Photo by Erik Witsoe on Unsplash

पाऊस असा रिमझिमता, कधी कोसळणारा, कधी बरसणारा, कधी भिजवणारा, कधी ओसरणारा तर कधी रिझवणारा...

पाऊस कधी मिणमिणता तर कधी किणकिणता, कधी हळूवार पानावरील दवबिंदू सारखा, कधी मोत्यासारखा चकाकणारा, कधी सळसळणारा, कधी डोळ्यांतील आसवांसारखा टिपटिपणारा तर कधी घामाच्या धारांसारखा टपटपणारा... पाऊस कधी पैजणासारखा रुणझुंणणारा तर कधी इंद्रधनुच्या रंगाची उधळण करणारा....

अनेकविध विविधतेने नटलेला, इतरांच्या आयुष्यात रंगांची उधळण करणारा पाऊस स्वतः मात्र कोरडा, बिना कोणत्याही रंगाचा... किंबहूना ज्याला जसा हवा तशा रंगात रंगणारा...

इतक सगळं असूनही प्रत्येकाचा पाऊस मात्र वेगळा!

शेतकरयाला पाऊसात आपली भाकरी दिसते तर छत्रीला पाऊसात आपली चाकरी दिसते. कोणाला या पाऊसात आपल्या बोटी दिसतात तर कोणाला याच पाऊसात कोटी दिसतात. कुणाच्या आयुष्यात हा पाऊस आशेची पालवी घेउन येतो तर कुणाला तरी तो मायेची सावली देऊन जातो. कुणाच्यातरी आयुष्यात सुखाची झालर पसरताना हाच पाऊस कोणाला तरी दुखाची दाट चादर ही ओढवून जातो. एवढं मात्र खरं की प्रत्येकाचा पाऊस मात्र वेगळा असतो.

पाऊस आणि मानवी मन यांच एक वेगळच नात आहे. तो जितका बाहेर कोसळत असतो किंबहूना त्यापेक्षा जास्त तो मनात बरसत असतो. आठवणींचा पाऊस.... आणि एकदा का हा बरसायला लागला की डोळ्यांना कधी पूर येईल याचा काही नेम नसतो. कोणाला या पाऊसात गुलज़ार आठवतो तर कुणाला गारवातील सौमित्र...

"नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी"
अस म्हणत कुणाला इंदिराबाई स्मरतात तर
"आला पाऊस पाऊस
आल्या सरी वर सरी"

म्हणत कुणाला बहिणाबाई...

कोणा रसिकाला लतादीदी आठवतात तर कुणाला आशाताई तर कुठे पाऊसात मनाचा ठाव घ्यायला रफी, किशोर ही स्मरतात. कुणाच्या प्रेमाच्या आठवणी स्मरतात अमिताभ आणि स्मिता पाटीलच्या "आज रपट जाए" वर एखादा विरहाचा कोपरा

"लगी आज सावन की फिर वो झडी है"... म्हणत सुरेश वाडकर जागवतो.

"अब के सावन जमके बरसे".... अस म्हणत कुणाच्या मनात शोभा मृदगलचा आवाज रुंजी घालतो तर...

"वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ".... म्हणणारा दादा कोंडके भर पाऊसातही मनावर अधिराज्य गाजवतो.

"प्यार हुआ इकरार हुआ" वाला राज कपूर आणि नर्गिस पाऊसात एकाच छत्रीत भिजताना जितके आपले वाटतात तितकाच "भिगे ओठ तेरे प्यासा दिल मेरा" म्हणणारा इम्रान हश्मी सुद्धा प्रेमाची उत्कंठा वाढवतो. "टिप टिप बरसा पानी"... म्हणणारी रवीना आणि अक्षय अंगाअंगात आग लावताना

"अभी जिंदा हू तो जी लेने दो, भरी बरसात मे पी लेने दो" म्हणणारा नसरुदीन शाह आणि मकरंद देशपांडे जीवनाची कहाणीच सांगुन जातात.

"येरे येरे पावसा, तुला देतो पैसा" करत आपल्या बालपणात शिरणारा हा पाऊस

"सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?"अस म्हणत त्याला प्रश्न विचारायला ही भाग पाडतो. सलीलच्या "अग्गोबाई ढग्गोबाई" वर बच्चेकंपनी सुरात ताल धरते.

बालकवींची...  "श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे" ने तर आपल बालपण समृद्ध केलेले असते.

"पाऊसात न्हाऊ, काहितरी गाऊ" म्हणत गदिमांनी लिहिलेलं आणि पुलं च्या संगीताने सजलेल..

"नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच" अगदी अबाल वृध्दांनाही थोड का होईना थिरकायला भाग पडते.

थोड वयात आल्यावर सुमनताई चे "केतकीच्या बना तिथे नाचला ग मोर" चे स्वर आठवतात किंवा "येरे घना येरे घना न्हाऊ घाल माझ्या मना" म्हणत आरती प्रभू ही आळवले जातात.

"श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा" म्हणत खळेकाका सुद्धा साद घालतात. शांताबाईनी रचलेल आणि आशाताई नी गायलेल

"नभ उतरू आलं चिंब थरथर वल" म्हणत एखादी धुंद पावसाळी संध्याकाळ मनात घर करून राहते.

सासुरवाशिणीना तर "आला आला वारा संगे पावसाच्या धारा" हा आशाताईचा स्वर थेट माहेरचा पाहुणा म्हणूनच भेटायला येतो तर माहेरची ओढ त्यांना

"ढग दाटून येतात, मन वाहूनी नेतात, ऋतू पावसाळी सोळा, थेंब होऊन गातात" हे गुणगुणायला भाग पाडतात.

आणि अशाच मग एका पावसाळी कातरवेळी पाडगावकर स्मरतात... "भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची" किंवा मग ग्रेस आठवतात... "ती गेली तेव्हा रिमझिम, पाउस निनादत होता" असा प्रत्येकाच्या मनातला, आयुष्यातला पाऊस हा वेगळा असतो नव्हे तो प्रत्येक क्षणाक्षणाला बदलत राहतो. परंतु शेवटी जगजीत सिंग यांच्या स्वराशी मात्र प्रत्येक मन सहमत होते...

ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो
भले छिनलो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो, बचपन का सावन
वो कागज़ कश्ती, वो बारीश का पानी
वो बारीश का पानी...

असा हा पाऊस... तुमचा, माझा, सगळयांचाच पण सगळयात असूनही वेगळा... बरसणारा, तरसणारा कारण, "अजूनही बरसात आहे..."

.    .    .

Discus