Photo by Abhishek Kirloskar on Unsplash
भारतीय संविधान स्वीकृतीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व भारतीयांस मनस्वी सदिच्छा!
भारतीय संविधानाचा प्राण आणि आत्मा म्हणून उद्देशिकेची खास ओळख आहे. आणि या उद्देशिकेचा उगम 'आम्ही भारताचे लोक' या तीन शब्दांनी होतो. आता या तीन शब्दांबाबतीत आपण कधी सखोल विचार केलाय का?...
ह्या तीन शब्दांनीच प्रास्ताविकेची सुरुवात का होते!?
आता भारतीय म्हटलं की प्रथमतः आठवते ती म्हणजे भारतीय संस्कृती, भारतातली विविधता. भारतातील प्रत्येक क्षेत्रात विविधता आणि सांस्कृतिक संपन्नता आहे. म्हणूनच भारताची टॅगलाईन 'विविधतेत एकता' अशी आहे. भाषा, खाद्यपदार्थ, पोशाख, सण आणि उत्सव, संगीत आणि नृत्य, भौगोलिक विविधता इत्यादी विभिन्नता भारताचं खरं सौंदर्य ठरलं आहे. पण इतकी विभिन्नता असली तरी आम्हा सर्वांना एक समान ओळख प्राप्त होते ती म्हणजे 'भारतीय'. आणि या संस्कृतीप्रधान भारत देशात राहताना 'भारतीय' हीच आपली खरी ओळख आहे.
थोडसं इतिहासात वळून पाहिल्यावर आपल्याला दिसतं की संविधान स्वीकृतीच्या खूप पूर्वी आपल्या भारतात राजेशाही होती. आणि या राजेशाहीत राजा मालक आणि प्रजा गुलाम ठरायची. युद्धाच्या समयी राजा सुरक्षित असायचा पण प्रजेतील असंख्य लोकांची प्राणहत्या व्हायची. पण, यात काही राजे चांगलेही होऊन गेले की ज्यांनी सदैव सेवेस तत्पर राहून आपल्या प्रजेचा व त्यांच्या हिताचा विचार केला. कोणत्याही प्रकारची विषमता न पेरता सर्वांना समान संधी व वागणूक देणारे असे काही राजे आपल्या या भारतभूमीस लाभले जसे की, शिवाजी राजे, शाहू राजे, सयाजीराव गायकवाड, इ.. पण राजेशाही होतं काय की, सत्ता वारसा द्वारे प्राप्त होते. यामध्ये, राजा किंवा राणी यांच्या वंशपरंपरेतील व्यक्तीचं राज्य करते. कायदे आणि न्याय, राजा किंवा राणी द्वारे ठरवीले जातात आणि नागरिकांना यामध्ये मर्यादित स्वातंत्र्य लाभू शकते.
१८५८ पूर्वी भारतात अनेक राजघराणे आणि साम्राज्ये होती, ज्यांच्यात प्रत्येकाची स्वतःची संस्कृती, भाषा आणि परंपरा होती. या काळात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या, ज्यात युद्धे, आक्रमणे, सामाजिक सुधारणा आणि कला आणि साहित्याचा उदय यांचा समावेश होता.
१८५८ ते १९४७ या काळात भारतात ब्रिटिश राजवट होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापार सुरू केला आणि हळूहळू त्यांनी भारतात राजकीय सत्ताही मिळवली. या काळात भारतात अनेक बदल घडत गेले, जसे की पायाभूत सुविधांचा विकास (रस्ते, रेल्वे, दळणवळण), कायदे आणि शिक्षण व्यवस्था, आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर. या बदलांमुळे भारतात आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली.
पण, ब्रिटिशांनी लादलेल्या शोषणकारी धोरणांमुळे भारतात स्वातंत्र्यलढा उभा राहिला. उच्च कर, जमिनीचे मालकी हक्क काढून घेणे, भारतीय उद्योगांवर मर्यादा आणणे, आणि भारतीय नागरिकांना दुय्यम स्थान देऊन त्यांचे शोषण करणे हे स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख मुद्दे होते.
भारतीय स्वातंत्र्यलढा हा १९व्या शतकाच्या मध्यापासून सुरू होऊन १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याने समाप्त झाला. १८५७ च्या सिपाही विद्रोहाने या लढ्याची सुरुवात झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये झाली, ज्यांनी शांततेच्या मार्गाने स्वराज्याची मागणी केली. महात्मा गांधींनी अहिंसा आणि सत्याग्रहावर आधारित असहकार चळवळी, मिठाचा सत्याग्रह आणि 'भारत छोडो' आंदोलन चालवले. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र संघर्ष केला. अखेरीस, १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत व पाकिस्तान असे दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर, आपले संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची स्थापना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने भारतीय संविधानाची रचना केली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाला मंजुरी मिळाली आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते लागू झाले. भारतीय संविधानाचे उद्देशिका (Preamble) हे संविधानाचे आदर्श आणि मूल्ये स्पष्ट करते.
उद्देशिकेच्या पहिल्या वाक्यातील "आम्ही भारताचे लोक" या शब्दांद्वारे भारतीय संविधानाची अंतिम शक्ती आणि अधिकार हे भारतातील नागरिकांच्या हातात असल्याचे दर्शविले आहे. या वाक्याने लोकशाही शासनव्यवस्थेचे तत्त्व स्पष्ट होते.
'आम्ही भारताचे लोक' असंच का? 'आम्ही भारतीय' असे का नाही?
"आम्ही, भारताचे लोक" हे शब्दप्रयोग "आम्ही, भारतीय" पेक्षा अधिक योग्य आहे, याचे मुख्य कारण सर्वसमावेशकता आहे. "आम्ही, भारताचे लोक" भारतातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र आणतो, ज्यात विविध भाषा, धर्म, आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या सर्व लोकांचा समावेश आहे. हे शब्द भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या विविधतेला मान्यता देतो आणि एकतेचा संदेश देतो. उदाहरणार्थ, "आम्ही, भारताचे लोक" म्हणजे भारतातील सर्व लोक एकत्र आहेत, जरी त्यांची पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी, तर "आम्ही, भारतीय" फक्त भारतीय असण्याची ओळख व्यक्त करतो आणि अनेकदा विविधतेला कमी महत्व देतो.
संवैधानिक दृष्टिकोनातून विचार करता, "आम्ही, भारताचे लोक" भारतीय संविधानाच्या तत्त्वांना प्रकट करतो, जे विविध गट आणि प्रांतांना एकत्र आणतो. "आम्ही, भारताचे लोक" विविध सांस्कृतिक आणि भौगोलिक गट एकत्र करितो, तर "आम्ही, भारतीय" फक्त राष्ट्रीय ओळख व्यक्त करतो, संवैधानिक एकतेचा संदेश कमी देतो.
भौगोलिक एकता या दृष्टिकोनातूनही "आम्ही, भारताचे लोक" महत्वाचे आहे. हे शब्दप्रयोग भारताच्या भौगोलिक एकतेला महत्व देतात आणि सर्व प्रांतांतील लोक एकत्र असल्याचे दर्शवतात. उदाहरणार्थ, "आम्ही, भारताचे लोक" म्हणजे देशाच्या सर्व भागांमधील लोक एकत्र आहेत, तर "आम्ही, भारतीय" राष्ट्रीय ओळख दर्शवतो, परंतु भौगोलिक एकतेला विशेष महत्व देत नाही.
आंतरराष्ट्रीय उदाहरणांच्या दृष्टिकोनातूनही "आम्ही, भारताचे लोक" हे शब्दप्रयोग जास्त योग्य आहेत. अमेरिकेत "We the People of the United States" आणि ऑस्ट्रेलियात "We, the People of Australia" यासारख्या समान वाक्प्रचारांशी हा जुळतो. उदाहरणार्थ, "आम्ही, भारताचे लोक" हे आंतरराष्ट्रीय स्तरावर समावेशक नागरिकत्व दर्शवते, तर "आम्ही, भारतीय" इतका आंतरराष्ट्रीय संदर्भात वापरला जात नाही.
तर मुद्दा हाच की "आम्ही, भारताचे लोक" हे शब्द भारतातील विविधतेला स्वीकारतात आणि एकतेचा संदेश देतात म्हणून ती अत्यंत योग्य आणि महत्त्वपूर्ण मानली जातात.
भारतीय संविधान हा देशाच्या नागरिकांनी स्वतःसाठी तयार केलेला आहे आणि त्यामुळे सत्ता आणि अधिकार हे भारतीय लोकांच्या हातात आहेत. याचा अर्थ आपण भारतीय नागरिकच आपल्या शासनाचे आधारस्तंभ आहोत आणि संविधानाच्या सर्व तत्त्वांमध्ये त्यांचा सहभाग आहे. या तीन शब्दांद्वारे संविधानाने भारताच्या सर्व नागरिकांना समान मानले आहे आणि संविधानाच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांचा आदर केला जातो हे स्पष्ट केले जाते.
तर हीच लोकशाही बळकट करुयात,
संविधान समजून घेऊयात!