Image by Sohag Hawlader from Pixabay

ही कहाणी आहे एका जिद्दी बाईची

कहाणीची नायिका आहे तुमची आमची
दूरच्या खेडेगावांत ही मुलगी जन्मलेली
आणि लहान वयांतच आईला अंतरलेली
खेळण्याच्या वयांतच हाताने चूल फुंकली
जमेल तसा स्वैपाक घरी करु लागली
हुशार,  तरी दूरच राहिले शाळेत शिकणे
लवकरच आले बोहल्यावर उभे राहणे
सुदैवाने गाव सोडून दोघेही पुण्यात आले
बांधकामावर मोल मजुरी करून पोट भरले
हळुहळु ती शहरात रुळली घरकाम करु लागली
मात्र फार लहान वयातच पोटुशी राह्यली
पण कामावरच्या लोकांनी तिला संभाळली
तिच्या बाळाची पण सगळी काळजी घेतली
बाळंतपण करायला सासू नाही आली
पार्किंग मध्ये बाळ झोपवून कामाला लागली
बाई मोठी गुणाची आणि हुशारीची होती
बघता बघता शिकून छान स्वयंपाक करत होती
नवरा सुद्धा चारचाकी चालवायला शिकला
पहिल्या पेक्षा जास्त पैसे कमावू लागला
दुसरे बाळंतपणही असेच झाले व मुलगी झाली
तोच नवऱ्याला वॅाल्व लावायची वेळ आली
दोन्ही बाळे व काम सांभाळत ही वेळ निभावली
तिला घरचे नाही पण कामावरच्यांनी मदत दिली
आता त्यांना वॅाचमन म्हणून घर पण मिळाले
जरा स्थिरस्थावर होत आहे असे वाटले
दोन्ही मुले हुशार होती अभ्यासात गती होती
मुलाने इंजिनिअरिंग मध्ये प्रगती केली होती
नशिबाने पुन्हा नवा दणका अचानक दिला
मुलाला डोळ्याचा एक गंभीर आजार झाला
पण ती खचली नाही गंडेदोरे बांधले नाही
तज्ञ डॉक्टर कडून योग्य ती शस्त्रक्रिया झाली
दृष्टी दोष जरी थोडेसे सुधारले असले
तरीही अधुपण तसेच राहणार हे कळले
तिच्या कडून खूप कांही शिकले पाहिजे
सामान्यांतले असामान्यत्व जाणले पाहिजे

.    .    .

Discus