Photo by NADER AYMAN on Unsplash
गीता ताई म्हणाल्या, "विश्वास थांब एक मिनिट, हे भस्म घे; याची तुला नक्की गरज लागेल. हे बघ, इथून हा लाकडी दरवाजा आहे, आत जा. तिथे गाडी पार्क केलेली आहे, त्याच्या मागे एक भिंत दिसेल, त्यावर पाणी शिंपड म्हणजे तुला दरवाजा उघडेल. त्या दरवाजाच्या मागे आमचा एक माणूस गाडी घेऊन उभा असेल, तो तुम्हाला गाभाऱ्यापर्यंत घेऊन जाईल. गाडी तिथपर्यंतच जाईल. तू गाडीतून उतर आणि तिथे उजव्या भिंतीवर असलेला काळा दगड फिरव, म्हणजे तू शंकर महाराजांच्या पिंडीजवळ पोहोचशील. आज मुद्दाम मंदिरातल्या गुरुजींना मंदिर बंद ठेवायला लावले आहे, त्यामुळे तिथे कोणीही नसेल. तू एक काम कर, तू नको येऊ; आई-बाबा, नारायणी आणि केदारला आमचे अनुयायी तिथे आणतीलच. तू मंदिरात थोडा वेळ थांब आणि रात्री तिथे जा. कारण सुम्मी आणि नारायणरावला याच दिवशी म्हणजेच २० जानेवारी १८५७ रोजी रात्री ८:५३ ला तुझ्या पणजोबांनी, दगडूजींनी मारले होते. तू मंदिरातून साधारण ७:३० ला निघ. त्यांना मारणे इतके सोपे नाहीये, पहिले त्यांची बॉडी शोधावी लागेल. त्यांच्या वस्तू अजूनही आहेत ज्यांच्याशी ते जोडले गेलेले आहेत, त्या वस्तू सापडून त्या जाळायच्या आहेत. एक लक्षात ठेव, तुला हे काम सकाळी ७ च्या आत करायचे आहे, कारण ७ पासून पौर्णिमा लागणार आहे. पौर्णिमा २ दिवस आहे, त्यामुळे तुला जे करायचे ते उद्या सकाळी ७ च्या आतच करावे लागेल."
विश्वास गीता ताईंच्या पाया पडतो आणि तो दरवाजा उघडतो. तिथे खरोखरच एक ऑल्टो गाडी उभी असते. तो गाडीच्या मागे जातो, पवित्र पाणी शिंपडतो आणि 'ओम नमः शिवाय' म्हणतो, तसा दरवाजा उघडतो. दरवाजाच्या मागे रेल्वेगाडीसारखी एक गाडी असते आणि ती चालवण्यासाठी एक ड्रायव्हर असतो. विश्वास गाडीत बसतो आणि गाडी पुढे जाऊ लागते. गीता ताईंनी सांगितल्याप्रमाणे जिथे रस्ता संपतो तिथे गाडी थांबते. विश्वासला तिथे काळा दगड दिसतो, तो दगड फिरवताच एक भिंत आपोआप उघडते. तो बाहेर येतो, तर समोर एक भले मोठे शिवलिंग असते! त्या शिवलिंगाच्या पुढे आई-बाबा आणि नारायणी महामृत्युंजय मंत्र म्हणत असतात. बाजूला केदार दादाला जमिनीवर पालथे झोपवलेले असते, ज्यामुळे त्याची ऑक्सिजन लेव्हल टिकून राहील.
आपल्या परिवाराला सुखरूप बघून विश्वासला आनंदाश्रू अनावर होतात. तो जोरात आवाज देतो, "आई-पप्पा, नारायणी!" आणि त्यांना मागून मिठी मारतो. केदार जवळ जाऊन तो म्हणतो, "दादा, तू काळजी करू नकोस, मी तुला पुन्हा नक्की आणणार." केदारला हे सर्व ऐकू येत असते पण त्याला विश्वासला स्पर्श करता येत नसतो. तो रडत मनात म्हणतो, "विश्वास, तुझ्यासारखा पाठीराखा भाऊ सगळ्यांना मिळो." केदारची बॉडी जरी कोमात असली, तरी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. विश्वास म्हणतो, "आई-पप्पा, नारायणी, तुम्ही इथून आत जा, तिथे रेल्वेसारखी गाडी असेल त्यात बसा. तुम्ही थेट आश्रमात पोहोचाल." आई म्हणते, "आणि तू?" विश्वास म्हणतो, "अगं आई, मी आपल्या दादाला पुन्हा आणायला चाललोय. आपला दादा पुन्हा पहिल्यासारखा हसणार, बोलणार आणि काम करणार." आई रडत म्हणते, "बाळा, किती प्रेम करतोस रे तू दादावर! आजकाल असा भावा-बहिणींचा कोण विचार करतं? सुखी राहा बाळा. देव तुला या लढाईत ताकद देवो आणि तुझे रक्षण करो." आई त्याचे खूप मुके घेते. ती जायला वळते पण तिचे पाय पुढे जात नसतात. विश्वास इशारा करतो की, "मी आहे, मला आणि दादाला काहीही होणार नाही." आई-बाबा आणि नारायणी ५ मिनिटात आश्रमात पोहोचतात.
तिकडे विश्वास रात्र होण्याची वाट बघत असतो. रात्रीचे ७ वाजले होते, गुरुजींनी त्याला जेवायला वाढले. जेवता-जेवता ७:४५ झाले. तोपर्यंत गुरुजींनी त्यांचे काही सहकारी गुरुजी बरोबर घेतले. गुरुजी म्हणाले, "विश्वास बाळा, हे तुझे एकट्याचे काम नाही, तुला आमची गरज लागेलच, तसे माझे गीता ताईंशी बोलणे झाले आहे. चला आता आपल्याला निघाले पाहिजे. आपल्याला त्यांची बॉडी शोधून त्यांच्या वस्तू जाळायच्या आहेत." ७ वाजेनंतर सुम्मी आणि नारायणरावचे काहीच बिघडवता येणार नाही आणि केदार कायमचा त्यांच्या जगात अडकून राहील.
नियोजनानुसार सर्वांनी वेशांतर केले. गुरुजी साध्या वेशात आले आणि विश्वासने डोक्यावर पगडी, अंगात सदरा-धोतर आणि कोल्हापुरी चपला घातल्या. सगळे वाड्यावर पोहोचले. जसा त्यांनी जमिनीवर पाय ठेवला, तसे सुम्मी आणि नारायणरावला चाहूल लागली. सुम्मीने डमी केदारच्या पोटात नखे खुपसली पण रक्ताऐवजी कापूस बाहेर आला. ती अजूनच चवताळली आणि नवऱ्याला म्हणाली, "धनी, तुम्हाला डोकं आहे की नाही? खोट्या बाहुल्याला खरं कसं समजलात?" नारायणराव दात ओठ खात म्हणाले, "सुम्मे, हद्दीत राहा. तू कोणाशी बोलतेयस माहिती आहे का? तूही नीट बघ, हुबेहूब केदारसारखा बनवला आहे हा, तुझे डोके चालले का खोट्याला खरं समजायला?" सुम्मी जोरात ओरडली, "गीते, तुलाही खलास करणार आणि सुर्वे कुटुंबासारखा तुझा आत्माही आयुष्यभर कैद करणार!" असे म्हणून ती आजूबाजूची झाडे उपटून आश्रमावर टाकू लागली, पण महादेवाच्या आशीर्वादामुळे काहीच परिणाम झाला नाही. नारायणराव म्हणाले, "सुम्मी, या सटवीला नंतर बघू, आधी वाड्यावर जायला हवे नाहीतर ते लोक आपले दाहसंस्कार करून आपल्याला मुक्त करतील. आपला बदला पुरा नाही व्हायचा, चल लवकर!"
विश्वास स्टडी रूमकडे गेला आणि त्याने दरवाजा तोडला. त्याने सगळीकडे सुम्मीची बॉडी शोधली पण काही सापडले नाही. इकडे सुम्मी आणि नारायणराव वाड्यात शिरताच लाईट्स झगमग करू लागल्या. एका गुरुजींनी मंत्र म्हणून त्यांच्यावर भस्म फेकले, तेव्हा सुम्मी आणि नारायणरावची किंकाळी निघाली ज्याने पूर्ण वाडा हादरला. नारायणरावने त्या गुरुजींवर हल्ला केला आणि तिथे असलेल्या सैनिकाच्या पुतळ्यावर त्यांना फेकले. पुतळ्याचा भाला पोटात घुसल्यामुळे ते गुरुजी तिथेच मृतमुखी पडले. सुम्मी म्हणाली, "तुम्ही तुमचा देह वाचवा, मी माझा!" नारायणरावने त्या मृत गुरुजींच्या शरीरात प्रवेश केला आणि जिथे त्याला पुरले होते तिथे गेला. बाकीचे गुरुजी खड्डा खणणार तोच तिथे नारायणराव (गुरुजींच्या रूपात) आले.
रामपुरे गुरुजी म्हणाले, "कुकर्णी गुरुजी, कुठे गेला होता? आपल्याला लवकर खड्डा खणून नारायणरावांचा सांगडा जाळायचा आहे." कुलकर्णी गुरुजींच्या रूपात असलेल्या नारायणरावने रामपुरे गुरुजींना खाली पाडले आणि त्यांच्या छातीवर बसले. ते त्यांचे मुंडके धडावेगळे करणार तोच मागून कोणीतरी शिवस्तुती म्हणत भस्म फेकले. त्या भस्मामुळे नारायणरावच्या अंगाची आग होऊ लागली. थोड्याच वेळात तो आत्मा बाहेर पडला आणि पळसे गुरुजींच्या शरीरात शिरला. तो ओरडला, "गीते, तूही संपणार! तुझा आत्मा कायमचा कैद करणार जसा तुझ्या बापाचा केलाय!" गीता ताईंनी शिवस्तुती चालूच ठेवली आणि नारायणरावचा आत्मा कमकुवत झाल्यावर अग्निदोरीने त्याला कैद केले. रामपुरे गुरुजींनी वाड्यातील अडगळीच्या खोलीत एक ट्रंक शोधली, ज्यात त्यांचे जुने कपडे आणि दागिने होते.
विश्वास स्टडी रूममध्ये सुम्मीचा सांगाडा शोधून थकलेला असतो. तेवढ्यात त्याला एक गुप्त दरवाजा दिसतो. आत गेल्यावर त्याला कुबट वास येतो. तिथे एका किंग साईज बेडवर सुम्मीचा सांगाडा असतो. तो सांगाडा उचलणार तोच सुम्मी प्रकट होते आणि त्याचे केस ओढत म्हणते, "आम्हांला मारणार? तुझ्यासारखा उंदीर आम्हांला संपवणार?" ती हसत म्हणते, "जोपर्यंत दगडूचा वंश संपवत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही." तिने विश्वासचे पोट फाडायला सुरुवात केली. विश्वासने खिशातून भस्म काढून तिच्या चेहऱ्यावर फेकले आणि अभिषेकाचे पाणी शिंपडले. सुम्मीचे शरीर जळू लागले. विश्वासने तिच्याभोवती अग्नीचक्र तयार केले. १० मिनिटांनी सुम्मी मुक्त झाली आणि तिने विश्वासला मारण्यासाठी आत ओढले, तेवढ्यात गीता ताई तिथे आल्या.
पण विश्वासने त्यांना अडवले आणि म्हणाला, "नाही ताई, नको. आम्ही सुर्वे त्यांचे खरे गुन्हेगार आहोत. माझ्या आजोबांनी जो गुन्हा केला त्याबद्दल आम्हांला तिरस्कार वाटतो. आजी, आम्ही तुम्हाला मुक्त करण्यासाठी नाही तर फक्त माझ्या दादासाठी हे केलं. आम्हांला माफ करा. तुम्हाला जे योग्य वाटते ते करा, मी आडवा येणार नाही. करा आमचा आत्मा कैद." विश्वासचे हे शब्द ऐकून सुम्मी वितळली. ती तिच्या जुन्या रूपात आली— नऊवारी साडी आणि नथ घातलेली सुम्मी खूपच छान दिसत होती. तिने विश्वासच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला आणि म्हणाली, "माफ कर लेकरा, मी दगडूच्या पापाची शिक्षा तुम्हा मुलांना द्यायला निघाले होते. मी माझा सूड मागे घेते."
दोघेही रडू लागले. सुम्मीने विश्वासला मांडीवर झोपवून अंगाई गायली. तिने जादूने दरवाजा उघडला आणि केदारच्या आत्म्याला मुक्त करून विश्वासकडे आणले. विश्वासने केदारला मिठी मारली. सुम्मी तिच्या नवऱ्याकडे गेली आणि म्हणाली, "धनी, माफ करूया या मुलांना, त्यांची काय चूक आहे? आता आपली मुक्त होण्याची वेळ आली आहे." आकाशातून एक पांढरा प्रकाश खाली आला आणि सुम्मी-नारायणराव त्यात विलीन होऊन मुक्त झाले. पंडित घाणेकर गुरुजींचा आत्माही मुक्त झाला. ६ महिन्यांनंतर, त्याच वाड्यात त्यांनी 'सुम्मीज् किचन' नावाचे हॉटेल सुरू केले. विश्वास आता एक जबाबदार मुलगा बनला होता.
. . .