संध्याकाळची वेळ होती , सूर्य मावळतच होता. सुनिता स्टो पंप करत होती...परंतु खूप वर्षांपूर्वीचा जुनाट झालेला स्टो पेटायच नाव घेत नव्हता. वैतागून ती त्या स्टोचा राग आपल्या नशिबावर काढत होती. तिच्या स्टो पेटवण्याच्या धडपडीतून तिचे दुःख दिसत होते. तिची आर्थिक परिस्थिती थोडी हाताबाहेर गेली होती , घरी केरोसिन सुद्धा संपले होते आणि वेळेवर रेशनिंग च्या दुकानात लाईन लावूनसुद्धा तिला केरोसिन मिळाले नव्हते. त्यामुळे ती त्या दुकानदाराला शिव्या देत होती. थोड्या वेळात या निरर्थक धडपडीमुळे तिला त्रास होऊ लागला आणि तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं व रडता रडता ती म्हणत होती" हरामखोर जबाबदारी झटकून मरून गेला" तिचे दुःख तिच्या चेहऱ्यावर अतोनात दिसत होते , तेवढ्यात बाजूने आवाज आला "आज जर दिलीप असता तर अशी वेळच आली नसती." हे ऐकुन सूनिताचा पारा चढला तिला राग आला "हे बघा आई त्या माणसाचं नाव घेत जाऊ नका, आणि हे तुम्हाला आजुन किती वेळा सांगायचं , माझं जाऊदे पण स्नेहाच्या वेळेला सुद्धा तो माणूस कसा वागला हे मी आयुष्यभर विसरू शकत नाही."हे म्हणून तीने तिला थोडं सावरण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यातच बिछाण्यातून आवाज आला" तायडे , तायडे, तायडीची काहीच चूक नाही, माझी तायडी तशी नाही. "सुनीता अश्रू पुसत बिछाण्याजवळ गेली तीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला व तिला शांत करू लागली.. परंतु तिचे रडू काही थांबत नव्हते. मानसीची अशी आवस्था बघून तिला अजुनच भरून आलं. मग ती सगळा राग पुरुष जातीवर काढू लागली, "साले सगळे पुरुष सारखेच स्त्रियांवर फक्त अधिकार गाजवतात, मुलींच्या कोवळ्या मनाचा विचार देखील करीत नाहीत, जिकडे तिकडे फक्त पुरुषार्थ दाखवायचा असतो यांना..."
अशा या वातावरणात ती रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीता किचनमधे चपात्या लाटत होती तेव्हा तिच्या लक्षात आलं की मानसीच्या गोळ्या - औषधांची वेळ झाली आहे. मानसी शाळेत जाण्याची तयारी करत होती. सूनिताने तिला गोळ्या व पाणी दिले. व ती किचनमधे निघून गेली. तेवढ्यात दरवाजातून आतमध्ये बॉल येतो. बबल्या बॉल घ्यायला येतो, मानसी त्याला बघून घाबरते, तो हळूच बॉल उचलत असतो तितक्यात सूनितची नजर त्याच्यावर पडते आणि ती बबल्याला म्हणते " ये तू त्या सोनावणेंच्या बबल्या ना रे , काय रे तुमचा बॉल नेमका इथेच कसा काय रे येतो आणि तू त्या मन्या चा मित्र ना रे , तो नालायक मन्या मला सासूबाई म्हणून पळून गेला त्यादिवशी , त्याला सांग माझ्या मानसी कडे त्याने बघितलं जरी ना तर त्यांचं तंगडच तोडून टाकेन आणि परत तुमचा बॉल जर इकडे आला ना तर लक्षात ठेवा, चल निघ. एवढं बोलून सुनिता पाण्याचे ग्लास घेऊन आतमध्ये जाते.
इकडे चाळी मधली सगळी गँग बसलेली असते , एवढा वेळ झाला बबल्या अजुन येत का नाही म्हणून सगळे चिंतेत असतात. तेवढ्यात बबल्या येतो आणि त्याला पाहून मन्या जाम खुश होतो. "मन्या भावजी आपली मानसी काय म्हणाली, मला ईचारत व्हती काय ? आणि आपल्या सासूबाई काय बोलल्या ?" बबल्या मन्याकडे रागाने बघत होता , कारण मन्या नेहमी कोणाला तरी तिच्या घरी बॉल आणायला पाठवायचा. "मन्याभाऊ तुमच्या सासूबाई तुमचा भव्य जयजयकार करत होत्या , भारीच कौतुक आहे त्यांना आपल्याबद्दल "मन्या" व्हय काय, आणि आपली बायको" "वहिनी तर खूपच खुश होत्या सासूबाईंनी केलेला कौतुकाचा वर्षाव ऐकुन त्यांचे कान अगदी तृप्तच झालेत..." हे ऐकुन मन्याची छाती फुगू लागली." अरे तुला नालायक म्हणाल्या त्या " हे ऐकताच मन्याच्या आवाजातील सगळा मोठेपणा कमी झाला. " आणि ये तू त्यांना सासूबाई म्हणालास." " मग काय म्हणू , तशी आपली सासू जाम ढासू हाय हा " सोबत असलेला केत्या हळूच म्हणाला , " ये मन्या तुला माहीत हाय ना ती मानसी थोडी येडी हाय ते , अरे माझी मम्मी म्हणत होती तिला कधी कधी वेड्यांचा झटका येतो म्हणून " हे ऐकुन मन्याला केत्याचा राग आला तो केत्याकडे रागाने पाहत होता , "ये तू गप बसतो का आता , तिला काय बोलायचा नाय हा , ती आपली जान हाय आणि हो तिला झटका येतो पण तो आपल्या प्रेमाचा.." आणि मन्या लाजू लागला. तेवढ्यात अभय मन्याला सांगू लागला " अरे ये मन्या , तुला माहित नाय काय त्या मानसी ची बहिण होती ना ती स्नेहा ताई ती तिच्या अंगात येते , तिचं भूत झापटलय असं बोलतात सगळे , माझ्या ताईने मला सांगितलं."
इतक्यातच तिकडून सुनिता आणि मानसी जाऊ लागल्या , सुनिताने मन्याकडे रागाने बघितलं , मानसी ची नजर खालीच होती , मन्या नजर इकडे तिकडे फिरवू लागला व सगळी पोरं शांत झालीत.. मानसी व तिची आई निघून गेल्या..
संध्याकाळी टीव्ही वरती बातम्या चालू होत्या , तेवढ्यात एक बलात्काराची बातमी येते. ' औरंगाबादच्या एका मुलीवर सामुहिक बलात्कार , मुलीवर पाच जणांनी बलात्कार करून जाळून तिची हत्या केली....' ही बातमी ऐकून मानसी विचित्र वागायला लागते , तिचं अंग थरथर कापू लागत , ती घाबरु लागते , घामाने भिजलेल तिचं शरीर थंडगार पडत. " माझ्या ताईला सोडा , तिची काहीच चूक नाहीये , तुम्ही असं का करताय " अशी बडबड ती करू लागली. मानसी खूप अस्वस्थ झाली . बाहेर पाणी आणायला गेलेल्या सुनीताला मानसीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला व ती धावत - पळत घरात आली , तीने मानसी ची अवस्था बघितली व तिला आपल्या छातीजवळ धरले. " आई तुम्हाला किती वेळा सांगितलं , त्या टीव्ही वरचे बातम्यांचे चॅनल लावत जाऊ नका म्हणून , मेल्या त्या बातम्या पण धड लागत नाहीत. "
थोड्याच वेळात डॉक्टर येतात , मन्या त्यांची बॅग घेऊन घाबरत घाबरत घरामध्ये येतो . " सुनिता जाधव हे त्यांचंच घर आहे का ? "सूनिताची सासू " हो " म्हणते.. तेवढ्यात सुनिता येते " डॉक्टर या मी तुमचीच वाट बघत होते." हे बोलून तिचं लक्ष मन्याकडे जातं. मन्या मानसी कडे केविलवाण्या नजरेने पाहत असतो. " ये मन्या तुझं काय आहे रे इथे , चल निघ." मन्या पटकन पळून जातो." नालाईक मेला "
"अहो सुनीताबाई असूद्या तोच घेऊन आला मला इथपर्यंत , बरं काय म्हणतेय आपली मानसी" म्हणून डॉक्टर मानसीला तपासू लागतात , "काय झालं होतं नेमकं " सुनिता सासुकडे रागाने बघत" अहो डॉक्टर टीव्ही वरची ती बलात्काराची बातमी बघितली तीने आणि अगदी घामाघूम झाली , आज जरा जास्तच घाबरली होती , थरथर कापत होती , अंग एकदम थंड पडलं होतं पोरीचं " डॉक्टर मानसी कडे पाहू लागला. "हे बघा सुनीताबाई तुम्ही मला सांगितल्यानुसार स्नेहाच्या बाबतीत जे घडलं ते अगदीच भयानक होतं , जरी मानसी तेव्हा लहान असली तरी ते तिला कळत होत , तिची अवस्था तीने पहिली होती आणि त्या गोष्टीचा एकदम धस्काच घेतलाय तीने. तिच्या सोबत कोणी खेळायला नसतं , तो सोबत आलेला मुलगा म्हणत होता की मानसी कुठल्याच मुलाजवळ बोलत नाही , ती सगळ्या मुलांना घाबरते आणि तुम्ही कोणाला तिच्याजवळ जाऊन सुद्धा देत नाहीत , तिच्या वयाची मुलं जेवढी मुक्त वावरतात तेवढं तुम्ही तिला मुक्त सोडू शकलात तर ती थोडी मोकळी होईल या सगळ्यातून , मी काय म्हणतो तिला घराबाहेर जाऊद्या , लोकांशी बोलूद्या , अहो सर्वच मुलं तशी नसतात.." हे बोलता बोलता सुनिता त्यांचं वाक्य तोडते " डॉक्टर किती पैसे झाले." "अहो पैशाचं काय, ते द्या पुढच्या वेळेस , बाकी काळजी घ्या मानसीची , मी येतो."
डॉक्टर दरवाज्यातून बाहेर पडणार तेवढ्यातच शेजारच्या राणे आणि मयेकर काकू येतात " सुनिता काय झालं गो मानसीला , जोरात किंचाळी ऐकू आली म्हणून लगेचच धावत धावत आलो " राणे काकू घड्याळाकडे बघून " नाय म्हणजे थोडा उशीर झाला आम्हाला , डॉक्टर काय म्हणाले गो." राणे काकूंच्या अशा प्रश्नांचा सुनीताला आता कंटाळाच आला होता. " काही नाही , बरी आहे आता मानसी , थोडी काळजी घ्या म्हणत होते बाकी काही नाही." तेवढ्यात मयेकर काकूंच्या फुकटचे सल्ले देण्याच्या सवयीने त्या म्हणाल्या " हे बघा तुम्हाला ती जाधवांची अर्चना माहितीये ना , ती पण अशीच वागायची , पण त्या लोकांनी तिला त्या वेड्यांच्या शाळेत टाकली आणि...." मयेकरांच हे बोलणं ऐकून सुनीताला राग आला " म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय माझी मानसी वेडी आहे , हे बघा तुम्हाला सगळ्यांना माहितीये स्नेहाच्या बाबतीत जे घडलं त्यातून मानसी अजुन सावरली नाहीये. तुमची कल्पना माझ्या स्नेहाच्या सोबतचीच ना , माझी स्नेहा एवढी शांत , दिसायला अगदी सुंदर माझी स्नेहा , अभ्यासातही हुशार , कधी कोणाशी भांडण नाही , कसला हट्ट नाही. माझी स्नेहा मला नेहमी म्हणायची " आई तू आता पतपेढी मध्ये काम करणं बंद कर , मी काहीतरी काम करेन , माझ्या शिक्षणाची काळजी करू नकोस . एवढं सगळं असताना सुद्धा बाप म्हणून असलेलं एकही कर्तव्य पार पाडलं नाही त्या माणसानं , नेहमी दारू पिऊन मला मारहाण करायचा. माझ्याकडे पैसे मागायचा आणि बाहेर उधळायचा , माझ्या पोरींना कधीच बापाचं प्रेम नाही दिलं त्यानं. तिरीही कधीच तक्रार नव्हती माझ्या स्नेहाची. पण त्याची ही राक्षसी वृत्ती पाहून स्नेहाला पुरूषांबद्दल अगदी तिरस्कार वाटू लागला होता. कॉलेजच्या मित्रांपासून ती लांब लांब पळू लागली. माझी स्नेहा मला नेहमी म्हणायची " आई मला रात्री बारा वाजता बाहेर एकटीला बिन्धास्त फिरायचयं , पण माझ्यात हिम्मतच होत नाही , हे पुरुष फक्त एकाच नजरेने का बघतात ग स्त्रियांकडे " तिच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे कधीच नसायचं.... तरीसुद्धा सगळेच पुरुष सारखे नसतात असं बोलून मी तिचा धीर चेपण्याचा प्रयत्न करायची..सगळं काही बऱ्यापैकी चालू होतं एक दिवस स्नेहा ट्रीपला जायला निघाली , मी तिला एका शब्दाने सुद्धा नकार दिला नाही , स्नेहा ट्रीपला गेली आणि तिकडे त्या हरामखोरांनी माझ्या स्नेहावर बलात्कार केला , तिच्या अंगा मासाचा अगदी खेळ केला. ती जेव्हा तशा अवस्थेत घरी आली , तिच्याकडे पाहून मी अगदी थरथरून गेले , तिच्या डोळ्यांत असलेलं पाणी सांगत होतं की त्या नराधमांनी तिच्या सोबत काय केलं ते , स्नेहा अतिशय घाबरली होती." हे सगळं ऐकत असताना राणे आणि मयेकर अगदी थरथरल्या होत्या , त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते.
सुनिता पुढे सांगू लागली. "एवढं सगळं होऊनसुद्धा स्नेहाने अगदी धीटपणाने ठरवलं होतं आता शांत नाही बसायचं आणि अजिबात घाबरायचं नाही , असल्या घाणेरड्या पुरुषवृत्तीचा नाश करायचा. पण शेजारची लोकं तिच्याकडे संशयाच्या नजरेने बघू लागले , तिला टोमणे मारू लागले , आजूबाजूच्या बायकांनीच समजून न घेता तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागल्या. एवढे वर्ष चांगलं म्हणणारी लोकं तिच्या बद्दल वाईट बोलू लागली होती. तरीही स्नेहा जीवाचा अकांत करून सगळ्यांना ओरडून सांगत होती " यामध्ये माझी काहीच चूक नाहीये , मी दोषी नाही , मी तशी मुलगी नाहीये. स्नेहा लोकांच्या या बोलण्याला कंटाळली होती. .... आणि एक दिवशी भर दुपारी अंगावरती रॉकेल ओतून तीने स्वतःला पेटवून घेतल. तिची प्रत्येक किंचाळी तिच्या वेदना सांगत होती. माझ्या स्नेहाला या सगळ्या लोकांनीच मारलंय....आणि अशा परिस्थितीत तिच्या बापाची आम्हाला गरज असताना त्या माणसाने स्वतःची इज्जत गेली म्हणून फास लावून आत्महत्या केली. ही सगळी परिस्थिती मानसी बघत होती , तिला ते सहन झालं नाही आणि तीने या सगळ्याचा एकदम धस्काच घेतला.. माझ्या स्नेहा सोबत जे घडलं ते मानसी सोबत घडू नये एवढीच माझी इच्छा आहे..." एवढं सगळं ऐकुन मयेकर आणि राणे एकदम निशब्द झाल्या होत्या , त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते.. राणेंनी सुनीताला मिठी मारली आणि मयेकरांनी मानसीच्या डोक्यावरून हात फिरवला व दोघीही डोळ्यातले अश्रू पुसत निघून गेल्या..
दुसऱ्या दिवशी सकाळी मानसीला ताप आला होता म्हणून सुनिता तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. ती मानसीला म्हणाली " मी लगेच वाण्याकडून जाऊन येते तू शांत झोपून जा." आणि ती घराबाहेर पडली.. तेवढ्यात बॉल मानसीच्या घरात येतो , यावेळेला मन्या स्वतः बॉल न्यायला येतो. मन्या दरवाजातून घरामध्ये वाकून बघतो, सुनिता दिसत नाही याची खात्री झाल्यावर तो आतमध्ये येतो , त्याचं लक्ष खाॅट वर झोपलेल्या मानसी कडे जातं , तो हळूच तिच्याजवळ जातो तर पाहतो की मानसीला ताप भरलेला आहे तो तिच्या कपाळावर थंड पाण्याची घडी ठेवतो. आणि अंदाज घेतो ती झोपली आहे की नाही याचा " ये मानशे आपल्याला तू जाम आवडते , ये तुला आपण आवडत नाय काय ? आणि तू आपल्याकडं बघत बी नाय... " एवढ्यात सुनिता घरामध्ये येते आणि बघते तर मन्या खाॅट जवळ बसलेला असतो , त्याला बघून सुनिता पारा चढतो , मन्या पण तिला बघतो आणि बसलेल्या स्टूलवरून उठतो. " ये नालयका मी तुला सांगितलं होतं ना माझ्या मानसी जवळ फिरकायचं नाही म्हणून , मग काय करतोयेस तू इथे , चल निघ आणि परत आलास ना तर तुझी दोन्ही तंगडं तोडून टाकेन , " सासूबाई ते आपला बॉल...." एवढं बोलून मन्या पळून जातो. सुनीताला खाॅट खाली बॉल भेटतो. बॉल फुटलेला असतो , त्याच्या आतमध्ये एक चिठ्ठी असते , सुनिता चिठ्ठी काढते आणि वाचू लागते , चिठ्ठी मधे लिहिलेलं असतं "Dear मानशी , आपण तुझ्या स्वप्नातला राजकुमार मन्या , आपल्याला तू लयं आवडते , तुला बघितल्यावर आपल्या काळजात नुसतं धाकधूक होतं , पण तुला काय पण नाय वाटत आपल्याबद्दल आणि आपल्या सासूबाई पण आपल्याला बोलून नाय देत तुझ्याशी. ये मानसी आपल्याला माफ कर हा त्यादिवशी चुकून आपण तुझ्या आईचं बोलणं चोरून ऐकलं आणि तेव्हा आपल्याला कळलं की तू काय येडी नाय हायेस , स्नेहा ताई सोबत जे घडलं त्यामुळे तुला पुरुषांपासून भीती वाटते म्हणून , पण आपल्याला घाबरु नको आपण काय पुरुष नाय हाय , आपण तर एक पोरगा हाय.. तुझाच मन्या , 143..."
तेवढ्यात घरात गेलेला बॉल घ्यायला मन्या परत येतो , तो सूनीताची नजर चुकवून हळूच बॉल शोधत असतो तेवढ्यात सुनिता त्याला बघते आणि सुनिता काही म्हणायच्या आधीच " " मी नाय येणार परत , तंगडं तोडू नका." मन्या पळतच असतो तितक्यात सुनिता " ये नालायका थांब , इकडे ये " मन्या घाबरत घाबरत जवळ येतो " मी नाय येणार परत , मला जाऊद्या." सुनिता त्याला म्हणते " मी जरा नाक्यावरून जाऊन येते , तू इथे मानसी जवळ बस." मन्याला कळतच नाही सासूबाई असं कश्या काय म्हणाल्या. एवढं बोलून ती बाहेर जाते.. मन्या मानसीच्या बाजूला जाऊन बसतो , तितक्यात मानसीला जाग येते , ती त्याला घाबरु लागते. " ये मानशे मला घाबरु नको , मी काय पण करणार नाय तुला , मी काय पुरुष नाय हाय...." तेवढ्यात खाॅट वर त्याला तो बॉल दिसतो , तो बॉल उचलतो त्यातली चिठ्ठी काढतो..मन्या वाचू लागतो " Dear मानशी " हे सगळं सुनिता दरवाजातून बघत असते. ती डोळे पुसत निघून जाते , जाताना तिच्या चेहऱ्यावर हसू असतं. " आपण तुझ्या स्वप्नातला राजकुमार मन्या.... आपल्याला तू लयं आवडते...