Photo by Aashish Singh on Unsplash

सोमवारी सकाळी पुण्याहून मुंबईला जायला आणि शुक्रवारी मुंबईहून पुण्याला येताना गाडीला प्रचंड गर्दी असणारच हे निश्चित. रेल्वेने येताना एरवी दिसणारे महिला व पुरुष एकत्र प्रवास करतानाचे चित्र येथे मात्र दिसत नाही.‌ ही बोगी पुर्णपणे पुरुषांसाठी राखीव असे. आपण या बोगीने प्रवास सुरू केला तर असे दिसून येईल की या बोगीची काही वैशिष्ट्ये आहेत. केवळ आपल्याकडे पुणे मुंबईचा पास आहे म्हणून आपल्याला येथे सीटवर बसायला जागा मिळत नाही.‌ कोणत्या सीटवर कोणता गृप बसणार हे आधीच ठरलेले असते. या बोगीला रिझर्व्हेशन नसते. समोर आसन रिकामे दिसले तरी ऐरागैरा कोणीही तेथे बसू शकत नाही. नवख्या माणसाला तर येथे मुळीच सामाऊन घेतले जात नाही.‌ एखादा उभा राहुन दमला तरी त्याला घडीभर देखील टेकण्याची मुभा नाही. आणि यदाकदाचित तो सिटला टेकला तरी त्याला लगेच सक्तिने उठवले जाते. पुणे मुंबई साडेतीन चार तासांच्या प्रवासात बसायला जागा मिळणे शक्य नाही. त्यामुळे नवख्या माणसाला हा प्रवास खूपच त्रासदायक ठरण्याचीच शक्यता अधिक असे.‌ मुंबई म्हणजे उकाडा. लोकल ट्रेन असो की इतर रेल्वे गाडी डब्यात फॅन असला तरी तो निरुपयोगी ठरत असे कारण फॅनच्या जवळ असणारा प्रत्येक व्यक्ती फॅन आपल्याकडे वळवून घेत असतो. डबा लोकांनी खचाखच भरलेला असल्यामुळे उकाडा अधिकच जाणवत असतो. येथील उकाड्यात घामाच्या धारा निघत नाहीत तर घामाने कपडे अंगावर चिकटून बसतात. कपड्यांचा अवतार झालेला असतो.‌या डब्याला खिडकी आहे हे फक्त दूरुनच पहायचे, खिडकीजवळ बसण्याचे भाग्य या बोगीत भल्या भल्यांना लाभत नाही. सिटला टेकून एकच प्रवासी उभा राहु शकतो परंतु गर्दीमुळे एवढ्याशा जागेत दोन प्रवासी दाटीवाटीने अडचण सहन करीत उभे असतात. तशाही परिस्थितीत ये जा करणारे बिनदिक्कतपणे पाय तुडवत जात असतात. त्यांना खाली कोणाचा पाय आहे हे दिसतच नसे. गर्दीमुळे काही प्रवासी दाराजवळ, शौचालयाजवळ उभे राहून कसेबसे प्रवास करीत असतात. असे जरी असले तरी रोजच्या गृप मधील सदस्य आला नसेल आणि या उभ्या असलेल्या लोकांमध्ये कोणी जुगार खेळायला तयार असेल तर त्याला बसायला लगेच जागा मिळत असे. बसायला जागा मिळण्यासाठी ही पात्रता अंगी असेल तर मग अडचण येत नाही. कोणत्याही गृप मधे घुसता येते. येथे अगदी एक पैसा पॉइंट ते एटवन पर्यंत जुगार राजरोसपणे खेळला जात असे. आज आपण किती जिंकलो किंवा आज आपण किती हरलो याचा हिशेब दादर जवळ आले की केला जात असे. ही जिंकलेली रक्कम पाच दहा रुपये किंवा अधिक असे ‌हे एक पैसा पॉइंट साठी असे पण मोठ्या जुगाराचे बाबतीत ही रक्कम काही हजारांच्या घरात जात असे. अर्थात ज्याची जेवढी आवक जास्त तेवढी त्यांंची उडी जास्त असे हा जुगार नोकरदार किंवा मध्यमवर्गीय यांचा खेळ नव्हे. ही सगळी दोन नंबरची कमाई की ज्याची कागदोपत्री कोठेही नोंद नसे. इतर वेळी गृपचा नियमित सदस्य असेल तर पहिला सदस्य थोडासा पुढे सरकून किंवा थोडेसे वाकडे बसून गृपच्या सदस्यांना आपल्या मागच्या बाजूला थोडीशी टेकण्यापुरती जागा करून देतात. गृपचा सदस्य असण्याचा हाच सर्वात मोठा फायदा असे.‌ डेक्कन क्विनची ही चौदा क्रमांकाची पास धारकांची बोगी म्हणजे एक वेगळीच दुनिया आहे. या बोगीत व्यक्ती चतुर्थ श्रेणीतील असो की सिनिअर क्लास वन ऑफिसर सर्वांना येथे एकाच मापाने तोलले जाते. ," चला, ए निळा शर्ट बाजूला, ओ लाल शर्ट जरा एवढा कप पुढे पास करा!" सहजपणे पेंट्री कारचा कर्मचारी समोरच्या साहेबांना काम सांगू शकतो. हेच जर तो ऑफिसर त्याच्या ऑफिस मध्ये असता तर हे असे घडणे शक्यच नाही परंतु येथे असे घडण्याचे कारण म्हणजे रोजचा प्रवास. रोजच्या ओळखीचा चेहरा, तिच जागा, नावे एकमेकांना माहितही नसतात पण ही बोगी त्यात चौथ्या सिटजवळ उभा असणारा चष्मेवाला अशा काही तरी खुणा लक्षात राहिलेल्या असतात. रेल्वेचा कर्मचारी त्याच्या मूडमध्ये साहेबांशी येथेच बोलू शकतो. एवढेच नव्हे तर रागाऊ शकतो. एका पसरट ॲल्युमिनियमच्या ताटात चहाचे भरलेले कप रचून हाताच्या पंजावर तोलून पुढे जात असताना पुढच्या व्यक्तीचा शर्ट नवा आहे किंवा पांढरा आहे याची काहीही तमा न बाळगता अचानक पाठीमागून येवून खांद्यावर हात ठेवून बाजूला बाजूला म्हणत त्या व्यक्तीला बाजूला सारून हा पुढे जात असतो.‌ त्या ताटातून कपाचे ताटात साचलेले पाणी कोणाच्या अंगावर ठिबकते कधी गरमागरम चहाचा बॅरल नेत असताना अचानक कोणाला तरी चटका बसतो. एखादा वडा विक्रेता असाच ताटात गरमागरम वडापाव घेऊन आपला तेलकट हात सहजपणे पुढच्या माणसाच्या खांद्यावर ठेवून जरा बाजूला व्हा म्हणत असतो, पण तो घाईत असतो, सरळ पुढे जात असतो.‌त्याला गाडी किती मिनिटे थांबणार आहे हे माहीत असते आणि तेवढ्या वेळात त्याला किमान दोन डब्यात तरी वडापाव विक्रीसाठी जायचे असते. पापी पेट का सवाल है म्हणत सगळ्यांचीच घाई चाललेली असते.‌ बोगीत रोजचा पत्याचा गृप ठराविक सिटवर असतो. त्या गृपचा लिडर महिन्याकाठी वेटरला टिप देत असतो. त्या गृपच्या खाद्य पदार्थांची ऑर्डर त्याला त्वरित पूर्ण करायची असते त्यासाठीच त्याची धडपड चालू असते. जुगार खेळता खेळता पोटाकडेही त्यांचे लक्ष असते.‌सिगारेटच्या धुरात पत्ते खेळणे चालू असते.‌ त्यावेळी बंधने अशी नव्हतीच.‌आपण गाडीत असो की प्लॅटफॉर्मवर आपले कपडे सुस्थितीत राहतीलच याची कोणतीही शाश्वती नाही. कपड्यावर काही सांडले किंवा डाग लागला तरी एवढा मोठा साहेब बाजूला सरकून रुमालाने आपले कपडे नळावर साफ करताना आपल्याला येथेच दिसतो. त्याचा साहेबी रुबाब येथे अजिबात चालत नाही.‌दमला भागलेला रेल्वेचा वेटर साहेबांच्या शेजारी बिनदिक्कतपणे बसू शकतो. कोणताही मान नाही कोणताही अपमान नाही काही वेळा फर्स्ट क्लासचा पास आहे पण बसायला जागा नाही, फर्स्ट क्लासमध्ये उभा राहुन प्रवास करता येत नाही म्हणून या बोगीतून उभ्याने प्रवास करावा लागलेले ऑफिसर कोणतीही कुरकुर न करता शांतपणे प्रवास करीत असतात कारण त्यांना वेळ गाठायची असते. ही बोगी बरेच काही शिकवत असते.‌ रोजची चेहरेपट्टीची ओळख झाल्याने या साहेबांना सिगारेट लागते किंवा क्वचित तंबाखू लागते हे त्यांनी पाहिलेले असते. त्यामुळे हा वेटर, " साहेब, जरा डबी काढा !" अगदी सहजपणे तंबाखू किंवा सिगारेट मागू शकतो किंवा," साहेब एक पाच रुपयांची सोय करा, पगारावर देतो!" असा संवादही ऐकता येऊ शकतो.‌येथे कोणीही कोणा पेक्षा मोठा नाही आणि लहानही नाही हे सगळे अनुभवता येते ते फक्त येथेच.

गाडी धावत असताना वाटेत एखादी गाडी घसरली काही कारणाने अडकली किंवा एखाद्याने आत्महत्या केली किंवा एखादी गाय म्हैस कापली गेली चेन पुलिंग झाले आणि गाडी थांबली की खाली उतरून सगळे प्रवासी एक होतात. कधी गाडी बोगद्यात अडकते, अपघात झाला तर सगळे एकत्र येतात.‌ सांडलेले रक्त पाहून कोणाला उलटी होते कोणी निर्विकार रहातो बोगीतील पत्रकार लगेच फोटो घेतो सगळे एकमेकांना माहिती पुरवत असतात अशावेळी कोणीही परका नसतो. कोणत्याही कारणाने गाडी अडकली ट्रॅकवर पाणी साचलेले असेल पुढेही जाता येत नाही, मागेही फिरता येत नाही अशीही कधी अवस्था होते. अशा वेळी तहान लागली तर वॉश बेसिन मधील पाणी पिऊन वेळ भागवणे हिच बोगी शिकवते. कारण वेळ अशी असते की गाडी घाटात अडकलेली असते खाली उतरून कोठे जाता येत नाही, बाहेरून कोणी येणार नाही अशावेळी फक्त जिव वाचवणे एवढा एकच उद्देश उरलेला असतो. रोजच्या प्रवासात हे पास होल्डर रेल्वेच्या रुळाशी इतके एकरूप झालेले असतात की गाडीच्या बाहेर न बघता कदाचित झोपलेले असले तरी आत्ता आपण नेमके कोणत्या स्पॉटवर आहोत हे ते अचूकपणे सांगू शकतात.‌ त्या ठराविक स्पॉटवर होणारा रुळांचा आवाजाशी ते इतके एकरूप झालेले असतात. रोजचीच ये जा असल्याने हे कोणीही न शिकवता ते शिकलेले असतात.‌ डेक्कन क्विनने प्रवास करणारा विशेषतः पास होल्डरच्या बोगीतून प्रवास केलेला या बोगीला आयुष्यात कधी विसरू शकणार नाही अशी ही पास धारकांची बोगी !

.    .    .

Discus