जखमांच्या लाटांना तू कवेत घेतोस जेव्हा
रित्या मनाची हळवी स्पंदने मोकळी होतात तेव्हा
लाटांच्या हुंदक्याची सावली तुझ्यावर विसावली
व्यक्त ते अव्यक्त काही ओठावर स्मितेची रेषा उमटली
जगणे माझे जसे तुझे होऊन गेले
स्पंदनाच्या लाटांनी मौनातूनही बोलली,
दाटलेले धुके ,
दाटलेली आर्तता
किनारा मनाचा
तुझ्या नभाचा
ते बोल हलके होते
दाटलेल्या हुंदक्या तुनी,
प्रीतीची पहिली ओळख
मौनांच्या अंतरंगातुनी,
माझ्याच जगण्याची व्यथा
कळते जशी तुला काही,
लोपतात दिशा जशा
अंतरंगातील दशाही,
तुझ्या शब्दांचा आधार घेऊन मी जगते,
जशी फ़ुलाफ़ुलाची पाकळी अलवार उमलते ,
अंतरंगाचा तुझा प्रवास
मला येऊन छेडेल का,
अजूनही खोल खोल
शोधत तू मला भेटशील का,
साद ती प्रतिसादाची
आर्तता तुझ्यात शोधते जेव्हा,
पुन्हा पुनः नव्याने तू
भेटत जातोस तेव्हा!