Photo by Dương Hữu on Unsplash
नाते हा प्रत्येक सजीवाच्या जीवनातील सुंदर, निर्मळ, भावनिक बंध आहे. माणूस असो व प्राणीमात्र प्रत्येकाच्याच आयुष्यात नात्याची सुरवात आईच्या गर्भात असल्या पासून होते अस म्हणायला हरकत नाही. आईच्या गर्भात त्या इवल्याशा जीवांची अनेकांशी नाती निर्माण होतात. प्रेमाच्या, आपुलकीच्या नात्याला तेव्हाच सुरवात होते. आईच्या मनातील विचार, तिचे इतरांशी असलेले नाते मग ते प्रेमाचे, भावनेचे असो व विश्वासाचे असो, रक्ताचे असो वा मनानी जोडलेले असो त्या नात्यांची जाणिव त्या गोंडस जीवाला गर्भातच होत असणार.
जीवनात नाती अनेक असतात आणि ती कधीही कोणाबरोबरही होऊ शकतात. अथांग सागराला बंध ना कशाचे ओल्या मिठीत त्याच्या मन तृप्त होते.
नाती ही पण सागरा प्रमाणे असतात, ती इतकी व्यापक असतात की थोड्याशा प्रेमाने, आपुलकीच्या भावनेने ती अगदी झाड, फुल, प्राणी सगळ्यांना आपलंसं करतात सामावून घेतात. त्यांच्या जवळ असल्याने मन प्रसन्न होते.
सागराच्या कवेत रात्रीचा चंद्रप्रकाश घुसून लाटांमधून शिरतो त्याच्या कुशीत नाती ही एकमेकांना घट्ट बांधून ठेवतात जसा चंद्राचा प्रकाश हा लाटांवर परावर्तित होतो आणि त्यात एकरूप होऊन जातो तसच नात असतं आई आणि बाळाचं. बाळ जेव्हा रडू लागतं तेव्हा आई त्याला पटकन उचलून जवळ घेते आणि आपल्या कुशीत झोपावते आणि मग ते बाळही शांत पणे झोपी जात कारण त्यावेळेला त्याची आई त्याच्यासाठी सर्वस्व असते, त्याला विश्वास असतो की आपण सुरक्षित आहोत, आपल्याला कोणी काही करणार नाही कारण आई बरोबरच त्याच नात जे त्याच्या मनात निर्माण झालेलं असतं.
आकाशातील चांदणं जणू अवतरते लाटांवर मिठीत त्याच्या जणू सुखावते निरंतर... चांदणं जस लाटांवर सुखावत तसच नात असतं मुलांचं त्यांच्या आई वडिलांबरोबर. बाबा नेहमीच आपल्या मुलांच्या सुखासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी आणि भविष्यात यशस्वी आणि चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्नशील असतात, झ्टत असतात. कधीच आपल्या मुलांना दुःखाची झळ पोहचू देत नाहीत. ते नातच असा असतं की वरवर कधी फणसाच्या काट्यांसारख कठोर वाटल तरी आत एकदम गऱ्यांसारख मधुर असतं.
अशीच काही नाती ही रक्ताने जोडलेली असतात, जशी आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, मावशी, आत्या आणि अनेक जी सगळ्यांना एकत्र आणतात ज्यातून एक कुटुंब निर्माण होत आणि जे पेमावर, विश्वासावर अवलंबून असतं. ही नाती जपण ही तितकंच महत्त्वाचं असतं.
शिंपल्यातील मोत्यांप्रमाणे जपावी लागतात नाती...
नाहीतर गैर समजाच्या लाटेने विरून जातात नाती...
ह्या नात्यांना जपण्यासाठी त्यांना ही खत पाण्याची आवश्यकता असते. झाडांना जसा बहर येण्यासाठी त्यांची निगा राखावी लागते तसच नात्यांचही असतं. एकमेकांची प्रेमानी केलेली विचारपूस, भवणांचा आदर आणि वेळ प्रसंगी, कठीण समयी केलेली मदत, आधार आणि एकमेकांवरील विश्वास हाच पुरेसा असतो.
आंतर मनाच्या कोपऱ्यात उमलतात नाती...
प्रेम आणि विश्वासाने फुलतात नाती...
असच एक नाजूक नात प्रेमाचं जे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी निर्माण होतच. हळुवार उमलणाऱ्या कळीवर अलगद विसावलेल्या फुलपाखराला जस झाड सामावून घेत तसच एकमेकांमध्ये एकरूप होणार नात असतं. नवरा बायकोचं. सुख, दुःखाच्या प्रसंगी एकमेकांना साथ देत, एकमेकांना समजून घेऊन, मतभेद झाले तरी क्षणिक विसरून संसाराचा गाडा पुढे रेटत मनात कोरलेले नात असतं, जे हृदयातून निर्माण होत, जे कधीच लुप्त पावत नाही.
अशाच रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा काही नाती श्रेष्ठ असतात ती म्हणजे मैत्रीची. मैत्री ही कोणाशीही कधीही होऊ शकते. हे एक अस नात आहे जिथे कसलंच बंधन नसतं. कोणतीही गोष्ट सांगावीशी वाटली तरी मन मोकळे पणाने व्यक्त करता येते, कोणत्याही प्रकारची भीती मनात नसते. चेष्टा, मस्करी करायची मुबलक मुभा असते आणि भांडणातही एक गम्मत असते. म्हणूनच मैत्री मध्ये सगळं काही माफ असतं असे म्हणतात. ह्याच अलगद नात्यात जिव्हाळा असतो, एकमेकांसाठी काहीही करायची तयारी असते. असच अजून एक नात असतं भावा बहिणीच किंवा भावा भावांच, बहिणींचं जे प्रेमाने घट्ट बांधलेलं असतं. लहानपणी एकमेकांबरोबर घालवलेले दिवस ज्यात मस्ती, खेळ, भांडणं सगळंच असतं. कितीही राग आला तरी तो क्षणिक असायचा आणि खूप वेळा एकमेकांची पाहिलेली वाट सगळ काही आठवत. एकमेकांबद्दल अजून ओढ निर्माण होते.
ह्या ही पलीकडे एक नात जे भक्ती भावाने, श्रध्देने जोडले गेलेले असते ते म्हणजे परमेश्वराच. लहान असताना आई बाबा आम्हाला पालखी बघायला घेऊन जायचे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असायची आणि हजारोंच्या संख्येने वारकरी आणि त्या त्या गावातील लोकं पादुकांच्या दर्शनासाठी यायचे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी मैल मैल चालत जायचे, तहान भूक विसरून विठ्ठलाचा जप करत त्याच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूर पर्यंत जायचे. त्याच्या पायाशी नतमस्तक व्हायचे. त्यावेळी आम्हीही पादुकांचे दर्शन घ्यायचो आणि तेव्हा अस वाटायचं की खरंच त्या देवा बरोबर सगळ्यांचच काहीतरी मनानि नात जोडलं गेलंय. अस हे मननी जोडलं गेलेल नात ज्याच्यात कुठलाच स्वार्थ नसतो असते ती निव्वळ श्रद्धा ज्यामुळे पूर्णपणे देवाशी एकरूप होऊन जातो. अस नात ज्याला अंत नसतो ते मनात कुठेतरी खोलवर रुतलेल, जपलेलं, भावलेलं असतं.