ्या मुलासोबत लग्न लावून दिलं. त्यामुळे त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. पण या संघर्षातून त्यांनी 'स्त्री- पुरुष तुलना' नावाचा ग्रंथ जगासमोर आणला. आणि स्त्रियांबाबतचे प्रश्न यामधून समजू लागले.
आजही भारतात साक्षरतेचा विचार केला तर पुरुष साक्षरता ८२.१४% आहे. तर स्त्री साक्षरता ६५.४६% आहे.म्हणजे बऱ्याच स्त्रिया आजही शिक्षणापासून वंचित आहेत. खरंतर 'कोणत्याही राष्ट्राची प्रगती मोजण्याची मोजपट्टी म्हणजे स्त्रीची उन्नती' हे आणि बेझंट यांचे विधान अतिशय समर्पक आहे.
आपल्या देशातील कल्पना चावला नावाची महिला चंद्रावर जाऊन पोहोचते. पण दुसरीकडे मात्र याच देशात ग्रामीण भागातील बऱ्याच महिला शिक्षणापासून वंचित राहत असतील तर आपण नक्कीच प्रगतीपथावर आहोत का? हा प्रश्न मनात उभा राहतो. स्त्रीला जर स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार नसेल, घरात पूर्णतः पुरुष सत्ताक व्यवस्था असेल तर संसदेत स्त्रियांना अगदी १००% जरी आरक्षण मिळालं तरी ती स्त्री स्वच्छंद आयुष्य जगू शकत नाही. तिचा लढा जर कुटुंबासोबत चालत असेल तर समाजातील इतर लोकांच्या लढ्यासाठी ती कधी सज्ज राहील ? खर तर कुटुंबे ही स्त्रीच्या पंखांमध्ये बळ देण्यासाठी असतात. पण हीच कुटुंबे जर तिचे पंख छाटत असतील तर नक्कीच कुटुंबातील सदस्यांनी मानसिकता बदलण्याची मला गरज वाटते. कारण बऱ्याच गोष्टी या मानसिकतेवर अवलंबून असतात. विचार करण्याची पद्धत, नवीन पिढीनुसार नवीन विचार अंमलात आणण्याची क्रिया या गोष्टी आताच्या काळात महत्त्वाच्या आहेत.
स्त्रियांवर / मुलींवर बलात्कार झाल्यावर बरेच जण त्यांच्या कपड्यांबद्दल बोलतात. मला मान्य आहे की यामध्ये मुलींची चूक असते. पण सगळ्या चुका या मुलींच्या नसतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रांझाच्या पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार केला तेव्हा तर महिला छोट्या कपड्यांमध्ये वावरत नव्हत्या. मग तरीही अशा घटना इतिहासातही का वारंवार घडत गेल्या ? याचं कारण एकच पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. घरातील लोक मुलींना सगळं शिकवतात बाहेर कसं बोलायचं, कोणासोबत बोलायचं, किती हसायचं, रात्री किती वाजता घरी यायचं अशा सगळ्या गोष्टी मुलींना शिकवतात. अर्थात हे चूक आहे असं माझं म्हणणं नाही पण किती घरातील लोक मुलांना शिकवतात की परस्त्री मातेसमान असते. इतर मुलींकडे पाहताना आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे ? या सगळ्या गोष्टी मुलांना कोणीच नाही शिकवत नाही. त्यामुळे एखाद्या मुलीने जर भले पूर्ण कपडे घातले असले तरी मुलाचा बघण्याचा दृष्टिकोन ठरवतो की तो मुलगा त्या स्त्रीकडे कोणत्या नजरेने बघतो.
मासाहेब जिजाऊंनी शिवबांना शिकवलं की पर स्त्री मातेसमान असते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जगातील एकमेव असे राजे आहेत ज्यांच्या महालामध्ये स्त्रियांचे नाच कधीच झाले नाही. कारण जिजाऊंची शिकवण होती की शिवबा तुम्हाला स्त्रिया नाचवणारे नाही तर स्त्रिया वाचवणारे राजे व्हायचय...