Photo by Sylvester DSouza on Unsplash

तू यशोदा, तू सुभद्रा,
तूच द्रौपदी, तूच रुक्मिणी...

आई, पत्नी, बहीण, मैत्रीण, लेक, कलिग..असे कित्येक पात्र ती अगदी सहजरीत्या निभावते, कधी विचार केलाय का, ती नसती तर काय झालं असतं?

आई जन्म देते, बहीण पाठराखीण होते, बायको सोबती होते, मुलगी आधार होते. अशा अनेक भूमिका एक स्त्री निभावत असते. आपल्या कुटुंबावर संकट आल्यास ती महाकालीचे रूप धारण करते तर आर्थिक अडचणीत ती लक्ष्मी असल्याचे तिचे कर्तव्य पार पाडते, मुलांना शिकवताना सरस्वती होते तर सर्वांची भूक भागवण्यासाठी ती अन्नपूर्णाही होते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीनुसार एका स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो आणि तिची पूजा केली जाते, तिला सन्मानाने वागवले जाते आणि तिच्यावर प्रेमही केले जाते, तिची काळजी घेतली जाते.

आज महिला अनेक क्षेत्रात आपले नाव उंचावत आहेत. कुठलंही क्षेत्र असो, आज महिला सर्व क्षेत्रात अव्वल स्थानी आहेत. मेरी कॉम, साईना नेहवाल, कल्पना चावला, किरण बेदी, निर्मला सीतारामन, द्रौपदी मुर्मु अशी अनेक उदाहरणे आहेत. आजची स्त्री एका पुरुषापेक्षा अधिक कर्तव्य पार पाडत आहे मग ते घराबाहेर काम करून पैसे कमवून आणनं असो वा घरातील सदस्यांची काळजी घेणं, घर सांभाळणं. एक स्त्री तिचे संपूर्ण आयुष्य इतरांना समर्पित करते. लग्नाआधी असो किंवा त्यानंतर, ती नेहमी स्वतःसाठी न जगता, सर्वांसाठी असणारी तिची जबाबदारी अगदी उत्तमरीत्या पार पाडत असते.

पण त्याचा मोबदला म्हणून तिला काय अपेक्षित असतं? फक्त प्रेम, विश्वास आणि सन्मान! मग तो घरच्यांकडून असो किंवा समाजाकडून.

पूर्वीच्या काळात मुलींना शिकवत नसत, कारण जास्त शिकली तर ती तिच्या मर्यादा ओलांडून पुढे जाईल. घराची अब्रू मुलीच्या हातात असते असं ऐकलंय मी, पण फक्त मुलींवरच का, हे कृत्य तर मुलं करतात ना, मग त्यांच्या हातात का नसते ? काहीही झालं तरी आळ मुलीवरच का! तिची तर काहीच चूक नसते ना त्यात.. तरीही?

जग बदललंय, मुलगी शिकतेय, प्रगती करतेय, मोठ मोठ्या पदावर विराजमान होतेय, यशाचे शिखर गाठतेय. आज ती स्वतंत्र आहे, तिचे निर्णय ती स्वतः घेतेय, ही अतिशय कौतुक करण्यासारखी बाब आहे पण स्वतंत्र असून ती सुरक्षित आहे का हा एक यक्ष प्रश्नच आपल्यासमोर आहे..त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत कोणी का बोलत नाही किंवा फक्त चर्चा होते, कृती का होत नाही?

आज मुली स्वतंत्र आहेत, सुरक्षित आहेत का?

आणि या मागचं कारण काय तर ती घरातून वेळी अवेळी बाहेर पडत असते, तिने हळू आवाजात बोलायला हवं होत, तिने माझा अपमान केला, ती मला नकार देऊन गेली, ती माझ्यावर ओरडली, ती माझ्यापेक्षा जास्त शिकली, ती माझ्यापेक्षा जास्त कमवते..हो ना? हीच ती कारणं ना?

अगदी योग्य आहे समाजाचं, तिने असं वागायला नको होत, चूक केली तिने, शिक्षा तर मिळायला हवी ना!

हे मी नाही, आपल्याच समाजातील, आपलेच नातेवाईक म्हणत असतात. एखादी स्वप्नाळू, धाडसी, हुशार, कष्टाळू मुलगी चूकच करत असते, तिने स्वप्न नको बघायला, जास्त मोठी झाली तर लोकांच्या डोळ्यात येईल ना, त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागेल. आणि स्वाभिमानाला ठेच लागली की समोरची व्यक्ती काय करेल ह्याचा अंदाज नाही, असं तिचे आई-बाबा तिला सांगतात. अनेक मुली आज ह्याच कारणांमुळे समाजात आपली जागा घडवताना घाबरतात.

निर्भया, श्रद्धा, लक्ष्मी अशा अनेक मुली बलात्कार, ऍसिड अटॅक, घरगुती हिंसा, इ. ला बळी पडल्या आहेत. आपल्या देशात अजूनही गुन्हेगारास कठोर शिक्षा देणारा कायदा नाही किंवा असेही म्हणता येईल की गुन्हेगार कायद्यास आपले काम करूच देत नाही,संपूर्ण पुराव्यांची विल्हेवाट लावतात, जेणेकरून पोलिस प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आता अशा स्थितीत मुलींनी करायचं काय?

आपण सहसा आपल्या सभोवताली ज्या गोष्टी घडत असतात त्यातून शिकत असतो, मग त्या योग्य असो वा अयोग्य, याची पडताळणी आपण करत नाहीत. आपण सर्वच कोणाला तरी आदर्श मानतो. पण ज्या व्यक्तीला आपण आदर्श मानत असतो त्या व्यक्तीकडून आपल्याला खरंच काही योग्य मार्गदर्शन मिळत आहे का? आपल्यातील बहुतांश लोक बॉलीवूड अभिनेता/ अभिनेत्री यांना आदर्श मानतात आणि त्यांनी सादर केलेल्या पात्रातून किंवा त्यांच्या भूमिकेतून अनेक गोष्टी आत्मसात करतात. काही काळ पूर्वी, Animal, Kabir Singh असे काही चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि त्यात मुलींवर अत्याचार किंवा त्यांच्याशी गैर वर्तन करणे साहजिक आहे असे दर्शवण्यात आले होते, आता मला सांगा, आपण जर ह्या भूमिकांना आदर्श मानलं तर आपणही त्यातून हेच शिकणार ना? आजकालची अगदी १०-१२ वर्षांची मुलं सुद्धा ह्या सिनेमांतून प्रभावित होऊन अनेक चुकीच्या गोष्टी आत्मसात करत आहेत. आता लोककल्याणासाठी अशा चित्रपटांवर कडक नियम असावेत, जेणेकरून येणारी पिढी त्यास बळी पडणार नाही आणि त्यांच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. कारण मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच हे सुद्धा एक कारण आहे आणि सर्वात जास्त अत्याचार यामुळेच होत असावेत, असं मला वाटतं.

आपल्या देशात दररोज तब्बल १०० मुलींवर अत्याचार होतो, आणि हे गुन्हे दाखल झालेल्यांपैकी, म्हणजे दाखल न झालेले अजून कितीतरी असतील.

मागील वर्षी वृत्तपत्रात प्रत्येक दिवशी ३-४ बातम्या फक्त मुलींवर झालेल्या अत्याचारावर अवलंबून होत्या. गुन्हा करणाऱ्यांची वये फार जास्त मोठी नव्हती , अगदी १० वर्षांच्या मुलापासून सुरुवात होती. आता १० वर्षाच्या मुलाला काय कळतं ह्यातलं? असंच ना? पण त्याच्या कडून कोणी करूनही घेत असेल ना? मी पूर्ण बातमी वाचल्यानंतर मला कळलं की त्या लहानग्या मुलाकडून हे सर्व एक महिला शिक्षिका करून घेत होती, आणि त्या सर्वाला बळी पडणारी जास्त लहान नाही पण फक्त ६ वर्षांची मुलगी होती. मला सांगा, काय दोष होता तिचा? ती मुलगी आहे, हा? आणि हे सर्व करणारी ती शिक्षिका सुद्धा स्त्रीच होती ना?

मागील वर्षी अतिशय गाजलेलं श्रध्दा प्रकरण! तिने एका व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्यातही तिचीच चूक का?

आता काहीदिवसांपूर्वी घडलेली गोष्ट, स्पॅनिश महिलेवर झारखंड येथील काही माणसांनी बलात्कार केला, तिच्या पतीवर हल्ला केला. ती तर आपल्या देशाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी आली होती ना? पण तरीही तिच्यासोबत हे सारं का घडलं?

मुलगी कुणा परक्याचे धन आहे हे समजणं आता बंद करायला हवं आणि ती तिची स्वतंत्र आहे हे लोकांना समजावं. घराच्या बाहेर पडली की ती कुणाची संपत्ती नाही आणि कुणाची जबाबदारी ही नसावी, तिने स्वतः स्वतःचं रक्षण करावं.

एका स्त्रीच्या मनात आलं तर ती काहीही करू शकते हे तिने सुध्दा समजायला हवं. ती समाजातील एक अविभाज्य घटक आहे, पण कुठली वस्तू नाही की तिला आपण कुठल्याही वस्तू समान वागवावं किंवा ती बाजारचा भाजीपाला ही नाही, तिलाही भावना आहेत. ती अबला नाही, शूर आहे. तिच्यात ९ महिने यातना सहन करून एका नव्या जीवाला जन्म देण्या इतपत शक्ती असेल तर कोणी एका तिच्यासारख्या स्त्रीने जन्म दिलेल्या, पण इतर स्त्रियांना,मुलींना त्रास देत असणाऱ्या महिषासुराचा वध करण्या इतपत सुद्धा शक्ती आहे, हे तिने समजावं.

ती लक्ष्मी आहे पण दुर्गा सुद्धा आहे. ती सस्वती आहे पण अन्नपुर्णा सुद्धा आहे. तिच्यात असंख्य अडचणींवर मात करण्याची शक्ती आहे. तिला जे हवं ते मिळवण्यासाठी ती सुद्धा काहीही करू शकते, पण एक स्त्री कायम सर्वांच्या मनाची आणि आरोग्याची सुद्धा काळजी घेत असते आणि हे सर्व करताना तिचं संपूर्ण आयुष्यच संपून जातं मग ती स्वतःसाठी जगणार कसं?

स्त्रियांना स्वतंत्र जगू द्यायला हवं. पण आजच्या अशा जगात कुठलीही स्त्री स्वतंत्र असून सुरक्षित राहू शकत नाही.

ह्या सर्व गोष्टींवर आळ आणायला हवा, हे सर्व थांबायला हवं नाहीतर मुली स्वप्न पाहणं थांबवतील आणि देशाची प्रगती थांबेल.

मुलीला कमी समजण्यापेक्षा तिचा सन्मान करणे लोकांना शिकवायला हवं, तिला तिचे अधिकार मिळवून द्यायला हवे, तिला योग्य वागणूक मिळायला हवी.

सर्वप्रथम, स्त्रीने स्वतःला कमी लेखणे बंद करायला हवे, अनेक प्रश्न तर त्यानेच सुटतील, असं मला वाटतं. एक महिलाच दुसऱ्या महिलेची शक्ती होऊ शकते.

पण महिलांवरील अत्याचारावर नेमके उपाय काय? असं काय केलं तर ह्या सर्व गोष्टींना आळ बसेल?

यावर अनेक उपाय आहेत, जसे,

  • हे सगळं थांबवण्यासाठी आपण मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे,फक्त शालेय शिक्षण देऊन काही उपयोग नाही, त्यांना स्त्रियांचा आदर करता आला पाहिजे. मुलांना आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी माहिती करून देणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, जेणे करून ते कुठलीही चुकीची कामे करणार नाहीत.
  • मुलींना सुद्धा लहानपणापसूनच कराटे, जुदो, मार्शल आर्ट असे स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे, जेणेकरून त्या आपले रक्षण स्वतः करू शकतील आणि आपली जबाबदारीही स्वतः घेऊ शकतील.
  • आजही अनेक गावात महिला पुरेशा शिक्षित नाहीत, आणि या मागचं कारण म्हणजे, त्या स्वतःहून पुढाकार घेत नाहीत किंवा त्यांना घराच्या जबाबदारी मुळे बाहेर पडता येत नाहीये. एक स्त्री शिकली तर ती पूर्ण घराला शिक्षित करेल. प्रत्येक महिला ही शिक्षित असायलाच हवी, शिक्षण ही काळाची गरजच नसून ती आवश्यकता आहे आणि ते सर्वांना मिळावं. शिक्षणाने अनेक प्रश्न सुटतील.
  • स्त्रीसाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो शृंगार! आपण आज आधुनिक काळात जगतो म्हणून आपण पाश्चात्य संस्कृतीचेच अनुकरण करायला हवे असे नाही! आपली संस्कृती आपण जपायला हवी. कुठलीही स्त्री साडी परिधान करते तेव्हा तिच्यासाठी जी आदराची भावना समोरच्या व्यक्तीच्या मनात येते ती कुठल्याही शॉर्ट ड्रेस परिधान केलेल्या मुलीसाठी किंवा महिलेसाठी येत नाही आणि हे सत्य आपण टाळू शकत नाही. आता माझ्या अनेक मैत्रिणी असंही म्हणतील की कपड्यांवर का बंधन असावं? पण मला वाटतं की आधुनिकीकरण विचारातून दिसावं. आणि पाश्चात्य संस्कृतीचे कपडे परिधान करून आपण आधूनिककरण तर अजिबातच दर्शवत नाही, उलट आपण आपल्या संस्कृतीचा अपमान करत असल्याची जाणीव होते. आणि आपल्या संस्कृतीत प्रत्येक वस्त्र परिधान करायची एक निराळी पद्धत कुठल्यातरी कारणामुळेच असेल ना? मग आपण जपायला हवी आपली संस्कृती. आणि हे पालकांनी मुलांना शिकवायला हवं आणि मुलांवर चांगले संस्कार करायला हवे. कारण आपला भारत देश आपल्या संस्कृती-परंपरा आणि आपल्या संस्करांसाठीच प्रसिद्ध आहे.
  • आपल्याकडे मुलगी घराबाहेर गेली की तिला प्रश्न विचारतात की कोणासोबत आहे, कुठे चालली, कधी येणार, काय काम आहे? पण मुलांना बऱ्याचदा विचारत सुद्धा नाहीत. असं का? जर मुलगी सुरक्षित राहावी असं वाटत असेल तर आता मुलांना प्रश्न विचारा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलींवर विश्वास ठेवा.
  • एवढं सगळं करून तोवर काही उपयोग नाही जोवर मुलींची मनस्थिती बदलत नाही. फक्त घरातील कामांमध्येच नाही तर, घराबाहेरील कामात सुद्धा नाविन्य आणायचे तिने आता मनावर घ्यावे.‘मी आणि माझं घर’ नाही तर, ‘मी आणि माझा देश’ असा विचार तिने करायला हवा.
  • आता राहिला प्रश्न देशातील कायदा व्यवस्थेचा तर, देशातील कायदेव्यावस्था आणखी भक्कम असावी. पण जोपर्यंत महिलांना किंवा मुलींना त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याबाबत माहिती मिळणार नाही तोपर्यंत त्या कायद्यांचा उपयोग होणार नाही, तर त्या कायद्यांची आणि महिलांच्या अधिकरांबाबत त्यांना माहिती देणारे कार्यक्रम राबवण्यात यावे. आणि फक्त कार्यक्रमाचं नव्हे तर त्यावर कृती सुद्धा व्हावी. उदा., पीडित महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अन्यायाविरोधात लढा द्यावा, आणि अन्याय होताना पाहत असाल तर तो थांबवण्यासाठी जे करता येईल ते करावं, पुरावे सापडले तर ते न्यायालयात हजर करावे.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या द्वारे आपण ह्या घटना घडण्यापासून रोखू शकतो, त्यावर आळ घालू शकतो.

स्त्री आहे तर आपण आहोत. जीवनदायीनी तीच आहे, सृजनकरता तीच आहे आणि संहारिणी सुद्धा तीच आहे. तिचा अपमान करू नका आणि होऊही देऊ नका. कारण,

यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:|

.    .    .

Discus