Photo by Louis Galvez on Unsplash

महिला! खरच देवाने आपल्याला जगात अशी एक अनमोल गोष्ट दिली आहे ती म्हणजे स्त्री! स्त्री ही आजच्या दैनंदिन आयुष्यातील अशी व्यक्ती आहे जिच्याशिवाय आपले सर्वायुष्य हे अर्धवट आहे! ते म्हणतात न प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या संघर्षामागे, त्याच्या प्रगतीमागे त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत आपला संसार थाटणारी एक यशस्वी स्त्री देखील उभी असते हे विसरता कामा नये! परंतु आजचा हाच नराधम पुरुष वर्ग ह्याच स्त्रीचा फक्त खांदाच काय तर तिच्या सर्वांगाचे एखाद्या हिंस्त्र गिधाडाप्रमाणे लचके फाडताना दिसतोय. आजच्या पिढीतील द्रौपदीचे वस्त्रहरण आजच्या पिढीतील दुर्योधन आणि दुःशासन अगदी राजरोसपणे करत आहेत. ना त्यांना कसली लाज ना लज्जा! गेले काही दिवस झाले मी प्रसारमाध्यमांच्या गाजवाजातून म्हणा किंवा दररोज जणू राजधानी एक्स्प्रेसच्या वेगाप्रमाणे टीव्हीवरील न्यूज चेनलवरील धावणाऱ्या बातम्यांमधून म्हणा सतत हिंसाचारी अत्याचारांचे पाढे ऐकत आहे. आपण म्हणतो घरात वंशाचा दिवा हवा पण पणती शेजाऱ्यांच्या दारात जन्माला येवो! अहो पण दारात जन्माला आलेला वंशाचा दिवा किती समजंस आणि किती संस्कारी आणि किती सभ्य आहे हे सध्याच्या महिलांवरील होणाऱ्या क्रूर अत्याचारांमधून आपल्याला समजले असेलच!

जर ह्या लेखात मी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे पाढे इथे वाचण्यास सुरुवात केली तर मला ह्या लेखाचे शंभरापेक्षा जास्त भाग काढावे लागतील! नेशनल कमिशन फॉर वूमन (NCW) च्या माहिती नुसार २०२२ पर्यंत ३१००० तक्रारी ह्या फक्त महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांबद्दल दाखल झालेल्या आहेत! २०२० मध्ये नेशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) ने अधोरेखित केलेल्या माहिती नुसार ३ लाख ७१ हजार ५०३ केसेस, तर ४ लाख २८ हजार २७८ केसेस ह्या २०२१ मध्ये नोंदवल्या गेल्या आहेत! काय आहे हे? आणि ह्या निलाजऱ्या नालायकांचे अत्याचार करण्यापूर्वी हात कसे धजावत नाहीत ह्याचच नवल वाटतंय! ह्या अत्याचारांमध्ये सगळ्यात महाभयंकर अत्याचार जर कोणता असेल तर तो बलात्कार! २०१२ च्या दिल्लीच्या बस मधील ज्योती सिंग वर झालेल्या सामुहिक बलात्कारासारख्या महाभयानक घटनेनंतर हे बलात्कार थांबले? नाही थांबले! हे बलात्कार होत च राहिले, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा पारा हा वर चढतच गेला! २०१३ मध्ये मुंबईत एका २२ वर्षाच्या जर्नलिस्ट वर ५ जणांनी सामुहिक बलात्कार केला; त्यानंतर १८ मे २०२२ मध्ये श्रद्धा वालकर ह्या २७ वर्षीय भारतीय महिलेचा तिच्याच २८ वर्षीय प्रियकराने अत्यंत क्रूरपणे तिचा गळा दाबून खून केला! इतके करून देखील तो प्रियकर थांबला नाही तर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून ते तुकडे फ्रीज मध्ये साठवून ठेवले आणि तिची ओळख लपवण्याच्या हेतूने तिचा संपूर्ण चेहरा जाळला! त्यानंतर ची सगळ्यात महाभयंकर घटना घडली ती दिल्ली मध्ये! नुकतेच ह्या आठवड्यात घडून गेलेले साक्षी प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती असेलच; गेल्या अडीच वर्षांपासून सुरु असलेले हे रिलेशनशिप क्षणात एका हत्याकांडापर्यंत येऊन पोहोचलं! तब्बल २१ वेळा साक्षीच्या पोटात चाकूचे सपासप वार करून तिला भोसकले आणि तिचा चेहरा दगडाने ठेचून ठेचून तिची निर्घुण हत्या केली! काय होती तिची चूक? रिलेशनशिप मध्ये होती ही तिची चूक? की ती एक महिला आहे ही तिची चूक? आणखी किती गुन्ह्यांचे पाढे वाचू?

एवढ सगळ होत असतांना देखील पिडीत महिलेच्या घरच्यांना धमकावून त्यांच तोंड बंद ठेवायचं! आपल्या मुलीची अब्रू वाचवण्यापाई बिचारे त्या पिडीत महिलेचे आई वडील भीतीपोटी कोर्टासमोर उभ राहायला सुद्धा मागत नाहीत! एवढी ह्या भडव्यांची मिजास? ह्या नराधमांना फक्त जन्मठेपच काय तर फाशीची शिक्षा सुद्धा कमीच आहे! आणि एवढ सगळ सुरु असताना देखील आपले सो कॉल्ड सरकार ह्या बाबत मौन कसे ठेवतात ह्याचंच आश्चर्य आहे! सत्ता ही पैशांवर चालते की जनतेच्या पाठींब्यावर हेचं मला कळत नाही! मतदानाच्या वेळी जनतेच्या दारोदारी जाऊन आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या अशा विनंत्या करना मंत्री जेव्हा देशात हिंसाचारी आणि विशेष म्हणजे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना घडतात तेव्हा कुठेच दिसत नाहीत! ते दिसणार फक्त मोर्च्यामध्ये लंबे चौडे भाषणं देतांना, ते दिसणार कुठेतरी कसलं तरी उद्घाटन करतांना आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट ह्या दोन दिवशी कुठे तरी एका भव्य दिव्य कार्यक्रमात झेंडावंदन करतांना बस्स! आपल्या देशात असे असंख्य मंत्री आहेत ज्यांनी कोणते न कोणते गुन्हे केले आहेत, पण स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचा सो कॉल्ड स्वाभिमान जपण्यासाठी ह्या मंत्र्यांचे गुन्हे कधीच समोर येत नाहीत! समोर येतात ते फक्त आणि फक्त सामान्य माणसांचे गुन्हे! ज्या गुन्ह्यांचे खटले वर्षानुवर्ष चालत राहतात! आज हे कोर्ट!, उद्या हाय कोर्ट!!, परवा सुप्रीम कोर्ट!!! आणि परत आपले पुन्हा पाढे पंचावन्न आणि गुन्हेगार पुन्हा आपले गुन्हे करण्यास मोकाट! आणि ह्याच मुळे संपूर्ण परिस्थिती पाहता खरच आजच्या सरकारचा मेंदू हा खरच ठिकाणावर आहे का? असाच प्रश्न करावा लागतोय. आज आपल्या देशातील महिलांचा आदर करणे त्यांचा सन्मान करणे हे आपले परम कर्तव्य आहे! आज हीच श्रद्धा, हीच साक्षी हीच ज्योती कोणाची तरी बहिण होती, कोणाची मैत्रीण होती! जर ह्या गुन्हेगारांना असच मोकाट सोडल तर आजच्या पिढीतील सो कॉल्ड वंशाचे दिवे उद्या आपल्याही घरातील पणतीला विझवण्यासाठी मागे पुढे पाहणार नाहीत! सध्याच्या ह्या लव जिहादच्या प्रकरणाकडे पाहून तरी असेच वाटतेय ! प्रेमाचा बनाव रचून मुलींचे धर्मांतरण करून मुलींचे शारीरिक आणि लैंगिक छळ करण्यात कसला ह्या लोकांना पुरुषार्थ वाटतो? आणि हेच घाणेरडे उद्योगधंदे करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात वंशाची पणती येण्याऐवजी वंशाचा दिवा हवा असतो का?

आपण आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो न सगळे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशबांधवांशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे! ही आपली आपल्या देशातील महिलांप्रती निष्ठा? आपण दर रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला “मी तुझी रक्षा करीन अस वचन देतो” अन तिच्याकडून हातावर राखी बांधून घेतो. आज जो भाऊ दर वर्षी रक्षाबंधनाला आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतो तोच भाऊ आपल्याच बहिणीच्या पोटात सुरा खुपसायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही! मग ह्या रक्षाबंधनाला काय अर्थ?

आपण आपल्या घरातल्या मुलींवर संस्कार करतो न, की बाहेर जाताना नीट जा, सगळ्यांशी नीट प्रेमाने, मायेने बोल, बाहेर जातांना निट कपडे घालून जा, साडीच घाल! ड्रेस घालूच नकोस! बाहेर कोणाशी हसून बोलू नकोस, कोणाशी तर बोलूच नकोस! पार्टीला नको जाउस, एन्जोय करू नकोस! कित्ती कित्ती जाचक बंधन घालतो न आपण आपल्या घरातील मुलींवर? त्यापेक्षा न एवढी बंधन आपल्या घरातील मुलींवर घालण्यापेक्षा आपल्या घरातील वंशाच्या दिव्यावर मुलींचा आदर कर हा एकच मौल्यवान आणि महत्त्वाचा संस्कार करा! मग बघा आपल्या घरातील च काय ह्या देशातील प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री आपले स्वतःचे आयुष्य कसे बिनधास्त जगते आणि ह्या विश्वात आपली गगनभरारी कशी घेते ती!

अहो फक्त हातात एक पाच रुपयाची मेणबत्ती घेऊन हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अन #Justiceforswati, #Justiceforshraddha, #Justiceforsakshi, #weantjustice, #hangtherapist असे फॉर्मल हॅशटॅग्स वापरून सोशल मिडीयावर फक्त नावासाठी स्टेटस ठेवण्यापेक्षा ना आपल्या घरातील वंशाच्या दिव्यावर महिलांचा आदर कर हा एकच संस्कार करा मग बघा आपल्या घरातील लक्ष्मी जेव्हा घराबाहेर आपले पाऊल टाकेल न तेव्हा हे जग तिला स्वच्छंद भरारी घेण्यासाठी आपलंसं वाटेल! शेवटच्या काही ओळी ह्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अन महिलांवर होणाऱ्या अत्त्याचाराविरुद्ध न्याय मागण्यासाठी!

डोळ्यांवर बांधुनी पट्टी काळी न्याय त्यांना मिळेल का?
अत्याचाराचे पुरावे हजार, आरोपींना शिक्षा होईल का?
न्यायदेवता, न्यायदेवता? कधी होईल सत्याची पूर्तता?
का? अजूनही आहे अन्यायास स्वातंत्र्यता
धूर्त राजकारणापुढे न्यायदेवता तू हताश आहेस
गुन्हेगार सारे मोकाट अन पिडीताला पाश आहे!

.    .    .

Discus