मावळतीच्या सूर्याचा प्रवास
क्षितिजापल्याड चालू झाला
सुख-दुःखाची गाथा विणत
अस्ताला गेला
नव्या वर्षाची नवी आशा
नवी स्वप्ने साकारताना
गत वर्षीच्या आठवणींना
उजाळा देत होता
पुसटशा पावलांच्या खुणा रेतीवरती विरून गेल्या
विशाल सागरापुढे त्या शुल्लक भासू लागल्या
वाहत गेलेल्या शिंपल्यात दुःख
सामावले होते
सुखाची ओंजळ भरून मोती
हातात विराजमान झाले होते
रात्रीच्या काळोखात लख्ख प्रकाश पडला होता
चांदण्याचा प्रकाश नवी स्वप्ने
फुलवत होता
केशरी रंगाचा सडा धरतीवर
पडला होता
नव्या वर्षाच्या दिवसाचा अरुणोदय झाला होता