धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा अधिक त्या व्यक्तीला देवाच्या कृपेची प्रचिती होते. कोणत्याही व्यक्तीवर किंवा देवावर श्रद्धा असण्यासाठी त्याबद्दल पूर्ण माहिती असावी लागते. आपल्या शास्त्रात, उपनिषदांमध्ये देवाचं महात्म्य हे लिहून ठेवलं आहे. या सर्वांचं वाचन आपल्याला आज शक्य नाहीये. शास्त्र, उपनिषद यांचा सार असलेला 'भगवद्गीता' हा ज्ञानग्रंथ हा कदाचित ही गैरसोय टाळण्यासाठी उपलब्ध करण्यात आला असावा. खूप देव आणि त्यांच्या उपासनेच्या विविध पद्धती असल्याने हिंदू धर्मातील लोकांसमोर बऱ्याच वेळेस असे प्रश्न पडतात की,
"नेमकं कोणत्या देवाला नमस्कार करावा ? आणि का ?"
किंवा
"मी गोष्टींना विज्ञानाच्या दृष्टीने बघत असतो. मला मंदिरात जायची किंवा इतर कोणालाही श्रेष्ठ म्हणून मान्य करायची काय गरज आहे ?"
तुम्हाला असे काही प्रश्न पडत असतील तर आयुष्यात एकदा तरी भगवदगीता वाचा. तुमच्या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील.
१८ अध्याय आणि ७०० श्लोक असलेल्या या धर्मग्रंथातून मला काय शिकायला मिळालं ? हे मला सर्वांना सांगायचं आहे. मूळ विषयाला हात घालण्या आधी हे जाणून घेऊयात की 'भगवद्गीता'चे प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत?
कुरुक्षेत्रात युद्धभूमीवर जेव्हा अर्जुन युद्ध करू शकत नव्हता तेव्हा त्याच्याकडून युद्ध करवून घेण्यासाठी 'गीता' ही संघर्षावर कशी मात करावी ? यासाठी मार्गदर्शक आहे. कुरुक्षेत्र ही फक्त हरियाणा मधील एक युद्धभूमी नसून ती आपली एक मनःस्थिती आहे. समोर प्रश्न आहेत, पण त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी कचरणारं आपलं मन म्हणजे हे अर्जुना सारखं आहे.
श्रीकृष्णाने भगवद्गीता चं समुपदेशन हे कोणा मार्फत न करता स्वतः अर्जुना सोबत एखाद्या मित्राप्रमाणे रथाचं सारथ्य करतांना आपल्याला हे ज्ञान दिलं आहे. श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेली गीता, ती सांगतांना अर्जुनाला झालेलं विराटरूप दर्शन हे यापूर्वी आणि यानंतर कधीही घडलेलं नाहीये. गीता ही साक्षात देवाने सांगितली असल्याने त्यावर प्रत्येकाचा विश्वास आहे हे निर्विवाद सत्य आहे.
भगवदगीता सांगतांना कृष्णाने स्वतः एका रथाचं सारथ्य करण्याचं मान्य केलं. एखाद्या मित्राप्रमाणे कृष्णाने अर्जुनासोबत एकाच रथात असतांना हे ज्ञान दिलं आहे. कोणत्याही गुरूकडून इतकी नम्रतेची वागणूक कोणीही या आधी कधीच बघितली नव्हती आणि नंतरही बघितली नाही.
देवाच्या कार्याची महती सांगणारे इतरही ग्रंथ आहेत. पण, गीता ही त्यापेक्षा पुढे जाऊन "कसं जगावं ?", "कसं जगू नये ?", "कशी भक्ती करावी ? आणि श्रीकृष्णाला देवाधिदेव का म्हणतात ?" या सर्वांची उत्तरं तुम्हाला सोप्या भाषेत देणारा एकमेव ग्रंथ आहे. हे ज्ञान देतांना कोणत्याही 'हिंदू धर्मच श्रेष्ठ' असा कुठेही उल्लेख नाहीये किंवा इतर कोणत्याही धर्माचा त्यामध्ये द्वेष केला गेलेला नाहीये. गीता हा सर्वांना सामावून घेणारा 'ज्ञानग्रंथ' आहे.
या चार कारणांमुळे गीता ही जगभरात लोकप्रिय आहे असं म्हणता येईल.
वाचनाची आवड नसणाऱ्या किंवा वेळ, विश्वास नसणाऱ्या लोकांना हा प्रश्न पडू शकतो की, "इतकं काय आहे गीता मध्ये ?"
मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता.
योगायोगाने गीता वाचन, अध्ययन करण्याची एक ऑनलाईन संधी मध्यंतरी चालून आली. सुरुवातीला सहज म्हणून ऐकायला सुरुवात केलेल्या भगवद्गीतेत मी कधी रस घेऊ लागलो हे माझं मला कळलंच नाही. १८ वा अध्याय वाचून झाल्यानंतर मला जाणवलेला सर्वात मोठा बदल आणि फायदा म्हणजे विचारांमध्ये आलेली 'एक सुस्पष्टता'.
विचार मग ते कोणत्याही बाबतीचे असतील. अगदी "ऑफिस ला जाऊन रोज काम का करायचं ?" किंवा "घर नेहमीच व्यवस्थित का ठेवायचं ?" पासून "नातेवाईकांकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात ?" आणि सर्वात महत्वाचं म्हणजे "आपल्या शरीराचे किती लाड करावेत ?" हे सगळं सांगणारा हा एकमेव ज्ञानग्रंथ सध्या उपलब्ध आहे.
देवाची भक्ती करणे म्हणजे 'धार्मिक' हे एक लेबल आपण लावून टाकत असतो. फक्त कामच करणारी व्यक्ती असली की आपण त्याला 'मटेरियलिस्टिक' हे एक लेबल आपण लावून टाकत असतो.
'धर्म' आणि 'कर्म' या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आपल्यापर्यंत कधी पोहोचवलंच गेलं नाही.
"तुम्ही तुमच्या कामावर निष्ठा असू द्या, कामावर प्रेम करा त्याच्या आउटपुट वर नाही" भगवद्गीता हेच तर सांगते. 'निष्काम कर्मयोग' म्हणजे कोणत्याही परिणामाची अपेक्षा न करता अविरत कार्य करत रहा. जगातील इतर कोणत्याही 'धर्मग्रंथ' मध्ये हा संदेश दिलेला नाहीये किंवा दिला असेल तर तो इथूनच आलेला आहे.
घरातील कामांबद्दल सुद्धा कित्येक वेळेस कंटाळा यायचा.असं वाटायचं की, "का इतकी कामं करायची?" अगदी वेळच्या वेळी, जिथल्या तिथे. भगवद्गीता वाचतांना, त्याचं निरूपण ऐकतांना हे कळलं की, प्रत्येक सजीव किंवा निर्जीव वस्तू मध्ये कृष्णाचा अंश आहे. कोणतंही काम आपण कृष्णा साठी करत आहोत ही जर का भावना असेल तर तुम्हाला त्या कामाचा कधीच थकवा येणार नाही हे मी अगदी खात्रीने सांगतोय. फक्त तो भाव तितका दृढ असावा. मी ज्यांच्याकडून गीता ऐकली ते एक वाक्य नेहमी वापरायचे, "कृष्णाला प्रत्येक कर्माच्या केंद्रस्थानी ठेवा, गोष्टी आपोआप घडतील."
जेव्हा कृष्णा सोबत असतो, तेव्हा काही चूक होणं शक्यच नसतं. तुमच्या मनासारखं होणं, न होणं वेगळं, पण जे घडतं ते नेहमी योग्यच घडत असतं हे नक्की.
कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर असतांना अर्जुनाच्या मनात जी भावनिक कोलाहल सुरू होती त्यातून आपण सुद्धा बऱ्याच वेळेस जात असतो. आपल्या रथाचं सारथ्य कृष्णा करत नाहीये इतकाच काय तो फरक.
भगवद्गीता आपल्याला हे शिकवते की, नात्यांकडे भावनिक दृष्टीने जरूर बघा. पण, तुमच्या मनात कोणाचंही महत्व वाढवतांना किंवा कमी करतांना त्या व्यक्तीच्या कर्मा कडे तटस्थपणे बघा. सदैव सत्याच्या बाजूने रहा. तुमची मतं व्यक्तिसापेक्ष ठेवू नका, योग्य जे आहे त्याचं समर्थन करा.
'अध्यात्म' हा शब्द आपण कित्येक वेळेस वापरला आहे. पण, याचा नेमका अर्थ खूप कमी जणांना माहीत असेल. 'अध्य + आत्म' म्हणजे आधी आत्म्याला नमन करा आणि मग देहाला. देह हा नश्वर आहे, आत्मा हा अमर आहे. आपल्या शरीराकडे केवळ एक शरीर म्हणून न बघता एक आत्मा म्हणून बघा. ही गोष्ट किती तरी श्लोकांमधून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे वाचायला जरी सोपं वाटत असलं तरीही हे मनाला पटायला तितकं सोपं नाहीये. हे जर का आपण स्वतःला सांगू शकलो तर आपण शरीराच्या किती तरी प्रलोभनांपासून स्वतःला लांब ठेवू शकतो.
शरीराच्या मध्यभागी असलेल्या मनाला चांगला विचार तयार करण्यासाठी घडवा, त्याला नियंत्रणात ठेवा. मनावर विजय मिळवला तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही.
हे सगळं कळतं आणि मग कधी तरी हा प्रश्न पडतो की मग "जीवन काय आहे ?" हे सकाळी उठून कामावर जाणे, घरी येणे, पुन्हा तोच दिनक्रम हे असं आहे तर असं का आहे?
भगवद्गीता आणि भागवत हे या प्रश्नांची अशी उत्तरं देतात की, या पृथ्वीतलावर आलेल्या प्रत्येक जीवात्मा मध्ये परमात्मा म्हणजे कृष्णाचा अंश आहे. आपल्या प्रत्येकाला त्या परमात्मा सोबत कनेक्ट होण्यासाठी कृष्णाची सतत आठवण ठेवणं आवश्यक आहे. असं केलं तर आपल्याला कधी तरी या जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळेल. या सर्व विश्वास ठेवण्याच्या गोष्टी आहेत. मुक्ती मिळवण्याची इच्छा असेल तर प्रत्येकाने स्वतःला हे शिकवावं की, "जेव्हा पण मृत्यू येईल तेव्हा मला कृष्णा ची आठवण यावी." हे साध्य झालं तर तुमची नौका पार झाली हे नक्की.
जीवनाचा अर्थ सांगणारी भगवद्गीता ही जगभरात इतकी का लोकमान्य आहे ? ते हे मुद्दे वाचल्यावर कोणाच्या ही लक्षात येईल. इतक्या मोठ्या ग्रंथाचं एका लेखात वर्णन करणं हे कोणासाठीही एक आव्हानच असेल.
आपल्या सर्वांच्या या धार्मिक, अध्यात्मिक समजुती स्पष्ट असाव्यात म्हणून भगवद्गीता ही जितक्या कमी वयात वाचण्यात येईल तितका त्याचा जास्त फायदा होतो. आपण शालेय अभ्यासक्रमात बरेच विषय शिकतो त्यामध्ये जर 'ज्ञानग्रंथ' भगवद्गीता च्या काही अंशाचा समावेश दरवर्षी करण्यात आला तर एक 'कर्मनिष्ठ' पिढी नक्कीच तयार होऊ शकते. भगवद्गीता मधील अगाध ज्ञान एका ठराविक लोकांपर्यंत सीमित न राहता सर्वांना सहज उपलब्ध
व्हावं हीच सध्या सर्वांची इच्छा आहे. जास्त लोक भगवद्गीता वाचतील आणि आपल्या आचरणात आणतील तर हे जग अजूनच सुंदर होईल.