आपण सगळेच लहान असल्यापासून मैदानी खेळांना प्राधान्य देत आलोय, मग ते मैदानी खेळ असोत किंवा पोहणे. लहानपणी मला आणि माझ्या भावाच्या पोहण्याची सुरुवातही शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत झाली. त्या वेळेला घराजवळच्या महाराष्ट्र मंडळच्या तलावात जायला सुरुवात केली, पण ताकद कमी असल्यामुळे म्हणा किंवा डबा लावून पोहणे हा कन्सेप्ट न जमल्याने म्हणा, तिथे काही पोहायला जमलं नाही. तसंच विहिरीत पोहणे हे पण त्या वेळेला दिव्यच वाटले. कसे काय लोक उड्या मारतात? त्यांना भीती वाटत नाही का? खाली गेल्यावर वर आलोच नाही तर? असे विविध प्रश्न भेडसावत होते. एकंदरीत काय तर भीतीने डोक्यावर साम्राज्य मिळवलं होते. त्यामुळे स्वाभाविकच पोहणे शिकण्यात खंड पडला.
त्यानंतर साधारण २ वर्षांनी असेल, swimming चं खुळ परत डोक्यात आलं, असं म्हणायला हरकत नाही. ह्या वेळेला मात्र साधारण निश्चयच केला की ह्या वेळेस तरंगायला तरी शिकायचंच. निश्चयाचा महामेरूच म्हणा. पण ह्या वेळेला मात्र स. प. महाविद्यालयाच्या तलावावर जायचं असं ठरलं. तो तलाव अनेकदा बघितला होता, पण आता जवळून संबंध येणार होता. मनात थोडी धाकधूक होतीच, पण पाठीला डबा बांधणार नाहीयेत म्हटल्यावर जरा हायसं वाटलं. ब्रेस्टस्ट्रोक हा प्रकार शिकवायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, काही दिवसांतच पोहायला जमतंय असं वाटायला लागलं. थोडे दिवसांनी एक छोटीशी परीक्षा ही झाली आणि चक्क ती क्लिअर झाली. ह्याचं मला मलाच आश्चर्य वाटलं. नंतर फ्री स्टाईलला सुरुवात केली, पण परत काही कारणांनी पोहण्याचा पूर्णविराम झाला. नंतर कित्येक वर्षे swimming आणि माझा दूरदूरपर्यंत संबंध आला नाही.
लग्न झाल्यावर रिसॉर्टमध्ये पूलवर जाणे एवढाच काय तो ऋणानुबंध. नंतर माझ्या मोठ्या मुलाला तो ६ वर्षांचा असताना पोहणे शिकायला म्हणून घेऊन गेले, तर साहेबांनी रडून रडून इतका गोंधळ घातला की सुरुवातीला १५ दिवस निम्मा वेळ बाहेर बसण्यात जायचा. तेव्हा वाटलं की हा पण आपल्या सारखाच घाबरट दिसतोय. पण नंतर काही महिन्यांतच तो पट्टीचा पोहणारा झाला. पहिल्यांदा श्रीनिवास सर आणि मग एस. व्ही. कुलकर्णी सरांकडे प्रशिक्षण घेत तो सगळे स्ट्रोक शिकला. बघता बघता competitive batch ला जायला लागला. खरं सांगायचं तर खूप अभिमान वाटायचा, पण अंतरमनात कुठेतरी माझं शिकायचं राहून गेलं ह्याचं कुठेतरी वाईटही वाटायचं. त्याच्या पाठोपाठ धाकटा मुलगाही शिकला आणि स्पर्धेत भाग घेऊ लागला. अगदी कोरोना चा lockdown लागेपर्यंत दोघेही नित्यनियमाने swimming करत असत आणि मी बघ्याची भूमिका बजावत असे. खूप वेळा वाटायचं परत swimming चालू करावं, पण आत्ता ह्या वयात कसं शिकायचं ह्या विचारांनी परत एक पाऊल मागे यायचं.
मागच्या वर्षी माझा नवरा आणि मुले दोघेही swimming ला जायला लागले. तसंच माझा नवरा ही सगळे स्ट्रोक शिकायच्या उद्देशानेच जायला लागला होता. त्यांच्या बरोबर एक-दोन दिवस नुसतंच जाऊन बसायला लागले आणि असं लक्षात आलं की कितीतरी मोठी माणसं ह्या वयात अजूनही शिकायला येत आहेत, कितीतरी म्हातारी माणसं पण swimming करत आहेत. मग मला काय हरकत आहे? खरंतर हे सगळेच माझे inspiration होते. मग मनाची तयारी करून शिकायच्या जिद्दीने अखेरीस १ एप्रिल २०२३ ला परत swimming चा श्रीगणेशा झाला. एस. व्ही. सरांकडे शिकायला सुरुवात झाली.
एप्रिल महिना असल्यामुळे, शाळांना सुट्टी असल्यामुळे लहान मुलांची गर्दी होती—अगदी ३–४ वर्षांच्या मुलांपासून १५–१६ वर्षांची मुले. तर काही साधारण माझ्या वयाची, तर अगदी म्हातारे आजोबा-आजीसुद्धा. प्रत्येक शिकणारे एकमेकांकडे अगदी कुतूहलाने बघायचे. कोणी ब्रेस्टस्ट्रोक, कोणी फ्री स्टाईल, कोणी बॅकस्ट्रोक शिकताना दिसायचे. क्वचितच कोणीतरी बटरफ्लाय शिकताना दिसलं की सगळ्यांच्या नजरा तिकडे वळायच्या. मनात बहुतेक असाच विचार येत असावा की आपण कधी शिकणार? इतरांचं माहीत नाही, पण माझ्या मनात अनेकदा विचार येऊन गेला. रोजच्या ४५ मिनिटांत सुरुवातीला फारसा कोणाशी संपर्क नाही यायचा. खूप sincerely करायचं आणि लवकर शिकायचं अशी मनाशी खूणगाठच बांधली होती, म्हणून असेल कदाचित. पण नंतर हळूहळू कळू लागलं—प्रत्येकाला शिकायला वेगवेगळा वेळ लागतो. मग आपसूकच जरा लोकांशी ओळखी व्हायला लागल्या, गप्पा मारणं चालू झालं. प्रत्येक जण एकमेकांना सल्ले देऊ लागला—असे पाय मारा, खूप सोपं आहे वगैरे वगैरे. साधारणपणे एक आठवड्यातच ब्रेस्टस्ट्रोक जमायला लागला. ५० मीटर non-stop पोहता आल्यावर खूप आनंद झाला. मग हळूहळू रोजच्या सरावामुळे पोहण्याचा आनंद मिळू लागला.
नंतर अचानक एक दिवस सरांनी फ्री स्टाईल शिकवायला सुरुवात केली. त्यावेळेस लक्षात आलं की kick मारणं एवढं सोपं नाहीये. मी आणि माझ्या बरोबर अजून दोघी जणी—आम्ही तिघी शिकत होतो. एक वेळ अशी यायची की जागेवरच थांबायचो; काही गाडी पुढे जात नसे. मग कालांतराने kick जमायला लागली, पण परत Goa trip मुळे खंड पडला. त्यानंतर आल्यावर माझी मैत्रीण चैत्राली तिने पण यायला सुरुवात केली. ती, तिची फॅमिली आणि मी, माझी फॅमिली—आमचा मोठा ग्रुप तयार झाला. मग मात्र धमाल यायला लागली. शिकता शिकता चेष्टा-मस्करी, एकमेकांची खेचणे, उगाचच लोकांवर कमेंट्स पास करणे असा टाइमपास चालू झाला. सरही सामील व्हायला लागले.
अशातच कसे २ महिने झाले कळलंच नाही. जून महिना चालू झाला आणि मुलांच्या शाळा-कॉलेजमुळे मुलांचं येणं अनियमित झालं, पण तरीही आम्ही चौघे मात्र नियमित जायचो. चैत्रालीला आधी अजिबातच पोहायला येत नव्हतं, पण थोड्याच दिवसांत ती ब्रेस्टस्ट्रोक शिकली. मग आम्ही एकत्र round मारायला सुरुवात केली. तोपर्यंत हळूहळू मला फ्री स्टाईल पण जमायला लागलं होतं, त्यामुळे अजूनच confidence आला होता. चैत्रालीने तर पणच केला होता म्हणाना—ती तिच्या नवऱ्याला म्हणाली की “आता मी मरेपर्यंत पोहणार.” बघता बघता लोकांची गर्दी कमी होऊ लागली. काही मोजकेच लोक रोज येऊ लागले, त्यामुळे आपसूकच सगळ्यांशी ओळख वाढली. एक मोठा ग्रुप तयार झाला. काहींना टोपणनावे पडली—क्षीरसागर उर्फ ‘पेटी’ (अर्थात हे नाव का आहे हे एक कोडेच होते), ‘मगर’ (खरंतर सुरुवातीला मला हे पण टोपणनावच वाटलं होतं, पण खरंच त्यांचं आडनाव मगर आहे ह्याचा साक्षात्कार नंतर झाला), ‘नवीन’—त्याची तशी जुजबी ओळख होती माझ्या शेजारच्याचा भाऊ म्हणून, पण त्याचं नाव नवीन आहे हे पहिल्यांदाच कळलं. मग का माहित नाही, पण सरांनी परत त्याचं आणि क्षीरसागरांचं नामांतर केलं—‘जुने सर’ आणि ‘नवीन सर’ म्हणून. तसं नामांतर करण्यात सरांचा हातखंडाच आहे, असं म्हणायला हरकत नाही. चैत्राली आणि चकोरला ते कधी कधी चेष्टेने चंद्र आणि चांदणी म्हणत. तर मयूरला मयुरेश्वर हे कोठून आलं त्यांनाच ठाऊक. आणि मला—बापट मॅडम नाहीतर अर्चिता. एवढंच नाही तर लहान मुलांनाही त्यांनी वेगवेगळी नावे ठेवली होती—उदाहरणार्थ चिन्मयला ढेरी टच, आदीला “अरे सर”, अजून एका मुलीला दही वडा. अशा विविध नावांनी लोकांची ओळख निर्माण व्हायची. अर्थात ही सगळी नावे अगदी प्रेमाने ठेवलेली आहेत आणि त्याच नावांनी ते हाक मारतात. मुलांबरोबर मस्तीही करतात, पण तितकेच कडकही आहेत. workout करण्यासाठी मागेही लागायचे. खरंच सगळ्यांना खूप तळमळीने शिकवतात. स्विमिंग करता करता सगळेच जण खूप धमाल करतात. कोणी एकमेकांची उगाच खेच काढतात, एकमेकांना taunts मारतात. कधी कधी तर असं वाटतं की हे स्विमिंगचं कोचिंग नाही तर हास्य क्लब आहे.
तसं बघायला गेलं तर रोजच्या ४५ मिनिटांत प्रत्येकाची एक तऱ्हा म्हणा, सवय म्हणा किंवा आवड म्हणा—बघण्यासारखी, नाहीतर वाखाणण्यासारखी आहे. कोणी उड्या मारणं एन्जॉय करतं, कोणी मुटके, तर कोणी उगाचच कबुतरासारखे आवाज करत swimming करतं.
असं जसजसं नियमितपणे पूलवर जायला लागले, तसा आणखीन परिचय वाढत गेला. तीन-चार महिन्यांत अनेकांशी ओळख झाली. त्यात एका विशेष ग्रुपशी—जो होता काही वरिष्ठांचा—सगळेच वर्षानुवर्षे नियमित पोहणारे, वेगवेगळ्या क्षेत्रातले. तर काही आडनावबंधू—त्यात प्रामुख्याने कुलकर्णी, बापट, भिडे ह्यांचा समावेश होता. तेही सगळे जण खूप आपुलकीने आमच्याशी बोलायला लागले. एक-दोन महिन्यांतच आमच्या छान गप्पा चालू झाल्या. सकाळी आम्ही गेलो की “आले बापट, आल्या चैत्राली, चला आता handover करा” म्हणत असत. थंडीच्या दिवसांत पाणी खूप गार असायचं, खूप थंडी वाजायची. पाण्यात उतरायची हिम्मत होत नसे. तेव्हा ते चेष्टेने म्हणायचे—“उतरा पाण्यात, गरम लाकडं टाकली आहेत.” मग आम्ही उतरल्यावर म्हणायचे—“चला, आता आमचा भोंडला आवरतो, तुम्हाला पूल मोकळा करून देतो.” हा जणू नित्य नियमच झाला आहे. त्यात सरांची entry झाली की “पुष्पा…” म्हणून जोरात ओरडतात. अशी मजा मजा करत swimming एन्जॉय करतात. कधी चहाला जातात, तर कधी high tea, तर कधी कोणाचा वाढदिवस साजरा करतात.
तसंच आमचा ग्रुप काही कमी नाहीये बरं का. सगळेच आता छान पोहायला शिकले आहेत. कोणी फक्त ब्रेस्टस्ट्रोक करतात, कोणी फ्री स्टाईल पण. तर मी आणि चैत्राली बॅक आणि बटरफ्लाय पण करायला लागलोय, असं म्हणायला हरकत नाही. आमची पण आता गँग झाली आहे. रोज काही ना काहीतरी जोक्स मारणं चालू असतं. taunts मारणं हा तर आमचाही हातखंडा आहे—कोणाला कोब्रा, तर कोणाला lovebirds. तर कधी कोणाला चिडवणं, उगाचच खेचणं हे तर नित्यनियमाने चालूच असतं.
वयाच्या ४५ वर्षांनंतर district swimming competition मध्ये भाग घ्यायचा ठरवलं. आव्हान अवघड होतं, पण प्रयत्न करायचा ठरवलं. श्री. कुलकर्णी सरांनी खूप प्रॅक्टिस करून घेतली. पहिल्यांदाच ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये participate केलं. खरंतर टेन्शन खूप आलं होतं, पण बक्षीस नाही मिळालं तरी ५० मीटर finish करायचं असं ठरवलं होतं. पण चक्क मी दुसरी आले ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये आणि नंतर बॅकस्ट्रोकमध्ये पहिली. आमच्या पूलवरून अजून एकाने भाग घेतला होता. माझा नवरा आला होता, त्याच्यामुळे moral support मिळाला. बऱ्याच वर्षांनी medals मिळाली. माझाच विश्वास बसत नव्हता, पण वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं फळ मिळालं.
त्यानंतर काही महिन्यांनी state competition होती. खरंतर म्हणावी तेवढी प्रॅक्टिस झाली नव्हती, पण तरीही एक अनुभव घ्यायचा असं ठरवलं. बालेवाडीला ५० मीटर पूलवर पोहण्याची पहिलीच वेळ होती. टेन्शन तर खूप आलं होतं. ह्यावेळेला माझा नवरा पण बरोबर नव्हता. फक्त पूलवरचे तीन जण होते. ५० मीटर बॅकस्ट्रोक आणि ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये participate केलं. बक्षीस नाही मिळालं—चौथी आणि पाचवी आले—पण भाग घेऊन ते अंतर पूर्ण केल्याचं समाधान होतं.
त्यामुळे जर तुम्ही एखादी गोष्ट शिकायची ठरवली, तर ती कोणत्याही वयात शिकता येते. फक्त कष्ट घ्यायची तयारी असेल, तर काहीही अशक्य नाही.
ह्या सगळ्याच्या जोडीला high tea—आम्हीही सगळे जण अगदी मोठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आहोत. आम्ही दोघी क्वचितच जातो Saturday ला, पण काहीजण मनात हुक्की आली की निघाले चहाला असेही आहेत. वाढदिवस हा तर अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. पूलवरच केक कट करून तो साजरा केला जातो. पूर्वी परत उचलून पाण्यात फेकायची प्रथा होती, पण कालांतराने ती बंद झाली आहे, असो. नुसतं तेवढ्यावर भागत नाही, तर पार्टी पण जोरात होते. सगळे मिळून बरेचदा with family हॉटेलमध्ये जातो.
अजून किती लिहू? लिहावं तेवढं कमीच आहे. असं हे माझं swimming चं व्यसन म्हणायला हरकत नाही. आणि असा हा आमचा swimming चा परिवार आहे. वरिष्ठ ग्रुपमधील डॉक्टर काकांनी त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, खरंच सगळ्यांना swimming चं चांगलं व्यसन लागलं आहे आणि ते असंच राहूदेत.