Photo by Nikolett Emmert on Unsplash
मी पेरला होता जीव मातीमध्ये माझा
त्याने पावसाचा वर्षाव केलाचं नाही
करपून देह गेला, मातीच्या उष्णतेने
हवेचा एकही हबका इकडे फिरकलाच नाही
जमीन कोरडवाहू गेली करपून सारी
ओलाव्याचा जराही झरा फुटलाचं नाही
मी तीळ तीळ तुटलो दु:खात राञंदिन
मातीला ममतेचा पाझर फुटलाच नाही
खावून टाकली सारी बियाणे पाखराने
आक्रोश माझ्या पिल्लांचा त्यांनी ऐकलाच नाही
पोसन्यात मश्गूल तो दुनियला सा-या
माझा एवढासा झोपडा दिसलाच नाही
मग बरसला असा की विसरून देहभान
रडना-या आसवांचा त्याला पत्ताच नाही
पेरलेला जीव माझा कधीच संपून गेला
आता अमृताचा फायदा उरलाचं नाही
त्याच्या या उद्वेगाने वाहून गेली माती
करपलेला मुडदा माझा त्याने पाहिलाचं नाही
घरात राहुन गेली माहेरवाशीण निम्नगा
गेली घेऊन सारे संसार उरलाचं नाही
संकटे झेलून सारी छातीवरी या उघड्या
झालोय हतबल मी पण हारलो नक्कीच नाही
फोडीण कोंब पुन्हा करपलेल्या त्या जीवाला
माती माय आहे वैरीण नक्कीच नाही.