‘स्त्री म्हणून जगताना’ हे शब्द ऐकले की सर्वसाधारणपणे आपल्या मनात येते ते म्हणजे एक संसार करणारी, सासू-सासरे, नवरा, मुले, इतर नातेवाईक यांचा गोतावळा सांभाळणारी आणि अशा परिस्थितीत कोणत्या तरी अन्यायाला सामोरी जाऊन त्यातून रणरागिणी बनून धाडसाने बाहेर पडलेली स्त्री! परंतु माझी कहाणी खूपच वेगळी आहे.
आई-वडिलांच्या कृपेमुळे एका सुशिक्षित घरात माझा जन्म झाला आणि लहानपणापासून घरात मुलगी-मुलगा असा भेदभाव नसलेल्या वातावरणात मी वाढले. हे आजही आवर्जून सांगावे लागते, अशी परिस्थिती आहे. माझ्या करिअरसाठी माझ्या भावाइतकेच स्वातंत्र्य मला मिळाले. मी द्विपदवीधर झाले. वडील शिक्षक होते. त्यांच्याकडून मिळालेला वारसा पुढे चालवत मी पण शिक्षिका झाले. माझ्या करिअरची सुरुवात झाली. शिक्षणामुळे मी साध्य केलेली प्रगती याचा मला जणू ध्यासच लागला आणि नोकरी करत असतानाच मी माझे पुढचे शिक्षण चालू ठेवले. सगळ्यांच्या घरात घडते त्याचप्रमाणे मुलींचे लग्न हा विषय माझ्या घरातही घडला, पण मला अपेक्षित मुलाबरोबर लग्न करता आले नाही. काही वर्षे लग्न न करण्याचा मी निर्णय घेतला. परंतु भावाच्या संसाराची वाट सुरळीत करून देण्यासाठी मी माझ्या वडिलांचे घर सोडले आणि स्वतःचे घर घेऊन स्वतंत्र राहू लागले. शरीराने दूर गेले तरी मनाने मी माझ्या कुटुंबाच्या अगदी जवळ होते. केवळ आई-वडील, भाऊ-वहिनीच नव्हे, तर माझे काका-काकू, चुलत भाऊ-वहिन्या, या सगळ्यांशी माझे अतिशय प्रेमाचे संबंध होते. मी घरातली खूप धाडसी मुलगी म्हणून माझ्याकडे बघितले जात होते. सगळ्यांना माझी काळजी होती आणि प्रेमही होते. माझ्या सगळ्या भावजया माझे खूप लाड करत. माझी भाचे कंपनी तर माझे फॅन होते, म्हटलं तरी चालेल. एक तर मी त्यांच्या अभ्यासात लक्ष घालायचे आणि त्यांना हव्या त्या गोष्टी घरातून त्यांना मिळवून द्यायचे. खूपच आनंदात चालले होते माझे आयुष्य. एकटी राहत असेल तरी एकटेपणा कधीच जाणवला नाही. माझ्या भाच्यांना माझे घर म्हणजे हॉलिडे होम होते.
करिअरच्या एका टप्प्यावर मी शिक्षिकेची मुख्याध्यापिका झाले. त्याचबरोबर मी एका दैनिकासाठी मुलाच्या अभ्यासक्रमावर लेख लिहायला सुरुवात केली. मला मुख्याध्यापिका म्हणून पहिली संधी एका वसतिगृहाच्या शाळेत मिळाली. तो अनुभव फारच विलक्षण होता. त्या अनुभवातून माझी स्वतःची खूपच प्रगती झाली आणि शाळेकडे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मी बघायला शिकले. तो अनुभव आजही मला अतिशय मार्गदर्शक ठरतो आहे. त्या अनुभवातून मी काही कौन्सिलिंगचे अभ्यासक्रम पूर्ण केले. त्याचा मला त्या नोकरीत खूप फायदा झाला. आणि आजही होतो आहे. सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी आयुष्यात मिळतात असे नाही, ह्या विचाराने मी स्वतःचे आयुष्य स्वीकारले होते.
माझ्या ह्या आयुष्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा होता. माझ्या मैत्रिणींना माझा अभिमान वाटायचा. बऱ्याच जणींना माझा आधार पण वाटायचा. कधीतरी लग्न कर म्हणायच्या, तर कधीतरी बरं आहे, तू स्वतंत्र आहेस असेही म्हणायच्या. मात्र माझ्या मित्रांचा किंवा मैत्रिणींच्या नवऱ्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. मैत्रिणींच्या नवऱ्यांना माझी त्यांच्या बायकोशी मैत्री धोकादायक वाटायची. आपली बायको अशी स्वतंत्र झाली तर काय, अशी भीती त्यांना वाटत असावी. परंतु मी माझ्या मैत्रिणींना कधीच त्यांच्या नवऱ्याच्या विरुद्ध उभे राहायला सांगितले नाही. उलट मी त्यांना त्यांच्या बरोबरीने उभे राहायला प्रोत्साहन दिले. वरवर ही गोष्ट जरी गंभीर वाटत नसली, तरी मला त्याचा खूप त्रास व्हायचा, कारण माझ्याशी मैत्री यावरून काही जणींच्या घरी वाद व्हायचे.
मित्र-मैत्रिणींच्या मुलांना आणि मुलींना माझ्या आयुष्याचे अप्रूप वाटायचे. त्या मुलींना मी त्यांचा आदर्श वाटायचे. ज्या माझ्या मैत्रिणी केवळ गृहिणी होत्या, त्यांच्या मुलींना वाटायचे की त्यांची आई माझ्यासारखी का नाहीये? पण मग मी त्यांना गृहिणी होणे सुद्धा किती कठीण असते, हे समजावून द्यायचे. खरंतर ह्या सगळ्या मुलांच्या शाळेशी किंवा अभ्यासाशी मी जोडली गेले असल्याने माझा त्यांचा खूप चांगला संवाद व्हायचा. शिक्षक म्हणून मी अर्थातच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते आणि आजही आहे.
माझ्या अनेक मित्रांनी मात्र कधीच त्यांच्या बायकोशी माझी ओळखदेखील करून दिली नाही. त्यांच्या मनात सुद्धा हीच भीती असावी असे वाटते. माझ्या कर्तृत्वावर सगळे खुश असले, तरी असे हातचे राखून वागणारे खरंच माझे मित्र आहेत का, याची मला शंका येते.
परंपरागत विचारसरणी आहे की स्त्री सुरुवातीच्या काळात वडिलांच्या आधाराने, नंतर नवऱ्याच्या आधाराने आणि उतार वयात मुलाच्या आधाराने जगते. मी माझ्या आयुष्यात कोणत्याही पुरुषांच्या आधाराने जगणे नाकारले. पण त्यामुळे माझ्या वयाच्या अनेक मुलींच्या मनात सुद्धा माझ्याबद्दल आदराची भावना नव्हती. मला खरंच ह्या गोष्टीचे आश्चर्यही वाटते आणि वाईटही वाटते. माझ्यासारख्या स्वतंत्र वृत्तीने जगणाऱ्या मुलींकडे बघण्याची लोकांची दृष्टी कधी बदलेल? खरंतर ही सगळी माणसे म्हणजे लोक नव्हती, तर माझ्या जवळची आणि मला नीट ओळखणारी माणसे होती.
ह्या नकारात्मकतेला एक सकारात्मक, म्हणजे मला वाटणारा सकारात्मक विचार हा होता की ज्या व्यक्तींशी माझे फारसे पटत नव्हते, त्यांनाही माझ्याबद्दल हा ठाम विश्वास होता की कधीही अडचणीच्या काळात ते पहिला फोन मलाच करतील, कारण त्यांना माझ्या मदत करण्याच्या स्वभावाची खात्री होती. मला हेच माझं बलस्थान वाटायचं आणि आजही वाटतं.
अशाच आयुष्याच्या प्रवासात माझ्याकडून एक मोठी चूक घडली. एक बिझनेस करण्याचा प्रयत्न केला. काही वर्षे ठीक चालला, पण नंतर अपयश आले. घरातले सगळे लोक त्यात सहभागी झाले होते. त्यांचे आर्थिक नुकसान झाले, हे मी मान्य केले, त्यांची माफी मागितली आणि बऱ्याच अंशी त्यांच्या नुकसानाची भरपाई पण करून दिली. परंतु त्यांनी माफ केले नाही. आजही काही प्रमाणात अपराधाची भावना माझ्या मनात आहे. अनेक वेळा मनात विचार येतो की मी चांगली आणि योग्य वागत होते, कायम त्यांना मदत करत होते, तोपर्यंत मी त्यांच्या जवळची व्यक्ती होते. हीच माणसे माझ्या वाईट काळात माझ्या पाठीशी नाही उभी राहिली. हे मात्र दुःख माझ्या मनात राहिले आहे. माझ्या ज्या भावाच्या सुखी संसारासाठी मी वडिलांचे हक्काचे घर सोडून वेगळे राहायचा निर्णय घेतला, त्या माझ्या भावाच्या बायकोने ‘मी तुला माझ्या कुटुंबाचा भाग मानत नाही’ असे ऐकवले. माझा भाचा देखील त्यामुळे माझ्यापासून थोडा दुरावला. पण माझा भाऊ आणि त्याचा मुलगा माझ्या वडिलांच्या पश्चात माझ्या आईची प्रेमाने काळजी घेत होते. माझ्या भाच्याला तर त्याची आजी अगदी मनापासून प्रिय होती. मी याच गोष्टीवर समाधान मानत होते. अर्थात, माझे माझ्या आईच्या घरी जाणे-येणे सुरू झाले होते, फक्त माझ्या भावजयीशी संवाद बंद होता. माझ्या प्रयत्नांनंतरदेखील तो सुरू झाला नाही आणि मग आता मीच तो नाद सोडून दिला. तरीही माझे माझ्या भाऊ आणि भाचा यांच्याशी नात्यात कधीच वाईटपणा आला नाही.
आजही आपल्या समाजात बायकांनी एकट्याने राहू नये, समाज चांगल्या नजरेने बघत नाही, असे म्हणतात. मग माझ्या ह्या जवळच्या माणसांना माझ्याबद्दल अशी काळजी कधीच वाटली नसेल का? आणि जर असे वाटले नसेल, तरी मी त्यांना माझी माणसे म्हणायचं का?
परंतु मला एक विशेष उल्लेख करायचा आहे. माझा वाईट काळ बघायला माझे वडील हयात नव्हते. परंतु माझा भाऊ पहाडासारखा माझ्या पाठीशी उभा राहिला. हा माझा लहान भाऊ असूनही माझा दादा झाला तो!
समाजातील कोणत्याही पुरुषी वृत्तीचा मला कधीही, कोणत्याही प्रकारे, कसलाही त्रास झाला नाही. त्यामुळे आपला समाज महिलांना एकट्याने राहण्यासाठी असुरक्षित आहे, हे माझ्या बाबतीत मात्र अजिबात खरे नाही. खरंतर मला वाटतं ही अनाठायी भीती आहे. किंवा ते महिलांच्या वागण्यावरदेखील अवलंबून असावे. पण त्यामुळेच आज मी अतिशय स्वतंत्र, स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर आयुष्य जगते आहे, त्यात माझ्या वडिलांच्या शिकवणीचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचा वारसा पुढे चालवताना आज माझे विद्यार्थी घडवण्याचे कार्य चालू आहे आणि अखेरपर्यंत चालू राहील.